
- नाशिक महापालिकेतील नगरसेवकांशी ‘मातोश्री’ वर खलबते
** एनजीएन न्यूज नेटवर्क
नाशिक : विकास निधीच्या नावाखाली पक्षांतराचे आमिष टाळून तुम्ही निष्ठा दाखवली, हे निश्चितच अभिनंदनीय आहे. सध्या आपला पक्ष संक्रमणावस्थेतून वाटचाल करतोय, ही वस्तुस्थिती आहे. तथापि, काही दिवस धीर धरा, आपल्या निश्चित गतवैभव प्राप्त होईल, असा विश्वास शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज व्यक्त केला. नाशिक महापालिकेतील नगरसेवकांनी ‘मातोश्री’ वर ठाकरे यांची भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते.
नाशिकचे १५ पैकी बारा उबाठा नगरसेवक शिन्देसेनेच्या गळाला लागणार असल्याच्या बातमीने राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. फुटीर नगरसेवक नेमके कोण या विषयाची उबाठा पक्षासह राजकीय वर्तुळात खमंग चर्चा होती. त्यानंतर लगोलग पक्षाचे गटनेते केशव पोरजे यांनी स्वकीयांची वज्रमूठ आवळत आम्ही सारे सोबत असल्याचा निर्वाळा दिला होता. संपर्क प्रमुख रवींद्र मिर्लेकर यांनीही नाशिकला धाव घेत नगरसेवकांच्या बैठकीचे आयोजन करीत ऐक्याचा नारा दिला होता. त्यानंतर आज सर्व नगरसेवक पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी मुंबईत ‘मातोश्री’ निवासस्थानी दाखल झाले. यावेळी ठाकरे यांच्यासोबत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. विरोधकांनी कोट्यावधी रुपयांच्या निधीच्या नावाखाली पक्षांतर घडवण्याचा रचलेला डाव उधळल्याबद्दल ठाकरे यांनी नगरसेवकांचे कौतुक करीत ‘ मला तुमचा अभिमान आहे’, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.
नाशिकचा दौरा करणार..
प्रशासकीय राजवटीनंतर लोकप्रतिनिधी सत्तेत येवून देखील नाशिकमधील अनेक समस्या ‘जैसे थे’ असल्याची बाब नगसेवकांनी उद्धव ठाकरे यांच्या लक्षात आणून दिली. बेसुमार वृक्षतोड, खोदूनन ठेवलेले रस्ते, त्यामुळे झालेले अपघात आणि मृत्यू, नागरिकांची अस्वस्थता, वेळोवेळी होणारी वाहतूक कोंडी, पर राज्यातील कंत्राटदारांना दिलेली कामे असह अनेक विषयांचा उहापोह बैठकीत झाला. यासंदर्भात संबंधित प्रशासकीय व्यवस्थेला जाब विचारण्यासाठी आपण लवकरच नाशिकचा दौरा करणार असल्याचे ठाकरे यांनी यावेळी सांगितले.
बैठकीला गटनेते केशव पोरजे, प्रथमेश गीते, वैशाली दळवी, योगेश गाडेकर, भारती ताजनपुरे, शैलेश ढगे, सीमा पवार, प्रमिला मैंद, मंगला आढाव, रुचिरा साळवे, योगेश भोर, वैशाली दाणी,संजीवनी हांडोरे, मुरलीधर भामरे, माधुरी ढेमसे यांसह शिवसेना सचिव खा.विनायक राऊत, उपनेते व जिल्हा संपर्कप्रमुख रवींद्र मिर्लेकर आदि उपस्थित होते.
बैठकीपासून पदाधिकारी लांब ..
दरम्यान, नाशिकच्या नगरसेवकांना पक्ष्प्रमुख ठाकरे यांनी भेटीसाठी बोलावले असले तरी शहर अथवा जिल्ह्यातील कोणताही पदाधिकारी सोबत नसल्याने चर्चेला उधाण आले आहे. आजच्या बैठकीपासून पदाधिकाऱ्यांना जाणीवपूर्वक दूर ठेवण्यात आले का, अशी चर्चा देखील रंगत आहे.
Comments are closed.