
- इतर तीन मंत्र्यांनाही कामगिरी सुधारण्याचा इशारा
** एनजीएन न्यूज नेटवर्क
नाशिक : शिवसेना नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी, आगामी काळात कामगिरीत सुधाणा न केल्यास मंत्रिपद काढून घेण्याचा गर्भित इशारा आपल्या मंत्र्यांना दिल्याची जोरदार चर्चा असताना त्यामध्ये दादाजी भुसे यांचा समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे. भुसे यांच्यासोबतच इतर तीन मंत्र्यांना ही तंबी मिळाली असल्याने त्याची राजकीय वर्तुळात खमंग चर्चा आहे.
मंगळवारी झालेल्या प्री-कॅबिनेट बैठकीत एकनाथ शिंदे यांनी संबंधित मंत्र्यांना इशारा दिला. यावेळी शिंदे प्रचंड संतापल्याचे सांगण्यात येत आहे. ‘तुम्ही काम सुधारा नाही अन्यथा खांदेपालट करायची वेळ माझ्यावर येईल’, असा इशारा त्यांनी चार मंत्र्यांना दिल्याचे कळते. त्यामध्ये शिक्षणमंत्री दादाजी भुसे, सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट आणि वने, मदत व पुनर्वसन तसेच मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड ही तीन नावे पुढे आली आहेत. वारंवार तंबी देऊनही आपापल्या खात्याचा कारभार सुधारण्यात आलेले अपयश आणि शिवसेना पक्ष विस्तारासाठी अपेक्षित असलेले काम होताना दिसत नसल्यानेच शिंदे यांनी हा आक्रमक पवित्रा घेतल्याचे सांगण्यात येत आहे. पक्षनेता या नात्याने शिंदे या मंत्र्यांच्या ‘रिपोर्ट कार्ड’वर सपशेल नाखूष असल्याची माहिती पुढे आली आहे.
Comments are closed.