** एनजीएन न्यूज नेटवर्क
सलग दोनदा नांदगावचे मैदान मारून भुजबळ बंधूंना ‘आस्मान’ दाखवणाऱ्या सुहास कांदे यांच्या आकांक्षांना धुमारे फुटले आहेत. आपले कडवे राजकीय विरोधक छगन भुजबळ यांना आव्हान देण्याच्या तयारीत असलेल्या कांदे यांनी दिवाळीनिमित्त येवल्यात केलेली ‘साखरपेरणी’ त्याचे बीजारोपण म्हणता येईल. तूर्तास शिंदेसेनेचे पाईक असलेल्या कांदे यांनी थेट येवल्यातून लढण्याची तयारी सुरू केली आहे. भुजबळ यांच्या राजकीय प्रभावाला सुरूंग लावण्याची कांदेंची योजना आहे. कांदे यांच्या या नव्या ‘इनिंग’ला नानाविध कंगोरे असले तरी त्यांची वाटचाल दबावतंत्र आहे की स्वत:चे महायुतीपुरते वजन वर्धिष्णू करण्याची खेळी या मुद्द्यांवर चर्वितचर्वण सुरू झाले आहे. त्यांच्या प्रस्तावित निर्णयाचे साक्षीदार होण्यास जिल्हावासिय औत्सुक्य बाळगून असतील. तथापि, उभी हयात संघर्षात घालवलेल्या भुजबळ यांनी विचलित न होता ‘स्वागत आहे’ ही उपरोक्त घडामोडींवर व्यक्त केलेली प्रतिक्रिया बरेच काही सांगून जाते. केवळ राजकीय वातावरणनिर्मिती करणे म्हणजे निवडणूक जिंकल्यात जमा आहे, हे समीकरण किमान येवल्यापुरते तरी सोपे नाही.
२०१४ च्या चौरंगी लढतीत पराजय झालेल्या सुहास कांदे यांनी नंतरच्या लगोलग दोन निवडणकांत अनु्क्रमे पंकज आणि समीर या भुजबळ बंधूंना पराभूत करीत नांदगावमध्ये पाय रोवण्याचे काम केले. आपले बोट धरून राजकारणात उतरलेल्या कांदे यांचा चढा आलेख छगन भुजबळ यांना पचनी पडणे अशक्य होते. तिथूनच भुजबळ-कांदे यांच्यात राजकीय चढाओढ सुरू होऊन त्याचे पर्यावसान सूडाच्या राजकारणात झाले. बहुधा, याच भावनेतून नांदगावचा गड दोनदा राखलेल्या कांदे यांनी भुजबळांनी बालेकिल्ला बनवलेल्या शेजारच्या येवल्यात लक्ष केंद्रित करण्याचा चंग बांधला आहे. गत दिवाळीत मतदारसंघभर उभारलेले दोनशेहून अधिक शुभेच्छा फलक, प्रमुख राजकीय पदाधिकारी, नागरिक आणि माध्यमकर्मी यांच्यात केलेली साखरपेरणी, संपर्क कार्यालय सुरू करण्याच्या हालचाली त्याच रणनीतीचा भाग मानला जात आहे. नांदगावमध्ये ‘ग्रीप’ घेतल्याने तिथे कौटुंबिक सदस्याला उभे करून ‘अण्णा’ येवल्याचा गड काबीज करणार, अशा चर्चा कांदे समर्थकांनी सुरू केली आहे. गेल्या काही महिन्यांपासून समीर भुजबळ यांची येवला मतदारसंघातील ‘सक्रियता’ पाहता २०२९ मध्ये सिनियर भुजबळांऐवजी तेच येथील संभाव्य उमेदवार असण्याची शक्यता गडद झाली आहे. एकूणच भुजबळांविरूध्दची ‘अॅन्टी इन्कम्बन्सी’, संख्येत सर्वाधिक असलेल्या मराठा मतांचे भुजबळ विरोधापोटी होत असलेले ध्रुवीकरण, गेल्या विधानसभेत खुद्द भुजबळांचे आधीच्या तुलनेत घटलेले मताधिक्य, नगराध्यक्ष निवडणूकीत त्यांच्या पुरस्कृत उमेदवाराची सरशी होताना झालेली दमछाक या सर्व बाबी हेेरून कांदे येवल्याच्या मैदानात उतरण्याची शक्यता नाकारता येत नाही. अर्थात, नांदगावमधील सहजसाध्य विजयाची येवल्यात पुनरावृत्ती होईल का, हे आज तरी सांगणे कठीण आहे.
