NGN News
Latest Marathi News

नात्यांमधील अबोला: मौनामागचे मानसशास्त्र, कारणे आणि उपाय ( विशेष/मीनाक्षी जगदाळे )

** एनजीएन न्यूज नेटवर्क

आजमितीला आजूबाजूचे वातावरण आणि परिस्थिती पाहता कोणत्या व्यक्ती चा कोणता फोन कॉल, मेसेज अथवा भेट शेवटची असेल सांगता येत नाही बदलती जीवनशैली, ताण तणाव, अपघात, आजारपण यामुळे आता मृत्यूला वयाचे बंधन राहिलेले नाही. आपल्याला असे अनुभव अनेकदा येतात. आपण आपल्या घरातील, नात्यातील, ओळखीतील लोकांना लवकरच भेटू, बोलू, फोन तरी करू असे ठरवतो पण ते काहीनाकाही कारणाने राहून जात असत. धावपळीच्या आयुष्यात आपल्या कामांचे प्राधान्य क्रम बदलत असतात. अनेकदा आपल्याला कोणाचा राग आलेला असतो, चुकीचा अनुभव आलेला असतो म्हणून आपण त्याला आपल्या संपर्कातून, आयुष्यातून अक्षरशः डिलीट करून टाकतो. आपल्या अश्या वागण्याचा त्या व्यक्तीच्या मनावर काय परिणाम झाला असेल हा विचार सुद्धा आपण करत नाही, मग अचानक बातमी येते की काहीतरी चुकीचंचे घडले आणि ती व्यक्ती आता आपल्यात राहिली नाही अश्या बातमीने आपल्याला धक्का बसतो आणि सोबतच आयुष्य भरासाठी पच्छाताप होणे आणि मनाला टोचणी लागून राहणे या शिवाय पर्याय राहत नाही .

बऱ्याच वेळी आपल्या घरातील लोकांसोबत सुद्धा आपण आपल्या अहंकारातून, गैरसमज झाल्यामुळे अबोला धरलेला असतो. त्यावेळी आपण हा विचार करत नाही की खूप छोटं आणि छान आयुष्य आपल्या सगळ्यांना मिळाले आहे. कश्यासाठी आणि का आपण हा अट्टाहास करावा की कोणतीही गोष्ट इतकी ताणली जावी आणि ती व्यक्ती जग सोडून गेल्यावर आपल्याला जाणीव व्हावी.

कुटुंबात एकमेकांशी बोलणे बंद करणे, सतत अबोला धरणे किंवा संवाद नाकारणे ही अतिशय क्लेशदायक आणि गुंतागुंतीची समस्या आहे आणि मानस शास्त्राशी याचा घानिष्ठ संबंध आहे.

मानसशास्त्रात या वर्तनाला ‘सायलेंट ट्रीटमेंट’ (Silent Treatment) किंवा ‘इमोशनल विथड्रॉल’ (Emotional Withdrawal) असे म्हटले जाते. वरवर साधे वाटणारे हे मौन कधीकधी हिंसाचारापेक्षाही वेदनादायी ठरू शकते. कधी किरकोळ तर कधी मोठया कारणाने घरोघरी एकमेकांशी न बोलून आपला राग दाखवण्याची पद्धत असते. आजकाल मोबाईल फोन मध्ये एकमेकांना ब्लॉक करणे, ब्लॅक लिस्ट मध्ये नंबर टाकणे नित्याचे झाले आहे.

या वर्तनामागील मानसशास्त्रीय कारणे, त्याचे स्वरूप आणि यावर काय उपाययोजना करता येतील, याचा सविस्तर ऊहापोह आपण या लेखात करणार आहोत. कोणाशी पण बोलणे टाकणे, असे वारंवर करणे, कोणत्याही किरकोळ करणावरून अबोला धरणे हा कोणता मानसिक आजार आहे का? हे पहिले जाणून घेवू.
थेट शब्दांत सांगायचे तर, अबोला धरणे किंवा बोलणे सोडणे हा स्वतःमध्ये एखादा स्वतंत्र मानसिक आजार नाही पण हे एक संरक्षणयंत्रणा (Defense Mechanism) किंवा अयोग्य संवादकौशल्य (Maladaptive Coping Strategy) आहे.काही विशिष्ट मानसिक स्थिती किंवा व्यक्तिमत्त्व दोषांमध्ये (Personality Disorders) हे वर्तन प्रकर्षाने दिसून येते.

