NGN News
Latest Marathi News

नागरिक सतर्कतेतून डिजिटल फसवणुकीला आळा शक्य : नाशिक पोलीस

  • बजाज फायनान्सचा ‘नॉकआउट डिजिटल फ्रॉड’ जनजागृती उपक्रम; BYK महाविद्यालयातील ३५० विद्यार्थी सहभागी

नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क

वाढत्या सायबर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी डिजिटल व्यवहार करताना सतर्क राहणे आवश्यक असून, अनोळखी लिंक, फोन कॉल आणि संदेशांवर विश्वास ठेवण्यापूर्वी त्यांची पडताळणी करावी, असे आवाहन नाशिक सायबर क्राइम सेलचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रतीक पाटील यांनी केले. बजाज फायनान्स लिमिटेडतर्फे नाशिकच्या BYK कॉलेज ऑफ कॉमर्स आणि धुळे येथील डी. एम. बारी ज्युनिअर कॉलेजमध्ये ‘नॉकआउट डिजिटल फ्रॉड’ ही सायबर जनजागृती मोहीम राबविण्यात आली. नाशिकमधील कार्यक्रमात ३५० विद्यार्थी आणि २७ प्राध्यापकांनी सहभाग घेतला.

या मोहिमेत बनावट कर्ज ऑफर्स, गुंतवणूक फसवणूक, OTP घोटाळे, डिजिटल अटक, बनावट नोकरीच्या ऑफर्स, सोशल मीडिया खात्यांची नक्कल आणि फिशिंग लिंक्सद्वारे होणाऱ्या फसवणुकीबाबत मार्गदर्शन करण्यात आले. सायबर फसवणूक झाल्यास पहिल्या ६० मिनिटांत राष्ट्रीय सायबर गुन्हे हेल्पलाइन क्रमांक १९३० वर तक्रार नोंदविणे महत्त्वाचे आहे. हा कालावधी सायबर फसवणुकीतील ‘गोल्डन अवर’ मानला जातो. वैयक्तिक माहिती, OTP आणि बँकिंगविषयक गोपनीय तपशील कोणाशीही शेअर करू नयेत, असेही पोलिसांनी स्पष्ट केले.

बजाज फायनान्सतर्फे मागील आर्थिक वर्षात देशभरात १०० हून अधिक सायबर जनजागृती कार्यशाळा घेण्यात आल्या आहेत. नाशिकमधील कार्यक्रमाला पोलीस कॉन्स्टेबल भूषण देशमुख, निवृत्त पोलीस उपआयुक्त प्रकाश साईंदाणे आणि BYK महाविद्यालयाच्या उपप्राचार्या सुवर्णा कदम उपस्थित होते. तर धुळे येथील कार्यक्रमाला सायबर क्राइम सेलचे पोलीस निरीक्षक सुरेश कुमार धुसर आणि निवृत्त पोलीस निरीक्षक शशिकांत सोनार उपस्थित होते. नागरिकांनी संशयास्पद डिजिटल व्यवहारांची तातडीने १९३० या हेल्पलाइनवर किंवा राष्ट्रीय सायबर गुन्हे रिपोर्टिंग पोर्टलवर तक्रार करावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

Comments are closed.