NGN News
Latest Marathi News

विंचूर-लासलगाव परिसर बनतोय राज्याचा नवा ‘मिल्क बेल्ट’

  • आधुनिक चिलिंग प्रकल्प आणि शासकीय मानकांमुळे दुधाचा दर्जा वाढला !

** एनजीएन न्यूज नेटवर्क

विंचूर : मच्छिंद्र साळुंखे

कांदा आणि द्राक्षांचे आगार म्हणून जागतिक नकाशावर ओळखल्या जाणाऱ्या लासलगाव आणि विंचूर परिसराने आता दुग्ध व्यवसायातही मोठी भरारी घेतली आहे. हा संपूर्ण परिसर आता वेगाने एक अग्रगण्य ‘डेअरी हब’ (मिल्क हब) म्हणून उदयास येत आहे. विशेष म्हणजे, केवळ दुधाचे उत्पादन वाढवणे एवढाच उद्देश न ठेवता, नागरिकांच्या आरोग्याची जपणूक करण्यासाठी शासकीय मानांकानुसार अत्यंत शास्त्रोक्त पद्धतीने येथे दूध संकलन केले जात आहे.

या भागात उभारण्यात आलेले आधुनिक ‘बल्क मिल्क चिलिंग’ (दूध शीतकरण) प्रकल्प येथील दुग्ध व्यवसायाचा कणा ठरत आहेत. दूध काढल्यापासून ते ग्राहकांपर्यंत पोहोचेपर्यंत त्याची गुणवत्ता टिकवून ठेवण्यासाठी हे अत्याधुनिक चिलिंग प्लांट्स अत्यंत प्रभावी ठरत आहेत. दुधाची शुद्धता आणि गुणवत्ता टिकवून ठेवण्यासाठी शेतकरी आणि संकलन केंद्रचालक दोघांकडूनही विशेष काळजी घेतली जात आहे.

दुधाची गुणवत्ता टिकवण्यासाठी शेतकऱ्यांनी घ्यावयाची काळजी

दर्जेदार दुग्धोत्पादनासाठी आणि चांगला दर मिळवण्यासाठी
पशुपालक शेतकऱ्यांनी खालील बाबींचे पालन करण्यात येत आहे

दूध काढण्यापूर्वी गाई-म्हशींची कास कोमट पाण्याने स्वच्छ धुवून कोरडी करावी. गोठा नेहमी स्वच्छ व कोरडा असावा.

दूध काढण्यासाठी आणि वाहतुकीसाठी नेहमी स्टेनलेस स्टीलच्या भांड्यांचा वापर करावा. ती भांडी दररोज गरम पाण्याने किंवा चांगल्या डिटर्जंटने धुवून उन्हात वाळवावीत.

दूध उत्पादक शेतकऱ्यांनी करावयाचे
वेळेचे अचूक नियोजन

दूध काढल्यानंतर शक्यतो १ ते २ तासांच्या आत ते संकलन केंद्रावर पोहोचवणे गरजेचे आहे, जेणेकरून दुधात जिवाणूंची वाढ होणार नाही.
दुधात पाणी किंवा इतर कोणतेही बाह्य पदार्थ मिसळू नयेत. तसेच, जनावरांवर अँटिबायोटिक्स (प्रतिजैविके) उपचार सुरू असल्यास, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ठराविक दिवस ते दूध संकलनासाठी पाठवू नये.

संकलन केंद्रावर दूध आणण्यापूर्वी ते स्वच्छ मलमलच्या कापडाने किंवा गाळणीने गाळून घ्यावे

लोकांच्या आरोग्याशी थेट संबंध असल्याने दूध संकलन केंद्रांची जबाबदारी अधिक वाढते.

केंद्रांकडून खालील मुद्द्यांवर विशेष लक्ष देण्यात येते

तातडीने चिलिंग (शीतकरण) करणे:

संकलन केंद्रावर दूध जमा होताच ते लवकरात लवकर ४ अंश सेल्सिअस तापमानाला चिलिंग प्लांटमध्ये थंड करणे आवश्यक आहे. यामुळे दुधाची नैसर्गिक चव आणि गुणवत्ता टिकून राहते.

मशिनरी व कॅनची नियमित स्वच्छता:

संकलन केंद्रातील वजन काटे, टेस्टिंग मशिन्स, पाईपलाईन्स आणि साठवणुकीच्या टाक्या (Silos) दररोज ‘सीआयपी’ (CIP – Cleaning In Place) पद्धतीने केमिकल व गरम पाण्याने स्वच्छ कराव्यात.

