NGN News
Latest Marathi News

प्रतिबंधित पानमसाला, सुगंधित तंबाखू तस्करीचा पर्दाफाश

  • गुटखा तस्करीचा ‘हायटेक’ फंडा उघड; रिमोट बटणावर गाडीच्या पुढील व मागील नंबर प्लेटवर काळा पडदा; १४ लाख ९२ हजारांचा मुद्देमाल जप्त

** एनजीएन न्यूज नेटवर्क

लोहोणेर : पंडीत पाठक

देवळा तालुक्यातील विठेवाडी येथील आहेर वस्ती जवळ बुधवारी (दि. ८ जुलै) रात्री ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे प्रतिबंधित पानमसाला व सुगंधित तंबाखूच्या तस्करीचा मोठा पर्दाफाश झाला. संशयास्पद हालचाली करणारी एमएच-४१-बीएल-९८४८ क्रमांकाची मारुती सुझुकी इरर्टिगा ग्रामस्थांनी अडवून देवळा पोलिसांच्या ताब्यात दिली. त्यानंतर वाहनाची तपासणी केली असता मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित पानमसाला व सुगंधित तंबाखूचा साठा आढळून आला. या कारवाईत १४ लाख ९२ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एका आरोपीला अटक करण्यात आली असून एक जण फरार आहे.

नाशिक विभागाचे अन्न सुरक्षा अधिकारी चेतन परदेशी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, वाहनातून ५७ बिग पॅक केसरयुक्त विमल पानमसाला, ७३६ व्ही-१ बिग तंबाखू पाकिटे, १,९८० किंग पॅक केसरयुक्त विमल पानमसाला, ४४० व्ही-१ किंग पॅक तंबाखू पाकिटे, २२० केसरयुक्त विमल पानमसाला पाकिटे आणि २२० व्ही-१ तंबाखू पाकिटे असा प्रतिबंधित माल जप्त करण्यात आला. या मालाची किंमत ४ लाख ९२ हजार २०० रुपये असून वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली १० लाख रुपये किमतीची मारुती सुझुकी इरर्टिगा जप्त करण्यात आली. अशा प्रकारे एकूण १४ लाख ९२ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला.

या कारवाईतील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे गुटखा वाहतुकीसाठी वापरण्यात आलेले अत्याधुनिक तंत्रज्ञान. वाहनाच्या पुढील व मागील दोन्ही नंबर प्लेटसमोर रिमोटद्वारे नियंत्रित होणारा काळा पडदा बसविण्यात आला होता. रिमोटचे बटण दाबताच काही क्षणांत नंबर प्लेट पूर्णपणे झाकली जात असल्याने वाहनाचा नोंदणी क्रमांक दिसत नव्हता. त्यामुळे पोलिस, परिवहन विभाग आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची दिशाभूल करून प्रतिबंधित मालाची वाहतूक करण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे तपासात समोर आले.

या प्रकरणी हेमंत प्रभाकर पवार (रा. भऊर, ता. देवळा) याला ताब्यात घेण्यात आले असून सराईत गुटखा तस्कर कुणाल संजय मेने (रा. खर्डे, ता. देवळा) हा फरार असून त्याचा पोलीस शोध घेत आहेत.

देवळा पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार, फरार आरोपी कुणाल संजय मेने याच्याविरुद्ध यापूर्वीही देवळा, वणी आणि दिंडोरी पोलीस ठाण्यांमध्ये गुटखा तस्करीचे चार ते पाच गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे तो सराईत गुटखा तस्कर असल्याचा उल्लेख फिर्यादीत करण्यात आला असून त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) अंतर्गत कारवाई करण्याची मागणी अन्न व औषध प्रशासनाने केली आहे.

या प्रकरणी देवळा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १८२/२०२६ भारतीय न्याय संहिता तसेच अन्न सुरक्षा व मानके कायदा, २००६ अंतर्गत विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देवळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सार्थक नेहेते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विनय देवरे, पोलीस हवालदार नितीन बाराहाते, राहुल शिरसाठ, दिलीप सोनवणे, श्रावण शिंदे या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.

Comments are closed.