- केबीटी अभियांत्रिकी महाविद्यालय विद्यार्थी वसतिगृहाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन
** एनजीएन न्यूज नेटवर्क
नाशिक : खेड्यापाड्यांतून, वाड्या-वस्त्यांवरून उच्च शिक्षणासाठी आणि इंजिनिअर बनण्याचे स्वप्न डोळ्यांत घेऊन नाशिकमध्ये येणाऱ्या मुलांना स्वतःच्या घरासारखी सुरक्षित आणि सर्व सोयीसुविधा असलेली निवासाची जागा आज उपलब्ध झाली आहे. मविप्रचे हे नवीन वसतिगृह राज्यभरातील विद्यार्थ्यांसाठी एक हक्काचे घरकुल ठरेल, असा विश्वास राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या गंगापूर रोडवरील उदोजी मराठा बोर्डिंग कॅम्पसमध्ये उभारण्यात आलेल्या कर्मवीर ॲड. बाबुराव गणपतराव ठाकरे (केबीटी) अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मुलांच्या वसतिगृहाच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी त्यांनी मविप्रच्या ११२ वर्षांच्या शैक्षणिक कार्याचे कौतुक केले.
अध्यक्षस्थानी शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे होते. व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, मविप्रचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे, सभापती बाळासाहेब क्षीरसागर, अध्यक्ष डॉ. सुनील ढिकले, उपाध्यक्ष विश्वास मोरे, उपसभापती देवराम मोगल, चिटणीस दिलीप दळवी, महापौर हिमगौरी आडके-आहेर, खासदार राजाभाऊ वाजे, खासदार भास्करराव भगरे, आमदार सीमा हिरे, आमदार गोकुळ गिते, नगरसेवक प्रमोद पालवे व सर्व मविप्र संचालक मंडळ, आजी-माजी पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचे शिक्षण आणि त्यांचे उज्ज्वल भविष्य घडविण्याचे काम मविप्र संस्था करते आहे. अडीच लाख विद्यार्थी आज या संस्थेत शिक्षण घेत आहेत. मराठा विद्या प्रसारक समाज ही संपूर्ण महाराष्ट्रातील सर्वांत नावाजलेल्या शिक्षण संस्थांपैकी एक आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. याचे सर्व श्रेय संस्थेच्या सर्व कर्मवीरांना जाते, असे ते म्हणाले. संस्थेला शुभेच्छा देताना त्यांनी मविप्र परिवारातील सर्व पदाधिकारी, सभासद, विद्यार्थी आणि शिक्षकांचे अभिनंदन केले. शंभर वर्षांपूर्वी लावलेल्या रोपट्याचे आज वटवृक्षात रूपांतर झाले आहे आणि या वटवृक्षाच्या थंडगार सावलीत आज लाखो विद्यार्थी शिकत आहेत, ही मोठी उपलब्धी आहे. खऱ्या अर्थाने शून्यातून विश्व निर्माण करण्याचे काम या संस्थेने केले आहे, असेही त्यांनी नमूद केले.
मविप्रचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे म्हणाले, या वसतिगृहाची इमारत १३ मजली असून, त्यामध्ये १४३ खोल्यांची व्यवस्था आहे. ६०० हून अधिक विद्यार्थ्यांना येथे निवासाची व्यवस्था उपलब्ध होणार आहे. सुमारे ७,४०० चौरस मीटर क्षेत्रफळाच्या या इमारतीच्या बांधकामासाठी अंदाजे ३१ कोटी ५० लाख रुपये खर्च झाला आहे. प्रत्येक खोलीत स्वतंत्र शौचालय व स्नानगृह, सीसीटीव्ही, लिफ्ट, भोजन व्यवस्था, लॉन्ड्री, जिमखाना, शुद्ध पिण्याचे पाणी आणि २४ तास गरम पाणी आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. बांधकामा-दरम्यान परिसरातील जुन्या वृक्षांचे अस्तित्व जपण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच, त्यांनी संस्थेच्या इतिहासावर भाष्य करत कर्मवीरांना अभिवादन केले आणि वसतिगृहातील सुविधा व इमारतीची वैशिष्ट्ये उपस्थितांना सांगितली.
मविप्रचे उपाध्यक्ष विश्वास मोरे यांनी आभार मानले. प्रा. तुषार पाटील यांनी सूत्रसंचालन केले. मराठा हायस्कूलमधील दिनकर दांडेकर संगीत मंचाने यांच्या स्वागतगीत सादर केले. खासदार राजाभाऊ वाजे यांचा सत्कार सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे यांनी, तर खासदार भास्कर भगरे यांचा सत्कार संस्थेचे सभापती बाळासाहेब क्षीरसागर यांनी केला. आमदार सीमा हिरे यांचा सत्कार संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुनील ढिकले यांनी केला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते वास्तुविशारद धनंजय शिंदे व जान्हवी शिंदे आणि क्रांती कन्स्ट्रक्शन्सचे अभिजित बनकर व दिलीप भोज यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास संस्थेचे आजी-माजी पदाधिकारी, सभासद, स्थानिक व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, सदस्य, सेवक, पालक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments are closed.