मविप्रच्या १ लाख २८ हजार ७५९ विद्यार्थ्यांनी राज्यपालांच्या उपस्थितीत घेतली व्यसनमुक्तीची शपथ
——————————
** एनजीएन न्यूज नेटवर्क
नाशिक : भारत हा जगातील सर्वाधिक तरुण लोकसंख्या असलेल्या देशांपैकी एक आहे. देशातील ३५ वर्षांखालील तरुणांची मोठी लोकसंख्या ही भारताची ताकद आहे. या युवाशक्तीला योग्य दिशा, मूल्याधिष्ठित शिक्षण आणि कौशल्यांची जोड दिल्यास विकसित भारताचे स्वप्न साकार होऊ शकते. केवळ स्वतः सक्षम होऊन चालणार नाही, तर इतरांनाही सक्षम करण्याची जबाबदारी तरुणांनी स्वीकारली पाहिजे. चारित्र्यनिर्मिती, व्यसनमुक्ती, क्रीडासंस्कृती आणि राष्ट्राप्रती समर्पण या मूल्यांच्या आधारेच सशक्त भारताची उभारणी करता येईल, असे प्रतिपादन राज्यपाल महामहिम जिष्णू देव वर्मा यांनी केले.
मराठा विद्या प्रसारक समाज, नाशिक आणि एस.जे.जे. ॲनालिटिकल लॅबोरेटरी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सशक्त युवा, सशक्त भारत’ अभियानांतर्गत बुधवार दि. २८ रोजी महाकवी कालिदास कलामंदिरमध्ये आयोजित ‘नो ड्रग्ज’ या सामाजिक उपक्रमाप्रसंगी प्रमुख मान्यवर म्हणून ते बोलत होते. यावेळी मराठा विद्या प्रसारक समाजाच्या विविध शाखांमधील तब्बल १ लाख २८ हजार ७५९ विद्यार्थ्यांनी अमली पदार्थांपासून दूर राहण्याची शपथ घेत एक नवा विक्रम केला आहे. याप्रसंगी व्यासपिठावर नाशिकचे पालकमंत्री तथा कुंभमेळामंत्री गिरीश महाजन, न्यायाधीश मदन गोसावी, न्यायाधीश दिलीप घुमरे, राज्यपालांचे सचिव प्रशांत नारनवरे, मविप्रचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे, एसजेजे ॲनालिटिकल लॅबोरेटरीचे संचालक ॲड. महेश सावंत उपस्थित होते.
यावेळी वंदे मातरम, राष्ट्रगीत आणि महाराष्ट्र गीताने कार्यक्रमाला सुरुवात झाली आणि वंदे मातरम, राष्ट्रगीतानेच कार्यक्रमाचा शेवटही करण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. मविप्रचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे यांच्या हस्ते राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांना प्रभू रामचंद्रांची मूर्ती, शाल देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. मविप्रचे सभापती बाळासाहेब क्षीरसागर आणि उपाध्यक्ष विश्वास मोरे यांच्या हस्ते कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांचे स्वागत करण्यात आले. मविप्रचे संचालक ॲड. संदीप गुळवे यांच्या हस्ते राज्यपालांचे सचिव प्रशांत नारनवरे यांचे, तर मविप्रचे संचालक विजय पगार यांच्या हस्ते न्यायाधीश दिलीप घुमरे यांचे स्वागत करण्यात आले. ॲड. महेश सावंत यांनी प्रास्ताविक केले. माजी आमदार जयंत जाधव यांनी आभार मानले.
यावेळी राज्यपाल जिष्णू देव वर्मा म्हणाले की, विद्यार्थी दशेत लागलेल्या सवयीच तुमचे चारित्र्य घडवितात. या चारित्र्यतूनच भविष्य घडते. त्यामुळे जर चारित्र्य घडवायचे असेल तर व्यसनांपासून दूर राहा. उत्तम चारित्र्य असणारा माणूस जीवनात एखाद्या गोष्टीवर मन एकाग्र करू शकतो आणि ही एकाग्रताच तुम्हाला यशापर्यंत पोहोचवते. तुमचे हे यश म्हणजेच या देशाचे यश आहे. ज्या देशातील ६५ टक्क्यांपेक्षा अधिक जणांचे वय ३५ हून कमी आहे, असा आपला तरुणांचा भारत देश आहे. तुम्ही तरूण देशाचे भविष्य आहात. म्हणूनच तुमचे चारित्र्य चांगले असणे गरजेचे आहे. हे चारित्र्य केवळ अभ्यास करून किंवा पुस्तके वाचून होणार नाही. त्यासाठी तुम्हाला चांगल्या सवयी अंगिकाराव्या लागतील व व्यसनांपासून दूर राहावे लागेल. या देशातील तरुणांच्या ऊर्जेला योग्य दिशा देण्याचे काम शिक्षक-पालकांनी करणे गरजेचे असल्याचेही राज्यपाल वर्मा यावेळी म्हणाले. यावेळी राज्यपाल वर्मा यांनी आयोजक मविप्र संस्था आणि एसजेजे ॲनालिटिकल लॅबोरेटरीचे कौतुक केले.
