NGN News
Latest Marathi News

नाशकात काँग्रेसतर्फे ‘रघुपती राघव राजाराम’ सत्याग्रह आंदोलन

  • अयोध्या श्रीराम मंदिर दान लूट प्रकरणी पवित्रा
  • प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची प्रमुख उपस्थिती

** एनजीएन न्यूज नेटवर्क

नाशिक : अयोध्या श्रीराम मंदिर दान लूट प्रकरणाच्या विरोधात नाशिकच्या प्रसिद्ध काळाराम मंदिराबाहेर काँग्रेसतर्फे ‘रघुपती राघव राजाराम’ सत्याग्रह आंदोलन छेडण्यात आले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या आंदोलनात भगवान रामाचे भजन करत सरकारचा निषेध करण्यात आला. यावेळी आंदोलकांनी हातात ‘चौकीदार चोर है, देश लुटला आता रामाचे दान ही लुटले’ अशा आशयाचे बॅनर्स घेऊन जोरदार घोषणाबाजी केली. या आंदोलनादरम्यान प्रसारमाध्यमांशी बोलताना हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्र्यांवर आणि केंद्र सरकारवर गंभीर आरोप केले.

हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, देशाचा कारभार पारदर्शकपणे चालला पाहिजे. मात्र, या सर्वांना तिलांजली मिळाली आहे. माहिती अधिकाराचा भंग यांनी केला आहे. स्वतःचे बगलबच्चे राम मंदिरात बसवले आणि त्यावर डल्ला मारला आहे. सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह पैसे चोरी गेले, याचा तपास लागला पाहिजे ही आमची मागणी आहे आणि त्यासाठी आम्ही हे सत्याग्रह आंदोलन केलं आहे. महाराष्ट्रात व्यापक स्वरूपात अजून आंदोलन उभारू, असे त्यांनी म्हटले. सपकाळ पुढे म्हणाले की, चोरीतील गुन्हेगार चंपत राय यांच्या घरावर मोदी बुलडोझर चालवणार का? देश विकायला हे सर्वजण निघालेले आहेत. मंदिर प्रकरणाची निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे. एसआयटी घोषणा केलेली आहे. मात्र, या एसआयटीमध्ये मोदींचे हस्तक आहेत. जनतेला हिशोब मिळाला पाहिजे ही आमची सत्याग्रहामधून मागणी आहे.

या आंदोलन प्रसंगी नाशिक शहर अध्यक्ष बबलू खैरे, ज्ञानेश्वर गायकवाड यांसह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments are closed.