NGN News
Latest Marathi News

रेल्वे आरक्षण केंद्रांवर आता १० लाखांचा प्रवास विमा !

  • आरक्षित तिकीट काढताना प्रवाशांना विमा निवडण्याचा पर्याय

** एनजीएन न्यूज नेटवर्क

लासलगाव : राकेश बोरा

रेल्वे प्रवासादरम्यान अपघात किंवा अनुचित घटनेमुळे उद्भवणाऱ्या आर्थिक संकटापासून प्रवाशांना संरक्षण मिळावे, यासाठी भारतीय रेल्वेने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यापुढे ऑनलाइन तिकीट बुकिंगसोबतच रेल्वेच्या प्रवासी आरक्षण केंद्रांवरून (पीआरएस) आरक्षित तिकीट काढतानाही ऐच्छिक प्रवास विमा घेता येणार आहे. ही सुविधा २७ ऑक्टोबर २०२६ पासून लागू होणार असून, अवघ्या ४५ पैशांच्या विमा शुल्कात प्रवाशांना १० लाख रुपयांपर्यंतचे संरक्षण मिळू शकणार आहे.

सध्या आयआरसीटीसीच्या माध्यमातून ऑनलाइन ई-तिकीट बुक करणाऱ्या प्रवाशांना ऐच्छिक प्रवास विमा घेण्याची सुविधा उपलब्ध आहे. आता ही सुविधा प्रत्यक्ष रेल्वे आरक्षण केंद्रांवरून तिकीट काढणाऱ्या प्रवाशांनाही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे ऑनलाइन तिकीट बुक न करणाऱ्या प्रवाशांनाही या योजनेचा लाभ घेता येईल.

या योजनेनुसार, रेल्वे अपघात किंवा अनुचित घटनेमुळे प्रवाशाचा मृत्यू झाल्यास १० लाख रुपये, कायमस्वरूपी पूर्ण अपंगत्व आल्यास १० लाख रुपये, तर कायमस्वरूपी अंशतः अपंगत्व आल्यास ७.५ लाख रुपयांपर्यंत विमा संरक्षण मिळेल. दुखापतीमुळे रुग्णालयात दाखल होण्याच्या खर्चासाठी दोन लाख रुपयांपर्यंत, तर मृतदेह वाहतुकीसाठी १० हजार रुपयांपर्यंतची तरतूद आहे.

डिजिटल पेमेंटद्वारे विमा शुल्क

आरक्षण केंद्रावरून विमा घेऊ इच्छिणाऱ्या प्रवाशांना आपला मोबाईल क्रमांक द्यावा लागेल. विम्याचे शुल्क केवळ डिजिटल पेमेंटद्वारे भरता येणार आहे. विमा निवडणाऱ्या प्रवाशांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर पॉलिसीचा तपशील पाठविण्यात येईल. आरक्षण केंद्रावरील कर्मचारी प्रवाशांना विमा निवडण्यास मदत करतील आणि आवश्यक माहिती नोंदवतील.

ही योजना ऐच्छिक असून, प्रवाशांना तिकीट आरक्षित करताना विमा घेण्याचा पर्याय निवडता येईल. विमा संरक्षणाचा लाभ विद्यमान योजनेच्या अटी व शर्तींनुसार मिळणार आहे. मध्य रेल्वेने प्रवाशांना या सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.

Comments are closed.