NGN News
Latest Marathi News

सुशिक्षित आणि शिस्तप्रिय घरातील मुलींना का आवडतात टपोरी मुलं?

** एनजीएन न्यूज नेटवर्क

तरुण मुलांनी अथवा मुलींनी अफेअर करणे, रिलेशन शिप मध्ये असणे, घरातील लोकांच्या विरोधात जावून अथवा पळून जावून लग्न करणे या गोष्टी आपण नित्य घडताना बघत असतो. बहुतांश वेळेस अश्या प्रकरणातून मुलं अथवा मुलींची फसवणूक होणे, ब्रेक अप होणे, एकतर्फी प्रेमातून हल्ला होणे, पळून जावून लग्न केले म्हणून कुटुंबाशी संबंध तुटणे, पालकांची बदनामी होणे आणि या लग्नात फसगत झाली म्हणून मुलीचे आयुष्य बरबाद होणे हेच बघायला मिळते.

आजच्या लेखात आपण तरुण मुला मुलींची प्रेमप्रकरणे आणि सध्याची सामाजिक परिस्थिती यावर वेगळ्या दृष्टीकोनातून भाष्य करणार आहोत.

समुपदेशन करतांना समजते की, अतिशय चांगल्या घरातील मुली स्वतःचा पेक्षा अगदीच सुमार अथवा जेमतेम कौटुंबिक पार्शवभूमी असलेल्या, नौकरी व्यवसायात स्थिर नसलेल्या, हुल्लड बाजी करणाऱ्या मुलांना प्रेम करण्यासाठी, रिलेशन ठेवण्यासाठी प्राधान्य देतात. सुशिक्षित कुटुंबातील मुलींचे गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या किंवा आक्रमक आणि बंडखोर स्वभावाच्या मुलांकडे आकर्षित होण्यामागे आणि त्यातून उद्भवणाऱ्या प्रश्नांमागे काही महत्त्वपूर्ण मानसशास्त्रीय आणि सामाजिक कारणे असतात. या मुली खरतर पालकांच्या अती-नियंत्रणाविरुद्ध बंडखोरी करण्यासाठी चुकीच्या मार्गाला जातात. ज्या घरात शिस्तीचे अतिशय कडक नियम असतात किंवा मुलांकडून सतत उच्च अपेक्षा ठेवल्या जातात, तेथील मुले मानसिक कोंदटपणा अनुभवतात. घरातील चौकटीतून बाहेर पडून स्वतःचे स्वतंत्र अस्तित्त्व आणि अधिकार सिद्ध करण्याचा मार्ग म्हणून अनेकदा अशा प्रकारच्या प्रेम प्रकरणाची किंवा नात्यांची निवड केली जाते. घरातला तोच तोच पणा, सांचेबद्ध दैनंदिन, पालकांच्या परवानगी शिवाय काहीही करणे अशक्य असणे, सतत पालकांना उत्तरे अथवा समर्थन आणि विश्वास पटवून देण्यासाठी प्रयत्न करावे लागणे यातून मुलींना घराबाहेर कोणीही मोकळा श्वास घ्यायला, हिंडायला फिरायला, बोलायला भेटले की त्या आकर्षित होतात.

‘बचावकर्ता सिंड्रोम'(Savior/Fixer Complex) अनेक संवेदनशील किंवा उच्चशिक्षित मुलींना असे वाटते की त्यांच्या प्रेमाने, समजुतीने आणि मार्गदर्शनाने ही मुले सुधारू शकतात. यातून स्वतःला श्रेष्ठ किंवा महान समजण्याची (Hero-worship/Savior complex) भावना त्यांना त्या नात्यात भावनिकदृष्ट्या अडकवून ठेवते. तो कसाही असला तरी माझ्यासाठी तो बदलेल, माझे मन तो मोडणार नाही, मी त्यातील फक्त चांगले गुण पाहिलं आणि त्याचा आहे तसा स्वीकार करेल माझ्या प्रेमाचं महत्व त्याला समजले की तो मला समर्पित होईल अश्या वेड्या अपेक्षा या मुली बाळगून असतात.

रोमांच आणि नवीनतेचा शोध शांत आणि शिस्तबद्ध वातावरणात वाढलेल्या मुलींना बाहेरील संपूर्णपणे नियमबाह्य, अनाकलनीय आणि थरारक विश्व अधिक आकर्षित करते. धोक्याची जाणीव असतानाही त्याकडे ओढवले जाणे हे मानवी मनातील कुतूहल आणि नवीनतेच्या शोधाचा भाग आहे. घराच्या चार भिंती पलीकडे पण खूप मोठे जग आहे ते आपण अनुभवले पाहिजे त्यासाठी कोणाची तरी साथ हवी या मानसिकतेतून मुली वेगळ्या वाटेला जातात.

