NGN News
Latest Marathi News

नाशिक-पुणे सरळ रेल्वे मार्गासाठी ९ रोजी महामार्ग रोखणार

  • सिन्नरच्या गोंदेफाटा येथे समृद्धी महामार्ग आणि नाशिक-पुणे महामार्ग एकाच वेळी आंदोलन

** एनजीएन न्यूज नेटवर्क

नाशिक : नाशिक-पुणे सरळ रेल्वे मार्गाच्या मागणीसाठी 9 ऑगस्ट (क्रांती दिन) रोजी 9 वाजता नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावर एकाच वेळी रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. सिन्नर तालुक्यातील गोंदेफाटा येथे समृद्धी महामार्ग आणि नाशिक-पुणे महामार्ग येथे एकाच वेळी हे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती सिन्नर तालुका रेल्वे कृती समितीच्या वतीने देण्यात आली.

नाशिक-शिर्डी-पुणतांबा-अहिल्यानगर-पुणे हा वळणाचा रेल्वेमार्ग अव्यवहार्य असून त्यामुळे ७० किलोमीटर अंतर वाढणार आहे. ही बाब लक्षात घेता नाशिक-पुणे सरळ रेल्वे मार्ग उभारण्याची व्यापक मागणी आहे. सदर लढा कोणत्याही पक्ष वा संघटनेचा नसून लाखो नागरिकांच्या सुविधेसाठी एल्गार पुकारण्यात आल्याचे समितीच्या वतीने सांगण्यात आले. नाशिक-पुणे रेल्वेमार्गाची मागणी गेल्या ४० वर्षांपासून करण्यात येत आहे. सिन्नरसह अनेक ठिकाणचे भूसंपादन, सर्वेक्षण, आराखडे या प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्या आहेत. त्यासाठी कोट्यवधीचा निधी खर्च करण्यात आला आहे. तथापि, हा प्रकल्प बाजूला ठेवून नाशिक-शिर्डी-पुणतांबा-अहिल्यानगर-पुणे हा वळणाचा रेल्वेमार्ग उभारण्याचा घाट घातला जात आहे. नव्या मार्गामुळे आधी खर्च केलेला पैसा वाया जाणार असून त्याच्या निर्माणामुळे वेळ आणि अतिरिक्त खर्च वाढणार असल्याचे समितीचे म्हणणे आहे.

.. म्हणून वळणाचा मार्ग नको

नाशिक-पुणे वळणाच्या रेल्वेमार्गामुळे अंतरासह वेळ आणि तत्सम बाबी प्रवास करणाऱ्यांना परवडणाऱ्या नाहीत. शेतकरी, व्यापारी, उद्योजक, नोकरदार, विद्यार्थी अशा विविध घटकांसाठी तो अव्यवहार्य ठरणार आहे. शिवाय, पुणे-नाशिक औद्योगिक कोरिडोरच्या विकासाला तो पूरक नाही. म्हणूनच वळणाचा मार्ग रद्द करून नाशिक-सिन्नर-संगमनेर-अकोले-नारायणगाव-आळेफाटा-मंचर-खेड-चाकण-पुणे ही आधीची त्याची रचना कायम ठेवण्यात यावी, अशी मागणी जोर धरत आहे. त्या अनुषंगाने ९ ऑगस्ट रोजी गोंदेफाटा येथे समृद्धी महामार्ग आणि नाशिक-पुणे महामार्ग येथे एकाच वेळी हे आंदोलन करण्यात येणार आहे.

संगमनेर येथेही एल्गार

दरम्यान, नाशिक-पुणे सरळ रेल्वेमार्गासाठी संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा टोलनाका येथे आंदोलन करण्यात येणार आहे. आ. सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वाखाली त्यासाठी एल्गार पुकारण्यात आला आहे. सरळ रेल्वे मार्गामुळे उत्तर महाराष्ट्र, नगर आणि पुणे जिल्ह्याच्या विकासाला मोठी चालना मिळेल, असा संघर्ष समितीचा दावा आहे. या मागणीसाठी विविध तालुक्यांतील नागरिक, शेतकरी आणि युवक संघटनांनी पाठिंबा दर्शविला असून, अनेक लोकप्रतिनिधीही आंदोलनात सहभागी असल्याचे सांगण्यात आले आहे. नाशिक-पुणे सरळ रेल्वे मार्ग संघर्ष समितीने सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी होऊन सरकारचे लक्ष वेधण्याचे केले आहे.

Comments are closed.