NGN News
Latest Marathi News

टीसीएस प्रकरणाला राजकीय वळण; ‘बड्या’ नेत्याचे नाव आरोपींमध्ये !

  • निदा खानला आश्रय दिल्याच्या आरोपावरून इम्तियाज जलील यांच्यावर कारवाई; मतीन पटेल यांच्यानंतर एसआयटी तपासात एंट्री

** एनजीएन न्यूज नेटवर्क

नाशिक : टीसीएस कंपनीतील महिला अत्याचार आणि कथित धर्मांतर प्रकरणाने आता गंभीर राजकीय वळण घेतले आहे. एमआयएमचे नेते तथा माजी खासदार इम्तियाज जलील यांचाही या प्रकरणातील आरोपींमध्ये समावेश झाल्याची माहिती समोर आल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील संशयित आरोपी निदा खान हिला आश्रय दिल्याच्या आरोपावरून जलील यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे समजते. यापूर्वी एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल यांच्याविरोधातही याच प्रकरणात गुन्हा दाखल झाला होता. त्यामुळे या प्रकरणाचे धागेदोरे आता राजकीय वर्तुळापर्यंत पोहोचल्याची चर्चा सुरू झाली आहे.

नाशिक पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाच्या तपासासाठी विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना केली असून, त्यांच्यामार्फत विविध अंगांनी तपास सुरू आहे. प्राप्त माहितीनुसार, निदा खान प्रकरणात इम्तियाज जलील यांचा पोलिसांनी जबाब नोंदवला आहे. एमआयएम नगरसेवक मतीन पटेल यांच्या मोबाईल फोनमधून काही महत्त्वपूर्ण रेकॉर्डिंग पोलिसांच्या हाती लागल्याचे सांगितले जात आहे. या रेकॉर्डिंगच्या अनुषंगाने जलील यांचे व्हॉइस सॅम्पलही घेण्यात आल्याची माहिती आहे. या पुराव्यांच्या आधारे एसआयटीने त्यांच्याविरोधात तपासाची व्याप्ती वाढविल्याचे समजते.

निदा खानला आश्रय देण्याच्या प्रकरणात इम्तियाज जलील यांची भूमिका काय होती, याबाबत एसआयटीने न्यायालयालाही माहिती दिल्याचे वृत्त आहे. त्यामुळे आगामी काळात त्यांची पुन्हा चौकशी होण्याची शक्यता असून, तपासातील निष्कर्ष आणि न्यायालयीन प्रक्रियेत ते काय भूमिका मांडतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे, या प्रकरणात राजकीय नेत्यांची नावे समोर येत असल्याने तपासाला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे.

नवा राजकीय आयाम

दरम्यान, यापूर्वी न्यायालयाने दिलेल्या आदेशात टीसीएस प्रकरणाच्या प्राथमिक चौकशीत निदा खान हिने अन्य सहआरोपींसोबत मिळून पीडितेवर मानसिक प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केल्याचे प्रथमदर्शनी दिसत असल्याचे नमूद केले होते. पीडितेचा विश्वास संपादन करून ‘हिंदू धर्म योग्य नाही,’ असे सांगत तिची विचारसरणी आणि धर्म बदलण्याचा प्रयत्न केल्याचा उल्लेख एफआयआरमध्ये असल्याचेही न्यायालयीन निरीक्षणात स्पष्ट झाले आहे. त्यामुळे महिला अत्याचार, कथित धर्मांतर आणि आरोपींना आश्रय दिल्याच्या आरोपांमुळे आधीच चर्चेत असलेल्या या प्रकरणाला आता राजकीय आयाम मिळाला असून, एसआयटीच्या पुढील तपासाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Comments are closed.