
** एनजीएन न्यूज नेटवर्क
नाशिक : मुंबई-आग्रा महामार्गावरील राणेनगर उड्डाणपुलावर शुक्रवारी (दि. २३) सकाळी कंटेनरच्या धडकेत शीतल दीपक नरवले (वय ३०, रा. शुभम पार्क, नवीन नाशिक) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, एका तरुण वकिलाचा असा अचानक अंत झाल्याने शोककळा पसरली आहे.
शीतल नरवले या नेहमीप्रमाणे आपल्या दुचाकीने (एमएच १५ एफएल ९५९०) कामावर जात होत्या. हॉटेल स्नेहींतसमोरील उड्डाणपुलावरून जात असताना मुंबईकडून नाशिकच्या दिशेने येणाऱ्या कंटेनरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडकेचा जोर इतका भीषण होता की, त्या रस्त्यावर कोसळल्या. गंभीर दुखापत होऊन मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. सकाळच्या वेळेत घडलेल्या या भीषण अपघाताने महामार्गावरील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
काही काळ वाहतूक कोंडी
अपघातानंतर कंटेनरचालक घटनास्थळावरून पसार झाला. घटनेची माहिती मिळताच अंबड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पुढील कार्यवाही सुरू केली. अपघातामुळे मुंबई-आग्रा महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. कामानिमित्त घराबाहेर पडलेल्या शीतल नरवले यांच्यावर काळाने घाला घातल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या दुर्दैवी घटनेमुळे नवीन नाशिक परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
Comments are closed.