
- मुख्यमंत्र्यांचा राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेनेला ठेंगा
** एनजीएन न्यूज नेटवर्क
नाशिक : गेल्या पावणेदोन वर्षांपासून रखडलेल्या नाशिक पालकमंत्रिपदाचा प्रश्न अखेर निकाली निघाला आहे. नाशिकची धुरा अपेक्षेप्रमाणे जलसंपदा तथा कुंभमंत्री गिरीश महाजन यांच्याकडे कायम ठेवण्यात आली आहे. या पदासाठी माजी पालकमंत्री छगन भुजबळ ( राष्ट्रवादी कॉंग्रेस ) आणि दादाजी भुसे ( शिवसेना ) हेदेखील इच्छुक असताना त्यांच्याऐवजी महाजन यांना पसंती दिल्याने भाजपचा वरचष्मा सिद्ध झाल्याचे मानले जात आहे.
राज्यात २०२४ च्या विधानसभा निवडणुकानंतर देवेंद्र फडणवीस सरकार अस्तित्वात आले. तथापि, नाशिक आणि रायगड या जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदासाठी जोरदार रस्सीखेच सुरु होती. जिल्ह्यांत आपले वर्चस्व राहावे आणि निधीचे नियंत्रण मिळावे यासाठी महायुतीमधील तीनही पक्षांचे नेते त्यासाठी प्रयत्नशील होते. नाशिक जिल्ह्यात पंधरापैकी सर्वाधिक सात आमदार राष्ट्रवादी कॉंग्रेसचे असल्याने पालकमंत्री पदासाठी त्या पक्षाचा प्रारंभीपासून आग्रह होता. पाच आमदार असलेल्या भाजपनेही त्यासाठी फिल्डिंग लावली होती. मात्र गेले पावणेदोन वर्षे नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा कायम होता. या पदावर राहिलेल्या छगन भुजबळ आणि दादाजी भुसे यांनीही नेतृत्वाकडे साकडे घालत पालकमंत्री पदासाठी आग्रह धरला होता. मात्र, अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गिरीश महाजन यांना पसंती दिली.
निर्णय स्वागतार्ह
नाशिकच्या पालकमंत्रिपदी कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांची निवड स्वागतार्ह आहे. मागील कुंभमेळ्यात ते पालकमंत्री होते तरी त्यांनी स्वयंसेवक म्हणुन पुर्ण वेळ काम केले होते. येणारा कुंभमेळा सुध्दा नाशिककरांच्या सहकार्याने यशस्वी व भव्य दिव्य पार पडेल.कुंभमेळ्याच्या निमित्ताने सर्वांना विश्वासात व सोबत घेतले जाईल. मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी आगामी कुंभ मेळ्याच्या निमित्ताने रामकाल पथ व इतर विकास कामांकरिता ३५ हजार कोटींपेक्षा जास्त निधी दिला आहे. कमी पडला तर अजुनही देणार आहे. त्यामुळे येणार कुंभमेळा नक्कीच निर्विघ्न पार पडेल.
सुनील केदार, अध्यक्ष – भाजप नाशिक महानगर जिल्हा.
Comments are closed.