सातत्याने अश्या वागणाऱ्या लोकांमध्ये, त्यांच्या व्यक्तिमत्व अथवा स्वभावात काय त्रुटी असतात याचा अभ्यास केल्यास अश्या लोकांसोबत आपल्याला नाते हाताळणे सोपे आणि सोईस्कर होईल.

पॅसिव्ह-अॅग्रेसिव्ह पर्सनॅलिटी (Passive-Aggressive Behavior) असणारे लोकं थेट भांडण न करता, समोरच्याला मानसिक त्रास देण्यासाठी मौनाचा अस्त्र म्हणून वापर करतात. नार्सिसिस्टिक पर्सनॅलिटी डिसऑर्डर (NPD) असलेले लोकं स्वतःचा अहंकार सुखावण्यासाठी किंवा समोरच्या व्यक्तीला नियंत्रित (Manipulate) करण्यासाठी जाणीवपूर्वक बोलणे सोडतात. तसेच नैराश्य (Depression) यामध्ये तीव्र नैराश्यात व्यक्ती स्वतःभोवती कवच तयार करते आणि ऊर्जेअभावी किंवा नकारात्मकतेमुळे संवाद पूर्णपणे थांबवते. अँक्झायटी किंवा ट्रॉमा (Anxiety Trauma)
भूतकाळातील एखाद्या मोठ्या आघातामुळे किंवा वादाच्या भीतीपोटी व्यक्ती स्वतःला पूर्णपणे व्यक्त करणे बंद करते.

ठराविक व्यक्ती असे का वागतात? या मागे मानसशास्त्रीय कारणे काय आहेत हे जाणून घेणे गरजेचे आहे. कुटुंबातील काही विशिष्ट व्यक्तीच सतत अबोला धरतात, त्यामागे काही मानसशास्त्रीय कारणे असतात. अहंकार आणि नियंत्रण (Power and Control) स्वभावात अधिक प्रमाणात असल्यामुळे अबोला हा समोरच्या व्यक्तीला शिक्षा देण्यासाठी किंवा तिला आपल्यासमोर झुकवण्यासाठी वापरला जातो. “तू तुझी चूक मान्य करेपर्यंत मी बोलणार नाही,” हा यामागील छुपा हेतू असतो. भावना व्यक्त न करता येणे (Emotional Incompetence) काही व्यक्तींना आपल्या मनात चाललेली चीड, राग, दुःख किंवा भीती शब्दांत कशी मांडायची, हे समजत नाही. त्यामुळे वाद टाळण्यासाठी किंवा स्वतःला वाचवण्यासाठी त्या मौनाचा मार्ग निवडतात. बालपणीचे संस्कार आणि अनुकरण (Childhood Conditioning) जर एखाद्या व्यक्तीने लहानपणापासून घरात आई-वडिलांना किंवा मोठ्यांना वाद झाल्यावर एकमेकांशी बोलणे बंद करताना पाहिले असेल, तर ती व्यक्ती मोठी झाल्यावरही नकळत याच पद्धतीचा अवलंब करते. भावनिक थकवा (Emotional Burnout) ऐक महत्वाचा घटक आहे ज्यामुळे माणूस सतत च्या अपेक्षा भंगाला कंटाळून जातो. वारंवार सांगूनही समोरच्या व्यक्तीत बदल होत नाही, अशी जेव्हा खात्री पटते, तेव्हा व्यक्ती निराश होऊन संवाद पूर्णपणे थांबवून टाकते. याला लर्नडहेल्पलेसनेस (Learned Helplessness) असेही म्हणतात.वादाची भीती (Conflict Avoidance) वाटणारे लोकं सुद्धा मौन बाळगण्यात स्वतःला धन्य समजतात. काही व्यक्ती स्वभावाने अत्यंत संवेदनशील असतात. त्यांना घरातील वाद, ओरडणे किंवा आक्रमकता सहन होत नाही. त्यामुळे स्वतःला मानसिकदृष्ट्या सुरक्षित ठेवण्यासाठी त्या बोलणे सोडतात.

