NGN News
Latest Marathi News

भाजपा इगतपुरी शहरतर्फे महावितरण कार्यालयाला घेराव

  • ॲड. मुन्ना पवार यांच्या नेतृत्वात आंदोलन ; वीजपुरवठा खंडित झालेल्या प्रत्येक तासाला ₹100 भरपाईची मागणी

** एनजीएन न्यूज नेटवर्क

इगतपुरी : तालुक्यातील गिरणारे गावात वारंवार होणारा वीजपुरवठा खंडित होणे, कमी-जास्त व्होल्टेजमुळे नागरिकांना होणारा त्रास आणि महावितरणच्या निष्काळजी कारभाराविरोधात भारतीय जनता पार्टी, इगतपुरी शहरातर्फे ॲड. मुन्ना पवार यांच्या नेतृत्वाखाली महावितरण कार्यालयावर घेराव आंदोलन करण्यात आले. यावेळी महावितरणचे उपकार्यकारी अभियंता यांना सविस्तर निवेदन देत तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली.

मंगळवारी (दि. 14) सायंकाळी 5.00 वाजल्यापासून गिरणारे गावाचा वीजपुरवठा खंडित झाला. रात्री सुमारे 11.00 वाजता वीजपुरवठा सुरू झाला, मात्र अवघ्या 10 ते 15 मिनिटांत पुन्हा कमी व्होल्टेजमुळे वीजपुरवठा बंद झाला. त्यामुळे ग्रामस्थांना रात्रभर अंधारात राहावे लागले. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला, घरगुती विद्युत उपकरणांचे नुकसान होण्याची भीती निर्माण झाली तसेच विद्यार्थी, शेतकरी, व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला.

यावेळी भारतीय जनता पार्टीच्या शिष्टमंडळाने महावितरण अधिकाऱ्यांना गिरणारे गावातील वीजपुरवठा तातडीने सुरळीत करावा, कमी-जास्त व्होल्टेजची समस्या कायमस्वरूपी दूर करावी आणि भविष्यात अशा प्रकारचा त्रास नागरिकांना होणार नाही यासाठी आवश्यक तांत्रिक उपाययोजना त्वरित राबवाव्यात, अशी ठाम मागणी केली.

तसेच गिरणारे ग्रामस्थांच्या वतीने महावितरणच्या नियमांनुसार जितक्या तासांसाठी वीजपुरवठा खंडित झाला, त्या प्रत्येक तासासाठी प्रत्येक वीज ग्राहकास ₹100 प्रमाणे भरपाई देण्यात यावी, अशीही जोरदार मागणी निवेदनातून करण्यात आली.

या आंदोलनात अकिब अब्दुल समद शेख, दिलीप भीमराव नरोडे, सुनील संतू पाटील, इनामूल्ला बिस्मिल्लाह शेख, रामसिंग प्रेमसिंग भंडारी, श्रीकांत सदाशिव आंबेकर, प्रकाश किसन साळुंखे, सचिन पारसमल छाजेड, सत्तार इस्माईल मणियार, वसीम रऊफ शेख, मझहर अत्तार यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि गिरणारे गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महावितरणच्या अधिकाऱ्यांनी निवेदन स्वीकारून मागण्यांवर तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. मात्र, समस्या कायम राहिल्यास भारतीय जनता पार्टी, इगतपुरी शहराच्या वतीने अधिक तीव्र लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा ॲड. मुन्ना पवार यांनी दिला.

“सामान्य नागरिकांना न्याय मिळेपर्यंत भारतीय जनता पार्टीचा लढा सुरूच राहील,” असेही ॲड. मुन्ना पवार यांनी यावेळी स्पष्ट केले.

Comments are closed.