भावनिक असुरक्षितता आणि चुकीचे आकलन कुटुंबात किंवा मित्रपरिवारात मोकळा संवाद न मिळाल्यास, मुलांकडून तात्पुरती मिळणारी अति-काळजी, सततचे लक्ष (attention) किंवा आक्रमक जिद्दीला मुली ‘खरे प्रेम’ किंवा ‘संरक्षण’ समजतात. येथे भावनिक परिपक्वतेचा अभाव मुख्य कारण ठरतो. अनेक पालक मुलींना फक्त जबाबदारी आणि कर्तव्य म्हणून वाढवतात, मुली साठी लागणारे सर्व खर्च करतात, तिला सर्व काही पुरवतात. पालक हे विसरून जातात की भौतिक गोष्टीं पेक्षा आपल्या मुलीला आपल्याशी संवाद साधण्याची, आपला सहवास मिळवण्याची पण गरज आहे. मुलींना आपली फक्त भीती, धाक अथवा आदर वाटावा म्हणून आपण पालक नाही आहोत तर मुलींना मानसिक भावनिक दृष्टीने सुरक्षितता देणे आपले कर्तव्य आहे.

माध्यमांचा आणि लोकप्रिय संस्कृतीचा प्रभाव चित्रपट, गाणी आणि साहित्यामध्ये अनेकदा ‘बॅड बॉय’ किंवा राऊडी पात्राला प्रेमामुळे पूर्णपणे बदलताना दाखवले जाते. याचा अचेतन मनावर (subconscious) खोल परिणाम होतो आणि वास्तवातही असे घडू शकते हा भ्रम निर्माण होतो. तरुण पिढी सिनेमा नाटक याला आदर्श मानते आणि त्या कथानकातील हिरो आहे तसाच माझा मित्र आहे किंवा असेल अश्या खोट्या स्वप्नांना मुली उराशी बाळगतात. अशा विशिष्ट सामाजिक गटांमधील किंवा नात्यांमधील अपयशाबद्दल आणि त्यामुळे आयुष्य उद्ध्वस्त झाल्याबद्दल कोणतीही अधिकृत, सर्वसमावेशक किंवा शासकीय आकडेवारी उपलब्ध नाही. हा एक मानवी वर्तणूक, नातेसंबंध आणि मानसशास्त्राशी संबंधित विषय असल्याने याला केवळ संख्यात्मक आकड्यांमध्ये मोजता येत नाही. मात्र, कौटुंबिक आणि तरुण पिढीच्या समुपदेशनातील अनुभवानुसार, योग्य मूल्यमापन न करता केलेल्या अशा नात्याच्या निवडीमुळे भावनिक शोषण, करिअरचे नुकसान, मानसिक ताणतणाव आणि कुटुंबाशी दुरावल्यामुळे नैराश्य येण्याच्या घटना मोठ्या प्रमाणावर दिसून येतात.

मुलींच्या हातून अश्या चुका घडू नयेत म्हणून काय उपाययोजना करणे अपेक्षित आहे ते जाणून घेवू.
विश्वासपूर्ण आणि मोकळा संवाद पालकांनी मुलांशी भीतीचे किंवा नियंत्रणाचे वातावरण न ठेवता मित्रत्वाचे संबंध ठेवावेत. मुलांच्या मनात काय चालले आहे हे समजून घेण्यासाठी त्यांच्यावर ताशेरे ओढण्याऐवजी त्यांच्याशी संवादाचे पूल बांधणे आवश्यक आहे. मुलींची भावनिक बुद्धिमत्ता (Emotional Intelligence) वाढवणे गरजेचे आहे. लहानपणापासूनच मुलांना स्वतःचा स्वाभिमान, योग्य-अयोग्य नातेसंबंधांमधील सीमारेषा आणि भावनिक स्वावलंबन यांचे शिक्षण देणे गरजेचे आहे, जेणेकरून ते भंपक किंवा शोषक आकलनापासून दूर राहू शकतील.

सकारात्मक ऊर्जा वळवणे तरुणांची ऊर्जा सर्जनशील छंद, करिअरची ध्येये आणि उत्पादक उपक्रमांकडे केंद्रित करणे आवश्यक आहे, जेणेकरून पोकळी किंवा एकटेपणा जाणवणार नाही. मुलांना तरुण वयात शिक्षण, करिअर, सामाजिक ज्ञान, व्यावहारिक जग दाखवणे त्यासाठी त्यांना वेगवेगळ्या चांगल्या उपक्रमात अडकवणे गरजेचे आहे.

सहानुभूतीपूर्वक समुपदेशन जर एखादी मुलगी अशा नात्यात अडकली असेल, तर तिच्यावर थेट रागवणे, धाक दाखवणे किंवा समाजाच्या भीतीपोटी शिक्षा करणे टाळावे. यामुळे ती अधिक आक्रमक होऊ शकते किंवा दूर जाऊ शकते. त्याऐवजी तज्ज्ञ समुपदेशकाच्या (Counselor) मार्गदर्शनाखाली तिचे प्रबोधन करून तिला स्वतःहून वास्तव समजून घेण्याची संधी देणे उपयुक्त ठरते. पालकांनी आपली मुलगी चुकली आपल्या मनाविरुद्ध वागली म्हणून तिला कायमचे दूर करणे योग्य नाही. मुलगी अशी वागली म्हणजे आपल्याच संस्कार आणि शिकवण मध्ये कमतरता राहिली आहे he स्वीकारून पालकांनी मुलींचा भक्कम आधार बनणे आणि त्यांना पुनःश्च आयुष्य सावरायला मदत करणे अपेक्षित आहे.

काउन्सिलर लाईफ कोच मीनाक्षी जगदाळे
9766863443

Comments are closed.