
** एनजीएन न्यूज नेटवर्क
नाशिक : नाशिक–पुणे रेल्वेमार्ग सरळमार्गी करण्याच्या महत्त्वाच्या मागणीसाठी नाशिक पश्चिमच्या भाजप आमदार सीमाताई हिरे यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची नवी दिल्ली येथे भेट घेतली. या भेटीदरम्यान ठाकरे शिवसेनेचे नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांनीही उपस्थित राहून या मागणीला ठाम पाठिंबा दिला. भिन्न राजकीय पक्षांचे प्रतिनिधित्व करणारे हे दोन्ही लोकप्रतिनिधी नाशिकच्या विकासाच्या प्रश्नावर एकत्र आल्याने या भेटीची राजकीय वर्तुळात विशेष चर्चा रंगली.
बैठकीत खासदार राजाभाऊ वाजे यांनी नाशिक–पुणे रेल्वेमार्ग सरळमार्गी करण्याची मागणी पुन्हा एकदा रेल्वेमंत्र्यांसमोर ठामपणे मांडली. या मार्गामुळे नाशिक, सिन्नर, संगमनेर, नारायणगाव, मंचर आणि पुणे या भागातील उद्योग, व्यापार, शिक्षण, पर्यटन आणि प्रवासी वाहतुकीला मोठी चालना मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.
याचबरोबर आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमधील रेल्वे विकासकामांना तातडीने गती देण्याची मागणीही करण्यात आली. नाशिक रोड रेल्वे स्थानकाचा विकास, प्रवासी सुविधांचा विस्तार, आवश्यक पायाभूत सुविधा आणि कुंभमेळ्याशी संबंधित सर्व रेल्वे कामे वेळेत पूर्ण करण्याची आवश्यकता खासदार वाजे यांनी अधोरेखित केली.
बैठकीत पंचवटी एक्स्प्रेसला शताब्दी एक्स्प्रेसच्या रेक शेअरिंग व्यवस्थेतून मुक्त करून स्वतंत्र रेक उपलब्ध करून देण्याची मागणीही खासदार वाजे यांनी केली. याशिवाय नाशिकहून पंढरपूर, अयोध्या, अजमेर तसेच कटरा (वैष्णोदेवी) या धार्मिक स्थळांसाठी नवीन रेल्वे सेवा सुरू करण्याची मागणीही रेल्वेमंत्र्यांकडे करण्यात आली. नाशिक जिल्ह्याशी संबंधित इतर विविध रेल्वे विकास प्रकल्प आणि प्रवासी सुविधांबाबतही सविस्तर चर्चा झाली. या प्रसंगी भाजप शहर सरचिटणीस रश्मी हिरे-बेंडाळे या देखील उपस्थित होत्या.
—
“नाशिक–पुणे रेल्वेमार्ग, कुंभमेळ्याची रेल्वे कामे आणि नवीन रेल्वे सेवा, पंचवटी एक्सप्रेसच्या समस्या या केवळ मागण्या नाहीत, तर नाशिकच्या भविष्यासाठी अत्यावश्यक गरजा आहेत. नाशिककरांच्या हिताचा कोणताही विषय असेल, तर पक्षभेद बाजूला ठेवून सर्व लोकप्रतिनिधींनी एकत्र येणे ही नाशिकची उज्वल राजकीय परंपरा आहे” : राजाभाऊ वाजे, खासदार, नाशिक
Comments are closed.