NGN News
Latest Marathi News

त्र्यंबकेश्वर आणि सप्तशृंगी गड देवस्थानांना धमकीचा ई-मेल

  • मंदिर सुरक्षेत वाढ; शस्त्रधारी पोलीस तैनात; सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने तपासणी

नाशिक : सर्वत्र ऐन दिवाळीची धामधूम सुरु असताना जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर आणि सप्तशृंगी गड देवस्थानांना नुकसान पोहचवण्यासंदर्भात धमकीचा ई-मेल आल्याने खबाल उडाली आहे. या प्रकरणी दखल घेत मंदिर सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. दरम्यान, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी यांनी धमकी मिळाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. राज्यातील इतर काही प्रमुख देवस्थानांना देखील असे ई-मेल आल्याचे सांगण्यात येत आहे.

गेल्याच आठवड्यात नाशिक जिल्हा न्यायालयाला अशा प्रकारचा ई-मेल प्राप्त झाला होता. तथापि, प्रत्यक्षात काहीही घटना न घडल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला होता. मात्र, त्या प्रकरणाची चर्चा थांबत असतानाच लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या त्र्यंबकेश्वर आणि सप्तशृंगी गड देवस्थानांना नुकसान पोहचवण्याबाबत संदेश प्राप्त झाल्याने खळबळ उडाली आहे. त्याची दखल घेत पोलिसांनी या दोन्ही देवस्थानांसह नाशिकमधील काळाराम मंदिरात बंदोबस्त वाढवून खबरदारीची उपाययोजना केली आहे. पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, त्र्यंबकेश्वर आणि सप्तशृंगी गड मंदिर परिसरात प्रत्येकी पन्नासहून अधिक पोलीस तैनात करण्यात आले आहेत. दोन्ही ठिकाणी बारमाही भाविकांची मोठ्या संख्येने गर्दी होत असते. या पार्श्वभूमीवर शस्त्रधारी पोलीसही पहारा देत आहेत. मंदिरांत येणाऱ्या भाविकांना तपासणीअंती आत सोडण्यात येत आहे. शिवाय, सीसीटीव्ही फुटेज बारकाईने तपासण्यात येत आहे.

वरिष्ठ स्तरावर चौकशी सुरु

प्राप्त धमकीचा मजकूर आणि तत्संबंधी माहितीबाबत पोलिसांनी गोपनीयता पाळली असून या प्रकरणाची वरिष्ठ स्तरावर चौकशी सुरु असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली. परिसरात येणाऱ्या भाविकांवर पोलिसांची करडी नजर असल्याचेही सांगण्यात आले. दरम्यान, या प्रकरणी जनतेने घाबरून न जाता देवदर्शन सुरु ठेवण्याचे आवाहन पोलीस प्रशासाच्या वतीने करण्यात आले आहे.

@ त्र्यंबकेश्वर आणि सप्तशृंगी गड देवस्थानांना भेट देणाऱ्या भाविकांची संख्या लक्षणीय असल्याने पोलिसांनी प्राप्त धमकीचा ई-मेल गांभीर्याने घेतला आहे. दोन्ही ठिकाणी अतिरिक्त कुमक तैनात करण्यात आली असून सीसीटीव्ही फुटेज बारकाईने तपासण्यात येत आहे. भाविकांनी घाबरून जावू नये. पोलीस जनतेच्या सुरक्षेसाठी कटिबद्ध आहेत. या प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली असून उच्चस्तरीय चौकशी सुरु आहे.

  • डॉ. डी. एस. स्वामी, जिल्हा पोलीस अधीक्षक, नाशिक

Comments are closed.