NGN News
Latest Marathi News

नाशिकमध्येही कमालीच्या गुप्ततेत ‘ऑपरेशन टायगर’ नाट्य ?

  • डझनभर नगरसेवक धनुष्यबाण हाती घेण्याच्या मूडमध्ये असल्याची खळबळजनक माहिती

** एनजीएन न्यूज नेटवर्क

नाशिक : खासदार फुटीनंतर शिवसेना उबाठा गटाचे आमदार शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा जोरात रंगली असतानाच नाशिक महापालिकेतील डझनभर नगरसेवक धनुष्यबाण हाती घेण्याच्या मूडमध्ये असल्याची खळबळजनक माहिती पुढे आली आहे. प्रभागनिहाय विशिष्ट स्वरूपातील निधी वितरीत करून या नगरसेवकांना गळाला लावण्याची एकनाथ शिंदे यांच्या पक्षाची रणनीती असल्याचे कळते. याबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात येत असली तरी भविष्यात चर्चेला वास्तव स्वरूप येऊन ‘ऑपरेशन टायगर’ राबवले गेल्यास तो उद्धव ठाकरे यांना हा मोठा धक्का असणार आहे.

नाशिक महापालिका निवडणुकीत शिवसेना उबाठा गटाचे १५ नगरसेवक निवडून आले आहेत. महापालिकेत भाजप आणि शिवसेना यांची संयुक्त सत्ता अस्तित्वात आहे. निवडून आल्यानंतर विकासनिधीच मिळणार नसेल तर नगरसेवकपद मिरवण्यात काय हाशील, या विचाराने उबाठा गटाचे नगरसेवक सध्या अस्वस्थ आहेत. ही अस्वस्थता ओळखून शिवसेनेने उबाठा गटाच्या नगरसेवकंवर जाळे टाकण्यास प्रारंभ केल्याची माहिती पुढे आली आहे. या फेऱ्यात बारा नगरसेवक अडकल्याचे सांगण्यात येत आहे. पक्ष प्रवेशाची औपचारिकता पूर्ण करण्यासाठी शिवसेनेतील वरिष्ठ नेत्यांसोबत बैठका पार पडल्याचा दावाही करण्यात येत आहे. तथापि, या वृत्ताला उबाठा गटाकडून कोणताही दुजोरा मिळालेला नाही. त्याबाबत गुप्तता पाळण्यात येत आहे.

या चर्चा तथ्यहीन ..

शिवसेना उबाठा गटाचे नगरसेवक अस्वस्थ असून ते शिवसेनेच्या वाटेवर आहेत, हे वृत्त तथ्यहीन असून त्यासंदर्भात केवळ चर्चा घडवून आणल्या जात असल्याची माहिती एका स्थानिक नेत्याने दिली. केवळ संभ्रम निर्माण करून परस्परांबद्दल संशय निर्माण करण्याचे हे प्रयत्न हाणून पाडले जातील, आम्ही सर्व एक आहोत आणि ‘मातोश्री’शी निष्ठा ठेवून असल्याचा दावाही संबंधित नेत्याने केला.

Comments are closed.