- राजघराणी, प्राचीन ग्रामनामे आणि ऐतिहासिक भूगोलाची उलगडणार नवी पाने
** एनजीएन न्यूज नेटवर्क
नासिक : नासिकचा इतिहास केवळ मंदिरे, लेणी, शिलालेख आणि ऐतिहासिक वास्तूंपुरता मर्यादित नसून, विविध राजघराण्यांच्या ताम्रपटांमधूनही नासिकच्या समृद्ध इतिहासाचे अनेक महत्त्वपूर्ण संदर्भ समोर येतात. अशाच ३२ ताम्रपटांच्या आधारे नासिकच्या प्राचीन राजकीय, सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक इतिहासाचा वेध घेणाऱ्या लेखक चेतन राजापूरकर आणि रमेश पडवळ लिखित ‘ताम्रपटातील प्राचीन नासिक’ या संशोधनात्मक ग्रंथाचा प्रकाशन सोहळा रविवार, १५ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता गंगापूररोडवरील कुर्तकोटी शंकराचार्य संकुलातील तिसऱ्या मजल्यावरील नानाराव ढोबले सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.
संस्कार भारती, नासिक इतिहास संशोधन मंडळ आणि नासिक हेरिटेज यांच्या संयुक्त विद्यमाने या प्रकाशन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ लेखक व इतिहास अभ्यासक डॉ. जी. बी. शाह असतील. पुरातत्त्व विभागाचे नासिक विभागीय सहसंचालक डॉ. अमोल गोटे, संस्कार भारतीचे अखिल भारतीय मंत्री रवींद्र बेडेकर, नासिक इतिहास संशोधन मंडळाचे अध्यक्ष योगेश कासर-पाटील, तसेच नासिक हेरिटेजचे अतुल पवार आणि संतोष जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत ग्रंथाचे प्रकाशन होणार आहे.
प्राचीन काळात राजांनी दिलेली भूमिदाने, धार्मिक संस्थांना दिलेल्या देणग्या, राजाज्ञा आणि प्रशासकीय निर्णय यांची अधिकृत नोंद तांब्याच्या पत्र्यांवर कोरली जात असे. अशा ताम्रपटांना इतिहासाच्या अभ्यासात विशेष महत्त्व आहे. कारण त्यातून तत्कालीन राजसत्ता, प्रशासनव्यवस्था, गावांची प्राचीन नावे, भौगोलिक सीमा, धार्मिक परंपरा आणि समाजजीवन यांची विश्वासार्ह माहिती मिळते, असे लेखक चेतन राजापूरकर यांनी सांगितले. ग्रंथात असलेले ताम्रपटांवर अनेक संशोधकांनी अभ्यास केला आहे. मात्र तो सर्वसामान्यांपर्यंत सर्वसामान्य भाषेत आणि आपल्या परिसराचे वैशिष्ट मांडण्याच्यादृष्टीने हा एक प्रयत्न आहे.
‘ताम्रपटातील प्राचीन नासिक’ या ग्रंथात नासिक जिल्ह्यात सापडलेल्या तसेच नासिक आणि परिसरातील स्थळांचा उल्लेख असलेल्या एकूण ३२ ताम्रपटांचा अभ्यास करण्यात आला आहे. या ताम्रपटांच्या आधारे प्राचीन नासिक प्रदेशावर प्रभाव असलेल्या विविध राजघराण्यांचा मागोवा घेण्यात आला आहे. त्रैकूटक, कलचुरी, चालुक्य, राष्ट्रकूट आणि यादव यांसारख्या राजसत्तांच्या काळातील नासिकचे राजकीय स्थान, तत्कालीन ग्रामव्यवस्था, भूमिदानाची परंपरा आणि धार्मिक संस्थांना मिळणारा राजाश्रय यांचे संदर्भ या ग्रंथातून उलगडतात. विशेष म्हणजे, आज अस्तित्वात असलेल्या अनेक गावांची प्राचीन नावे, त्यांचे तत्कालीन प्रशासकीय विभागांशी असलेले संबंध आणि राजकीय घडामोडींमधील त्यांचे स्थान यांचा शोध घेण्याचा प्रयत्न या पुस्तकात करण्यात आला आहे. सिन्नर, कळवण, मालेगाव, इगतपुरी आणि नासिक परिसराशी संबंधित ताम्रपटांच्या आधारे प्राचीन नासिकचा ऐतिहासिक भूगोल समजून घेण्यासाठी महत्त्वपूर्ण माहिती या ग्रंथात उपलब्ध करून देण्यात आली आहे.
नासिकच्या इतिहासाचा अभ्यास प्रामुख्याने सातवाहनकालीन लेणी, शिलालेख, धार्मिक परंपरा आणि ऐतिहासिक वास्तूंच्या माध्यमातून होत आला आहे. मात्र, ताम्रपटांमधील नासिकविषयक संदर्भ विविध संशोधनग्रंथ, अभिलेखीय प्रकाशने आणि ऐतिहासिक साधनांमध्ये विखुरलेले आहेत. हे संदर्भ एकत्रित करून त्यांचा नासिकच्या इतिहासाच्या दृष्टीने अर्थ लावण्याचा प्रयत्न या ग्रंथातून करण्यात आला आहे. नासिक हा केवळ धार्मिक महत्त्व असलेला प्रदेश नव्हता, तर प्राचीन काळातील राजकीय घडामोडी, प्रशासकीय व्यवस्था, भूमिदान, धार्मिक आश्रय आणि प्रादेशिक संबंध यांच्याशी जोडलेला महत्त्वपूर्ण भूभाग होता, हे ताम्रपटांमधून स्पष्ट होते. त्यामुळे नासिकच्या इतिहासातील अनेक अपरिचित पैलू समोर आणण्याबरोबरच स्थानिक इतिहास संशोधक, अभ्यासक, विद्यार्थी आणि इतिहासप्रेमींसाठी हा ग्रंथ महत्त्वपूर्ण संदर्भसाधन ठरणार आहे.
या प्रकाशन सोहळ्यात पुस्तकाचे मुखपृष्ठ साकारण्यात योगदान देणारे छायाचित्रकार स्वरूप डावखरे आणि चित्रकार अंकिता पाटील यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे. नासिकच्या प्राचीन इतिहासातील दुर्लक्षित साधनांकडे लक्ष वेधणाऱ्या या ग्रंथाच्या प्रकाशन सोहळ्यास इतिहास संशोधक, अभ्यासक, साहित्यप्रेमी, विद्यार्थी आणि नासिककर नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
Comments are closed.