एक सुरक्षित मतदारसंघ म्हणून भुजबळांनी पंचवीस वर्षांपूर्वी येवल्याची निवड केली. प्रदीर्घ राजकीय अनुभवाच्या शिदोरीला ‘ओबीसी मसिहा’ म्हणून निर्माण केलेली प्रतिमा, निवडणूक व्यवस्थापन कौशल्य, संघटनात्मक पकड, विकासकामांचे संपुट या जोरकस मुद्द्यांची जोड देत त्यांनी बघता-बघता पाच टर्म येवलेकरांच्या पसंतीची मोहोर प्राप्त केली. या काळात अनेक चढ-उतार अनुभवास येऊनही त्यांनी विरोधकांना डोईजड होऊ दिले नाही, हे विशेष. ज्येष्ठ नेते अंबादास बनकर वगळता प्रमुख सर्व मराठा नेते विरोधात एकवटूनही भुजबळ आजवर ‘अजिंक्य’ राहिलेत. हे संचितच कांदेंच्या निवडणूक लढवण्याच्या तयारीवर भुजबळांनी दिलेल्या सूचक प्रतिक्रियेचे प्रतिबिंब मानले जावे. मूळात, ज्या ओबीसी मतांच्या भरवशावर कांदे येवल्याचा गड सर करण्याची गणितं मांडत आहेत, त्यावर भुजबळांची असलेली पकड सर्वज्ञात आहे. राहिला मुद्दा मराठा ‘व्होट बॅंके’चा, तर स्थानिक मंडळी भुजबळांना पर्याय म्हणून कांदेंना कौल देण्यास तयार होतील का, हा यक्षप्रश्न आहे. भरीस भर दराडे परिवारातील ‘युवराज’ देखील आगामी द्वंद्व लढतीच्या तयारीत मग्न आहेत. या सर्व घटकांचा विचार करता सिनियर भुजबळ असोत की पुतणे समीर, कांदे यांना येवल्यात विजय सोपा नाही, एवढाच तूर्तास अर्थ काढणे सोयीचे ठरेल. लढत तिरंगी झाल्यास लाभ कोणाला होणार, हे सांगण्यासाठी ज्योतिषाची गरज पडू नये.
मूळात, भुजबळ आणि कांदे राज्याचा गाडा हाकणाऱ्या महायुती घटकपक्षांचे प्रतिनिधीत्व करतात. आज भरभक्कम वाटत असलेल्या या राजकीय व्यवस्थेचे ऐक्य तीन वर्षांनंतर तसे असेलच याची खात्री नाही. येवल्यातील भुजबळ-कांदे हा प्रस्तावित ‘सामना’ पक्षीय नव्हे तर वैयक्तिक पातळीवर असल्याने कांदे यांना निश्चित अशी ठाम भूमिका घ्यावी लागेल. नांदगावी सलग दोनदा मिळवलेली विजयश्री दखलपात्र असली तरी तिथल्या इतिहासावर दृष्टीक्षेप टाकला तर तिसरी विजयी मिरवणूक काढण्याचे भाग्य अभावानेच लाभते. स्वत: कांदे यांनी लढणे आणि परिवारातील व्यक्तीने लढणे यामध्ये मोठा फरक असणार आहे. येवल्यातून कांदे यांनी लढावे आणि भुजबळ परिवारातील शिलेदाराला धूळ चारावी, या समीकरणाला फडणवीस-शिंदे मान्यता देतील, अशी शक्यता फारच कमी आहे. अगदीच येवल्यात भुजबळ-कांदे सरळ लढत झाली तर भुजबळांना अधिक घाम गाळावा लागेल इतकेच.
सारांशात, राजकीय सूडापोटी एखाद्याविरोधात निवडणूक लढवणे राजकारणात नवीन बाब नव्हे. मात्र, त्यासाठीची अनुकूल-प्रतिकूलता अभ्यासण्यातही शहाणपण असते. कांदे यांचे ‘डॅशिंग’ राजकारण नांदगावकरांनी हसतमुखे स्विकारले. त्यांच्या कामांनीही मतदारसंघाला मोहित केले. कोणाला आपलेसे कसे करायचे, याबाबतची त्यांची हातोटी आजवर मतदारसंघात चौफेर यशाची मांडणी करणारी ठरली. तथापि, निवडणुकीच्या तीन वर्षे आधी थेट भुजबळ यांना अंगावर घेण्याची कांदेनी केलेली हिकमत एकतर त्यांच्या आत्मविश्वासाचा भाग असू शकतो किंवा एका बड्या नेत्याला ललकारून महायुतीत त्यांना स्वत:चे वजन वाढवून घेण्याची राजकीय खेळी करावयाची शक्यता नाकारता येत नाही. राजकारणात तरबेज असलेले भुजबळ कांदेंची वरिष्ठ स्तरावर समजूत काढण्यात यशस्वी ठरतात की दोन हात करण्याची तयारी ठेवतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. दोहोंत लढत झालीच तर राज्यातील ती एक ‘हाय व्होल्टेज’ श्रेणीतील असेल, याबाबत दुमत नाही.
Comments are closed.