NGN News
Latest Marathi News

‘पंचवटी एक्सप्रेस’ परत द्या; खा. वाजेंचे केंद्रीय मंत्र्यांना साकडे

  • रेक शेअरिंग व्यवस्था बंद करण्याची मागणी

** एनजीएन न्यूज नेटवर्क

नाशिक : नाशिक-मुंबई दरम्यान दररोज प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांच्या गैरसोयीचा प्रश्न ऐरणीवर आणत खासदार राजाभाऊ वाजे यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना सविस्तर पत्र पाठवून पंचवटी एक्स्प्रेस (१२१०९/१२११०) साठी पूर्वीप्रमाणे स्वतंत्र रेक उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. तसेच सध्या सुरू असलेली हिंगोली जनशताब्दी एक्स्प्रेससोबतची रेक शेअरिंग व्यवस्था तातडीने बंद करण्याची विनंतीही त्यांनी केली आहे.

या पत्राच्या प्रती मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक तसेच विभागीय रेल्वे व्यवस्थापक, भुसावळ (DRM) यांनाही पाठविण्यात आल्या असून या विषयावर तातडीने सकारात्मक निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली आहे.

खासदार राजाभाऊ वाजे यांनी पत्रात नमूद केले आहे की, पंचवटी एक्स्प्रेस ही नाशिककरांची सर्वाधिक विश्वासार्ह आणि पसंतीची रेल्वे सेवा असून दररोज हजारो नोकरदार, विद्यार्थी, व्यावसायिक, उद्योगपती, ज्येष्ठ नागरिक, रुग्ण आणि विविध कामांसाठी मुंबईला जाणारे प्रवासी या गाडीवर अवलंबून असतात. त्यामुळे या गाडीची वेळेवर धावणे ही प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाची बाब आहे. मात्र, सध्या पंचवटी एक्स्प्रेस आणि हिंगोली जनशताब्दी एक्स्प्रेस यांच्यातील रेक शेअरिंग व्यवस्थेमुळे एका गाडीला झालेला विलंब थेट दुसऱ्या गाडीच्या वेळापत्रकावर परिणाम करत असल्याचे खासदार वाजे यांनी निदर्शनास आणून दिले आहे. विशेषतः मुसळधार पाऊस, तांत्रिक बिघाड किंवा रेल्वे वाहतुकीतील इतर अडथळ्यांच्या काळात या व्यवस्थेचे गंभीर दुष्परिणाम समोर येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

अलीकडील पावसाळ्यात रेल्वे सेवांमध्ये झालेल्या विलंबामुळे हजारो प्रवाशांना तासन्तास प्रतीक्षा करावी लागली. अनेकांचे कार्यालयीन कामकाज बिघडले, महत्त्वाच्या बैठका आणि वैद्यकीय नियुक्त्या चुकल्या, तर विद्यार्थ्यांनाही मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागले. या पार्श्वभूमीवर पंचवटी एक्स्प्रेसला स्वतंत्र रेक उपलब्ध करून दिल्यास गाडीचे वेळापत्रक अधिक नियमित राहील आणि प्रवाशांचा रेल्वे प्रशासनावरील विश्वास अधिक दृढ होईल, असे खासदार वाजे यांनी पत्रात नमूद केले आहे.

या पत्राद्वारे खासदार वाजे यांनी रेल्वेमंत्र्यांना चार महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत. त्यामध्ये पंचवटी एक्स्प्रेससाठी पूर्वीप्रमाणे स्वतंत्र रेक उपलब्ध करून देणे, हिंगोली जनशताब्दीसोबतची रेक शेअरिंग व्यवस्था बंद करणे, गाडीची वक्तशीरता व कार्यक्षमतेत सुधारणा करणे आणि संबंधित रेल्वे अधिकाऱ्यांना या विषयाचा प्राधान्याने आढावा घेऊन तातडीने निर्णय घेण्याचे निर्देश देणे यांचा समावेश आहे.
नाशिक जिल्ह्यातील लाखो नियमित रेल्वे प्रवाशांच्या हितासाठी हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा असून रेल्वे मंत्रालयाने यावर सकारात्मक निर्णय घेऊन पंचवटी एक्स्प्रेसची सेवा अधिक विश्वासार्ह आणि वेळेवर उपलब्ध करून द्यावी, अशी अपेक्षा खासदार राजाभाऊ वाजे यांनी व्यक्त केली आहे.

@ पंचवटी एक्स्प्रेस ही नाशिककरांची जीवनवाहिनी आहे. दररोज हजारो नोकरदार, विद्यार्थी, व्यावसायिक आणि ज्येष्ठ नागरिक या गाडीवर अवलंबून आहेत. सध्याच्या रेक शेअरिंग व्यवस्थेमुळे गाडीच्या वक्तशीरतेवर गंभीर परिणाम होत असून प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे पंचवटी एक्स्प्रेससाठी पूर्वीप्रमाणे स्वतंत्र रेक उपलब्ध करून देणे ही काळाची गरज आहे. रेल्वे मंत्रालयाने लाखो प्रवाशांच्या हिताचा विचार करून या मागणीवर तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा. : राजाभाऊ वाजे, खासदार, नाशिक

Comments are closed.