- महाराष्ट्र अंनिसच्या हस्तक्षेपाने पत्नीची सुटका; पोलिसांसमक्ष पतीसोबत राहण्याचा दिला जबाब
- दिंडोरीतील प्रकरणाने खळबळ; पोलिस अधिकारी व भोंदूबाबावर कारवाईची अंनिसची मागणी
** एनजीएन न्यूज नेटवर्क
नाशिक : दिंडोरी येथे रीतसर प्रेमविवाह करणाऱ्या सज्ञान जोडप्याला पोलिसांकडून मारहाण झाल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. मुलीच्या नातेवाईकांनी विवाहास विरोध करून तिला जबरदस्तीने पळवून नेल्याचा आरोपही करण्यात आला आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या (अंनिस) हस्तक्षेपानंतर संबंधित पत्नीची सुटका झाली असून, बुधवारी रात्री उशिरा तिने पोलिसांसमक्ष पतीसोबत राहण्याचा जबाब दिला. त्यानंतर पोलिसांनी तिला पतीच्या ताब्यात दिले. या घटनेमुळे प्रेमविवाह, पोलिसांची भूमिका आणि अंधश्रद्धेच्या नावाखाली होणाऱ्या कथित अत्याचारांचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.
संतोष आणि संगीता (दोघांची नावे बदलली आहेत) हे दिंडोरी येथील रहिवासी असून, संतोष संगणक अभियंता तर संगीता औषधनिर्माणशास्त्राची पदवीधर आहे. गेल्या चार वर्षांपासून त्यांचे प्रेमसंबंध होते. दोघेही एकाच जातीतील असतानाही समाजातील उच्च-नीचतेच्या अवैज्ञानिक समजुतींमुळे संगीताच्या कुटुंबीयांनी त्यांच्या विवाहाला विरोध केला. अखेर दोघांनी 31 ऑक्टोबर रोजी स्वतःच्या इच्छेने वैदिक पद्धतीने विवाह केला. त्यानंतर संगीताच्या नातेवाईकांनी तिच्या अपहरणाची तक्रार दिंडोरी पोलिसांत दाखल केली. संतोष आणि संगीता स्वतःहून पोलिस ठाण्यात हजर झाले व त्यांनी विवाहाची कागदपत्रे सादर केली. मात्र, संगीताच्या नातेवाईकांनी जमाव जमवून स्थानिक राजकीय व्यक्तीच्या मदतीने पोलिसांवर दबाव आणल्याचा आरोप अंनिसने केला आहे.
जबाब नोंदवण्यास टाळाटाळ
पोलिस ठाण्यात संगीताच्या नातेवाईकांनी तिच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. यावेळी एका पोलिस अधिकाऱ्याने संतोषला चुकीचे कृत्य केल्याचे सांगत तुच्छतादर्शक शब्दांत शिवीगाळ करून कानाखाली मारल्याचा आरोप आहे. महिला पोलिस अधिकाऱ्याने संगीताला मारहाण केल्याचेही सांगण्यात आले. दोघांच्या जीवाला नातेवाईकांकडून धोका असल्याचा जबाब नोंदविण्यास पोलिसांनी टाळाटाळ केली. दरम्यान, पोलिस ठाण्याच्या आवारातच संतोषच्या वडिलांना जमावाने रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण केल्याचा आरोप आहे. संतोषने मारहाणीची तक्रार देण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी ती स्वीकारण्यास नकार दिला. पोलिस ठाण्यातून बाहेर पडताना जमावाने पुन्हा जोडप्याला मारहाण करून संगीताला जबरदस्तीने पळवून नेल्याचे अंनिसने म्हटले आहे.
भोंदूबाबाने सांगितले, दोन महिन्यात..
संगीताला पहाटे सिन्नर तालुक्यातील शहापांचाळे येथील एका कथित भोंदूबाबाकडे नेण्यात आले. संतोषसोबत राहिल्यास दोन महिन्यांत त्याचा मृत्यू होईल, असे भोंदूबाबाने संगीताला सांगितल्याचा आरोप आहे. तसेच पाण्यातून उदी पाजणे, धागा व मंत्रोच्चारित लिंबू नदीत सोडणे आणि कपडे फाडून अघोरी विधी करणे असे प्रकार करण्यात आल्याचे सांगण्यात आले. मात्र, संगीताने संतोषसोबत जाण्याचा आग्रह कायम ठेवला. दुसऱ्या दिवशी संतोषने महाराष्ट्र अंनिसच्या जातपंचायत मुठमाती अभियानाचे राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे यांच्याशी संपर्क साधला. अंनिसच्या कार्यकर्त्यांनी संतोष व त्याच्या नातेवाईकांसह अतिरिक्त पोलिस आयुक्त विमला एम. यांची भेट घेतली. त्यांनी दिंडोरी पोलिसांची कानउघडणी करून संगीताला तातडीने पोलिस ठाण्यात हजर करून तिचा जबाब नोंदविण्याचे आदेश दिले. त्यानुसार बुधवारी रात्री उशिरा संगीताने नाशिक तालुका पोलिस ठाण्यात संतोषसोबत राहण्याचा जबाब दिला आणि पोलिसांनी तिला कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत संतोषच्या ताब्यात दिले.
कारवाईची मागणी
क्रौर्यावर प्रेमाचा विजय झाल्याची भावना या जोडप्याने व्यक्त केली. मात्र, जीवाला धोका असल्याने त्यांना सेफ होममध्ये प्रवेश देण्याची, संतोषला दमदाटी व मारहाण करणाऱ्या दिंडोरी पोलिस अधिकाऱ्यांची चौकशी करून कारवाई करण्याची तसेच कथित भोंदूबाबावरही कायदेशीर कारवाई करण्याची मागणी अंनिसच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. या मोहिमेत अंनिसचे राज्य प्रधान सचिन डॉ. टी.आर. गोराणे, राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे, राज्य सदस्य प्रल्हाद मिस्री, रंजन लोंढे आणि ॲड. विद्या चांदगुडे सहभागी झाले होते.
Comments are closed.