NGN News
Latest Marathi News

धक्कादायक ! मालेगाव महापालिका आयुक्त, उद्यान अधीक्षक ‘एसीबी’ जाळ्यात

  • २० लाखांच्या बिलासाठी ४ टक्के लाचेची मागणी केल्याचा आरोप

** एनजीएन न्यूज नेटवर्क

मालेगाव : मालेगाव महानगरपालिकेतील कथित लाचखोरीच्या प्रकरणात नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) मोठी कारवाई केली आहे. महापालिका आयुक्त रवींद्र जाधव आणि उद्यान अधीक्षक नीलेश पाटील यांना एसीबीने ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. कब्रस्तानमधील गवत काढण्याच्या कामाच्या ठेक्यांशी संबंधित कंत्राटदाराची बिले मंजूर करण्यासाठी चार टक्के लाचेची मागणी केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. या कारवाईमुळे मालेगाव महापालिका प्रशासनात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, दोन वेगवेगळ्या कामांची एकूण २० लाख रुपयांची बिले मंजूर करण्याच्या प्रक्रियेत लाचेची मागणी करण्यात आल्याचा आरोप आहे. संबंधित कंत्राटदाराने याप्रकरणी नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने एसीबीने कारवाई केल्याचे सांगितले जात आहे. कब्रस्तान परिसरातील गवत काढण्याच्या कामांच्या ठेक्यांशी संबंधित आर्थिक व्यवहारांची चौकशी आता महत्त्वाची ठरणार आहे. मात्र, लाचेची नेमकी किती रक्कम मागितली होती, प्रत्यक्ष रक्कम स्वीकारली गेली का आणि कारवाईदरम्यान कोणते पुरावे आढळले, याबाबत अधिकृत तपशील समोर येणे आवश्यक आहे.

उद्या होती सेवानिवृत्ती ..

या संपूर्ण प्रकरणातील सर्वाधिक चर्चेचा मुद्दा म्हणजे आयुक्त रवींद्र जाधव हे ३० ऑक्टोबर रोजी सेवानिवृत्त होणार होते. सेवानिवृत्तीच्या अवघ्या एक दिवस आधीच त्यांच्यावर एसीबीची कारवाई झाल्याने प्रशासकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे. या प्रकरणाचा त्यांच्या सेवानिवृत्तीविषयक लाभांवर काय परिणाम होणार, याकडेही लक्ष लागले आहे. मात्र, केवळ कारवाई झाल्यामुळे निवृत्तीवेतन किंवा अन्य लाभ आपोआप रोखले जातात असे नाही; त्याबाबत संबंधित नियम, विभागीय निर्णय आणि पुढील कायदेशीर प्रक्रियेवर परिस्थिती अवलंबून असेल.

Comments are closed.