- 1975 मध्ये प्रथम भेटलेल्या मित्रांचे 2026 मध्ये गेटटुगेदर
** एनजीएन न्यूज नेटवर्क
नाशिक : जून 1975 मध्ये शासकीय विद्या निकेतन, नाशिक मध्ये भेटलेले 21 मित्र ऑगस्ट 2026 मध्ये म्हणजेच तब्बल 51वर्षांनी पुन्हा भेटले आणि वयाच्या साठीत आपल्या मैत्रीचा एकावन्नवा वाढदिवस आणि मैत्री नाबाद 51 असा अनोखा सोहळा या सर्व मित्रांनी अत्यंत उत्साहात साजरा केला.विशेष म्हणजे 1975 मध्ये ज्या मायमाऊली च्या कुशीत पहिली भेट झाली त्याच गंगापूर रोड वरील शाळेला सर्वांनी आज पुन्हा 51 वर्षांनी अत्यंत प्रेमाने भेट देऊन या भूमीविषयक जिव्हाळा व्यक्त केला.शाळेची ही इमारत एक वारसा म्हणून ना जि मविप्र समाजाने थोर वारसा म्हणून जपली आहे.
गाव, खेडी, पाड्यात जे प्रतिभावान, बुद्धिमत्ताधारक, होतकरू विद्यार्थी आहेत आणि जे विशेषतः आर्थिक, सामाजिक दृष्टीने मागास आहेत अश्या विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण घेऊन त्यांनी समाज, देशासाठी योगदान द्यावे या उदात्त हेतूने तत्कालीन शिक्षण मंत्री, गांधींवादी, थोर समाजसेवक आदरणीय मधुकरराव चौधरी यांनी राज्यात 1967 मध्ये विभागावर चार शासकीय विद्या निकेतनांची स्थापना केली त्यापैकी शाविनी नाशिक ही एक शाळा. 1979 मध्ये ही शाळा धुळे येथे स्थलांतरित झाली.या शाळेतून 1981 मध्ये दहावी परीक्षा पास झालेले हे 21 बांधव पाचवीत 1975 साली प्रथम भेटले आणि त्यांच्यातील जात, धर्म, गरीब, श्रीमंत अश्या सर्व भिंती आड न येता ते गेली 51वर्ष नियमित एकमेकांच्या संपर्कात राहिले आणि आज मैत्री नाबाद एकावन्न साजरी करण्यासाठी सुद्धा राज्य व देशातून विविध ठिकाणाहून ते तोच 1975 चा उत्साह, जोश घेऊन हजर राहिले.
शासकीय विद्या निकेतनने दिलेल्या संस्कारातून आणि मुशीतून घडलेल्या या बांधवांनी पत्रकारिता, समाजकारण, राजकारण,शिक्षण, शासकीय, निमशासकीय, बँकिंग, कृषी, आरोग्य सेवा,स्वतः चे उद्योग यात अत्यंत यशस्वी कामगिरी केली आहे.आदरणीय मधुकर राव चौधरी यांचा शाविनी स्थापनेचा उद्देश या बांधवांनी संपूर्ण यशस्वी केला.
या अनोख्या मैत्री मेळाव्यात मधुकर भामरे, किशोर झोपे, भाऊसाहेब बच्छाव यांनी संरक्षण, बँकिंग, शिक्षण क्षेत्रात केलेल्या कार्याचा गौरव करण्यात आला. बाजीराव सोनवणे, अनिल कुमावत,चंद्रभान घुगे,प्रताप जाधव, संजय देशमुख, , नाना निकम, मधुकर भामरे, नंदूशेठ वालखडे, विश्वास पाटील , अतुल गोऱ्हे, भाऊसाहेब बच्छाव, नंदकिशोर राजभोज, सुनील साबळे, ,किशोर झोपे या मित्रांनी हजेरी लावली.गत 51 वर्षात विविध कारणांनी चार बांधवांनी या जगाचा निरोप घेतला त्यांच्या आठवणीने उपस्थित सर्व मित्र व्याकुळ, अस्वस्थ झाले.दुःखद अंतःकरणाने सर्वांनी या सोडून गेलेल्या बांधवाना श्रद्धांजली वाहिली.
या आगळ्या वेगळ्या मैत्रीच्या सोहळ्यात मित्रांना एकत्र आणण्यासाठी गेले महिनाभर प्रयत्न करणारे मित्र बाजीराव सोनवणे, नंदू राजभोज,अनिल कुमावत म्हणाले, ” हा सोहळा म्हणजे आनंदाचे डोही आनंद तरंग ही अनुभूती देणारा आहे. 51वर्षांपूर्वीचे मित्र पुन्हा भेटतात हाच मुळात आनंददायी आणि दुर्मिळ क्षण आहे आणि तो आम्हाला अनुभवायला मिळाला हे आमचं भाग्य आहे आणि त्याबद्दल परमेश्वराचे किती आभार मानावेत “.
Comments are closed.