पारदर्शक व अचूक चाचणी :

शेतकऱ्यांच्या समोरच अत्याधुनिक उपकरणांद्वारे दुधाची फॅट , एस.एन.एफ. आणि भेसळ तपासली जावी, ज्यामुळे गुणवत्तेची खात्री पटेल.

संकलन केंद्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी स्वच्छता पाळणे, मास्क-हातमोजे वापरणे आणि नियमित वैद्यकीय तपासणी करणे आवश्यक आहे.

चिलिंग सेंटरमधून मुख्य प्रक्रिया प्लांटकडे दूध वाहून नेणारे इन्सुलेटेड टँकर्स पूर्णपणे निर्जंतुक आणि तापमान नियंत्रित असणे गरजेचे आहे.

बदलाचे सकारात्मक चित्र

विंचूर आणि लासलगाव परिसरातील हा बदल स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठी गती देणारा ठरत आहे. शेतीला पूरक असणारा हा व्यवसाय आता आधुनिक तंत्रज्ञानाच्या जोडीने मुख्य व्यवसाय बनत आहे. शासकीय मानकांचे काटेकोर पालन होत असल्याने येथील दुधाला मुंबई, ठाणे आणि नाशिक सारख्या मोठ्या शहरांमधून प्रचंड मागणी नोंदवली जात आहे. योग्य नियोजन, आधुनिक चिलिंग यंत्रणा आणि शेतकरी-केंद्रचालक यांच्यातील समन्वयामुळे विंचूर-लासलगावचा हा ‘डेअरी पॅटर्न’ संपूर्ण राज्यासाठी भूषणावह ठरत आहे.

चौकट ##

“विंचूर परिसर डेअरी हब म्हणून विकसित होत असताना, आम्ही केंद्रावरील स्वच्छतेची विशेष काळजी घेतो. पाईपलाईन्स आणि साठवणुकीच्या टाक्या दररोज केमिकल व गरम पाण्याने निर्जंतुक (CIP) केल्या जातात. शेतकऱ्यांच्या समोरच ऑटोमॅटिक मशिन्सद्वारे फॅट आणि एस.एन.एफ. ची पारदर्शक तपासणी केली जाते. शेतकऱ्यांनी वेळेत दूध आणल्यास आणि केंद्राने तातडीने ते चिलिंग केल्यास दुधाचा दर्जा सर्वोत्तम राहतो, हे आम्ही प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिले आहे.”
कुमार चव्हाण , विंचूर.

चौकट ##


ग्राहकांच्या आरोग्याची जपणूक करणे हे आमचे पहिले कर्तव्य आहे. विंचूर परिसरातील आमच्या केंद्रावर शेतकरी दूध आणताच, आम्ही ते अत्याधुनिक चिलिंग प्लांटच्या साहाय्याने तातडीने ४ अंश सेल्सिअस तापमानापर्यंत थंड करतो. यामुळे दुधातील नैसर्गिक घटक आणि ताजेपणा जसाच्या तसा टिकून राहतो. शासकीय मानकांचे (FSSAI) काटेकोर पालन करूनच पुढील वाहतूक केली जाते, ज्यामुळे या भागातील दुधाची बाजारातील पत कमालीची वाढली आहे.

  • बाजीराव क्षीरसागर, लासलगाव,

चौकट ##​

हवामानातील बदलांमुळे कांदा आणि द्राक्ष शेतीमध्ये कधी नफा तर कधी मोठे नुकसान सहन करावे लागते. अशा परिस्थितीत दुग्ध व्यवसाय हा आमच्यासाठी मुख्य आर्थिक उत्पन्नाचा स्रोत बनला आहे. दुधाचे भाव स्थिर असल्याने दर महिन्याला हक्काचे उत्पन्न हातात येते. घरातूनच स्वच्छतेची काळजी घेऊन आम्ही १ ते २ तासांत दूध केंद्रावर पोहोचवतो. त्यामुळे चांगल्या गुणवत्तेची खात्री मिळून फॅटही उत्तम भरते. विंचूर परिसर डेअरी हब झाल्याचा थेट फायदा आम्हा शेतकऱ्यांना होत आहे.”
रवींद्र कोटकर, पशुपालक शेतकरी, निमगाव (वा ).

Comments are closed.