या कार्यक्रमाप्रसंगी मविप्रचे सभापती बाळासाहेब क्षीरसागर, उपाध्यक्ष विश्वास मोरे, संचालक ॲड. संदीप गुळवे, विजय पगार, ॲड. लक्ष्मण लांडगे, अमित बोरसे, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, डॉ. हिरालाल पवार, राजाभाऊ मोगल, निशिगंधा मोगल, रावसाहेब जाधव आदींसह मविप्रचे सभासद, सर्व शिक्षणाधिकारी, सर्व प्राचार्य, विभागप्रमुख, शिक्षक, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
————————————–
व्यसनमुक्तीची शपथ कृतीत उतरवा : पालकमंत्री गिरीश महाजन
सुमारे एक लाख २८ हजार ७५९ विद्यार्थ्यांनी अमली पदार्थांपासून दूर राहण्याची शपथ घेतली आहे. या शपथेचे पालन करणे ही प्रत्येक विद्यार्थ्याची जबाबदारी आहे. केवळ स्वतः व्यसनांपासून दूर राहणे पुरेसे नाही, तर मित्र आणि नातेवाइकांनाही व्यसनमुक्त जीवनासाठी प्रोत्साहित केले पाहिजे. व्यसनाच्या आहारी गेलेल्या व्यक्तींना दोष देण्याऐवजी त्यांना समुपदेशन आणि योग्य मदत मिळवून देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. समाजातील प्रत्येक घटकाने व्यसनमुक्तीसाठी पुढाकार घेतल्यास या मोहिमेला व्यापक यश मिळू शकते. मविप्र संस्था आणि एसजेजे लॅबोरेटरीने आयोजित केलेला हा स्तुत्य उपक्रम खरोखर कौतुकास्पद असल्याचेही पालकमंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.
————————————–
अमली पदार्थांपासून दूर राहा : ॲड. नितीन ठाकरे
अमली पदार्थांचे व्यसन तरुणांची एकाग्रता, आरोग्य आणि चारित्र्य यांचे नुकसान करते. व्यसनामुळे केवळ संबंधित व्यक्तीचेच नव्हे, तर तिच्या कुटुंबाचे आणि समाजाचेही नुकसान होते. तरुणांचे यश किंवा अपयश हे केवळ त्यांच्यापुरते मर्यादित नसते; त्याचा परिणाम कुटुंब, समाज, राज्य आणि देशावरही होतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी व्यसनांपासून दूर राहून आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. व्यसनमुक्त तरुणाई ही विकसित भारताच्या निर्मितीसाठी आवश्यक आहे. सुसंस्कारित पिढी तयार करणे ही जबाबदारी मानून मविप्र संस्था प्रयत्नशील आहे. राजभवनाने मविप्र संस्थेला या उपक्रमाची संधी दिली, त्याबद्दल महामहीम राज्यपाल महोदयांचे आभार मानतो, असेही ॲड. नितीन ठाकरे म्हणाले.
————————————–
व्यसनमुक्तीचा संदेश तळागाळापर्यंत पोहोचवू : ॲड. महेश सावंत
पंतप्रधानांच्या क्रीडा आणि निरोगी भारताच्या संकल्पनेनुसार तरुणांनी खेळांना आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनवले पाहिजे. खेळांमुळे शारीरिक क्षमता वाढते, मानसिक स्वास्थ्य सुधारते, एकाग्रता विकसित होते आणि संघभावना दृढ होते. विजय स्वीकारण्याइतकेच पराभवातून शिकण्याचे सामर्थ्यही खेळातून मिळते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच क्रीडाक्षेत्रातही सक्रिय सहभाग घ्यावा. तरुणांना व्यसनांपासून परावृत्त करण्यासाठी आम्ही आयुष्यभर कटिबद्ध राहू आणि व्यसनमुक्तीचा संदेश तळागाळापर्यंत पोहोचवू अशी ग्वाही देतो, असे ॲड. महेश सावंत यांनी सांगितले.
————————————–
…यांचा झाला सन्मान
याप्रसंगी राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्या हस्ते स्तुत्य उपक्रम आयोजित केल्याबद्दल मविप्रचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे व एसजेजे ॲनालिटिकल लॅबोरेटरीचे संचालक ॲड. महेश सावंत यांना सन्मानित करण्यात आले. तसेच, महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलचे अध्यक्ष ॲड. जयंत जायभावे, नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, एशियन गेम्समध्ये दोन सुवर्णपदक मिळविणारा खेळाडू दिलीप गावित व प्रशिक्षक वैजनाथ काळे, एशियन गेम्समध्ये रौप्यपदक मिळविणारा सर्वेश कुशारे व प्रशिक्षक रावसाहेब जाधव, स्त्रीधन सीमेवरील जवानांना अर्पण करणाऱ्या माजी आमदार निशिगंधा मोगल व राजाभाऊ मोगल, हजारो हृदयरुग्णांना जीवदान देणारे प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. हिरालाल पवार, मिलिंद जोशी, युवा उद्योजक शिवम यादव यांना शाल व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
——————————
१५० शाखांमध्ये लाइव्ह प्रसारण
दि. २३ ते २८ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत अवघ्या पाच दिवसांत एकूण १,२८,७५९ जणांनी नोंदणी पूर्ण केली. या नोंदणीमध्ये १,२२,२९१ विद्यार्थी, ४,४२२ शिक्षक, १,११४ पालक आणि ९३२ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या सर्वांनी राज्यपाल महोदयांच्या प्रमुख उपस्थितीत प्रत्येक शाखेवर, विविध सभागृहांमध्ये, शाळा-महाविद्यालयांच्या मैदानांवर लाइव्ह कार्यक्रमात सहभागी होत अमली पदार्थांपासून दूर राहण्याची शपथ घेतली. विशेष म्हणजे मविप्र संस्थेच्या सुमारे १५० शाखांमध्ये सदर कार्यक्रमाचे लाइव्ह प्रसारण करण्यात आले. सध्या सहामाही परीक्षा सुरु असल्याने काही शाखांमधील विद्यार्थी-शिक्षक सहभागी होऊ शकले नाही.
Comments are closed.