
- ‘विचारांची भिशी’ उपक्रमातून महिलांना एकत्र आणण्याचा अनोखा प्रयत्न
** एनजीएन न्यूज नेटवर्क
नाशिक : वाणी समाज प्रबोधन संस्थेच्या महिला अध्यक्षपदी चैताली अमृतकर यांची २०२५ मध्ये निवड झाल्यानंतर त्यांनी समाजातील महिलांना एकत्र आणण्याच्या उद्देशाने विविध उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी सुरू केली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली संस्थेने नाशिक शहरात ११ विभागांची मजबूत संघटनात्मक रचना उभी केली असून समाजात एकी, संघटन आणि सामाजिक मूल्ये रुजविण्यासाठी सातत्याने कार्यक्रम आयोजित केले जात आहेत.
महिलांमध्ये वैचारिक देवाणघेवाण वाढावी, परस्परांतील संवाद मजबूत व्हावा आणि सामाजिक नाती अधिक दृढ व्हावीत या उद्देशाने संस्थेने ‘विचारांची भिशी’ हा अभिनव उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमात नाशिकमधील सर्व ११ विभागांतील सुमारे ७०० महिला सहभागी झाल्या आहेत.
‘विचारांची भिशी’चे वैशिष्ट्य म्हणजे यात प्रत्येक वयोगटातील महिलांचा उत्स्फूर्त सहभाग आहे. आजी, आई, सासू-सुना, जावा-जावा, नणंद-भावजय, मैत्रिणी अशा विविध नात्यांतील महिला एका व्यासपीठावर एकत्र येत आहेत. विशेष म्हणजे, एकाच गावात किंवा परिसरात राहूनही विविध कारणांमुळे एकमेकींना भेटण्याची संधी न मिळालेल्या महिला या उपक्रमामुळे एकत्र येत असून त्यांच्यात संवाद, स्नेह आणि परस्पर विश्वास वाढत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
सध्या या उपक्रमाअंतर्गत कौटुंबिक समुपदेशन विषयावर मार्गदर्शन सत्रे आयोजित केली जात आहेत. कुटुंबातील संवाद, नातेसंबंध दृढ करणे, तणाव व्यवस्थापन आणि सकारात्मक वातावरण निर्माण करणे यावर तज्ज्ञांकडून महिलांना मार्गदर्शन केले जात आहे. यापुढे या उपक्रमाची व्याप्ती वाढवत शिक्षण (Edu), उद्योग-व्यवसाय, स्वयंरोजगार, महिला सक्षमीकरण आणि व्यक्तिमत्त्व विकास अशा विविध विषयांवर कार्यक्रमांची साखळी राबविण्याचा संस्थेचा मानस आहे. त्यांनी राबवलेला ‘विकली बास्केट’ उपक्रम देखील अनेकांच्या कौतुकाचा भाग ठरला आहे.
याबाबत बोलताना महिला अध्यक्षा चैताली अमृतकर यांनी सांगितले की, “समाजातील प्रत्येक महिला व मुलगी ही एकमेकांशी जोडली जावी, तिचा आत्मविश्वास वाढावा आणि समाजात सकारात्मक परिवर्तन घडविण्यात महिलांनी पुढाकार घ्यावा, हा आमचा प्रयत्न आहे. वय, नाते किंवा पार्श्वभूमी कोणतीही असो, प्रत्येक महिला आनंदाने आणि सन्मानाने एकत्र यावी, हीच ‘विचारांची भिशी’मागील खरी संकल्पना आहे.”
महिलांना केवळ सांस्कृतिक कार्यक्रमांपुरते मर्यादित न ठेवता त्यांच्यात वैचारिक, सामाजिक आणि आर्थिक सक्षमीकरणाची जाणीव निर्माण करण्यासाठी वाणी समाज प्रबोधन संस्थेचे हे उपक्रम समाजात सकारात्मक बदल घडविणारे ठरत असल्याची भावना सहभागी महिलांनी व्यक्त केली.
Comments are closed.