NGN News
Latest Marathi News

दुर्दैवी ! बेझे जलाशयात बुडून वडिलांसह दोन मुलींचा मृत्यू

  • भाऊबीजेच्या दिवशी काळाचा घाला; भोर कुटुंबावर दुःखाचा डोंगर

** एनजीएन न्यूज नेटवर्क

नाशिक : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अंजनेरी शिवारात बेझे जलाशयात बुडून वडिलांसह त्यांच्या दोन अल्पवयीन मुलींचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना बुधवारी (दि. ११) घडली. सुरेश नामदेव भोर (वय ४२), ज्योती सुरेश भोर (वय १०) आणि हर्षदा सुरेश भोर (वय ७) अशी मृतांची नावे आहेत. तिघेही वाघेरे, ता. इगतपुरी येथील रहिवासी होते. भाऊबीजेच्या दिवशी घडलेल्या या दुर्घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अंजनेरी शिवारातील बेझे धरणालगत राहणारे उत्तम चव्हाण यांच्याकडे भोर कुटुंब दिवाळीनिमित्त पाहुणे म्हणून आले होते. बुधवारी सकाळी साडेनऊ ते दहाच्या सुमारास सुरेश भोर हे आपल्या दोन मुलींसह बेझे जलाशयात आंघोळीसाठी उतरले होते. यावेळी पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तिघेही जलाशयात बुडाल्याची प्राथमिक माहिती आहे.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली. बचावकार्यादरम्यान तिघांना बाहेर काढण्यात आले; मात्र त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. या घटनेने भोर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, सणासुदीच्या काळात घडलेल्या या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Comments are closed.