घरातील या परिस्थिती चा नात्यांवर आणि मनावर गंभीर परिणाम होत असतो. अबोला धरल्यामुळे समोरील व्यक्तीच्या मनात तीव्र असुरक्षितता, नकार आणि अपराधीपणाची भावना निर्माण होते. मानसशास्त्राच्या दृष्टीने, शारीरिक जखमेपेक्षा ‘सायलेंट ट्रीटमेंट’मुळे होणारी मानसिक जखम अधिक खोल असते, कारण यामुळे व्यक्तीचा आत्मसन्मान दुखावला जातो.
आता यासारख्या समस्या असल्यास यावर उपाययोजना काय हे आपल्याला माहिती असायला हवे. कुटुंबातील हा कोंडमारा संपवण्यासाठी आणि नाते पूर्ववत करण्यासाठी अत्यंत संयमी आणि पद्धतशीर प्रयत्नांची गरज असते.

वैयक्तिक पातळीवर करायचे जे प्रयत्न आहेत ते सगळ्यांना माहिती असणे अपेक्षित आहे. अहंकार बाजूला ठेवणे जसे की सुरुवात कोणी करायची? या अहंकारात न अडकता, नात्याचे महत्त्व ओळखून पुढाकार घेणे गरजेचे आहे. शांततेने भावना मांडणे (I-Statements) अश्यावेळी अपेक्षित असते. समोरच्यावर आरोप करण्याऐवजी स्वतःच्या भावना मांडाव्यात. समोरील व्यक्तीस स्पेस (Space) देणे खूप गरजेचे आहे. जर समोरची व्यक्ती रागात असेल, तर जबरदस्तीने बोलायला लावू नका. त्यांना शांत होण्यासाठी थोडा वेळ द्या, पण “तू शांत झाल्यावर आपण नक्की बोलू” असा विश्वास द्या.

अशी परिस्थिती वारंवार निर्माण होवू नये म्हणून कौटुंबिक पातळीवर काही बदल करायला हवेत. सुरक्षित वातावरण तयार करणे हा प्रत्येक घरासाठी एक महत्वाचा भाग आहे. घरात प्रत्येकाला आपले मत मांडण्याचे स्वातंत्र्य असले पाहिजे. “मी माझे मन मोकळे केले तर घरातील लोक मला समजून घेतील, माझ्यावर ओरडणार नाहीत,” हा विश्वास प्रत्येकाला मिळायला हवा. संवादाचे नियम ठरवणे देखील अश्या वेळी खूप फायदेशीर असते. कुटुंबात वाद होणे स्वाभाविक आहे, परंतु “वाद कितीही मोठा झाला तरी आपण २४ तासांपेक्षा जास्त अबोला धरणार नाही,” असा नियम सर्व संमतीने बनवल्यास असे कुटुंब खूपच आनंदी सुखी समाधानी राहू शकते. काही अपवाद असलेल्या कुटुंबात जर कुटुंबातील अबोला महिन्यान्-महिने किंवा वर्षांनुवर्षे रेंगाळत असेल आणि त्यामुळे घरातील वातावरण दूषित होत असेल, तर फॅमिली काउन्सिलर किंवा मानसशास्त्रज्ञांची मदत घेणे अत्यंत आवश्यक ठरते.

कौन्सिलिंगच्या माध्यमातून दोन्ही बाजूंच्या व्यक्तींना त्यांच्या वर्तनाची जाणीव करून दिली जाते आणि संवाद कसा साधावा, याचे योग्य प्रशिक्षण दिले जाते. संवाद हा प्रत्येक नात्यातील महत्वाचा दुवा आहे आणि कुटुंबाचा पाया पूर्णतः घरातील लोकांच्या सुसंवादा वर अवलंबून असतो. काउनसेलिंग मध्ये प्रत्येकाच्या भावनांना वाट मोकळी करून दिली जाते त्यावर थेरपी दिली जाते.

थोडक्यात सांगायचे तर मौन हे कधीकधी सोन्यासारखे असते, पण नात्यांमध्ये सातत्याने पाळलेले मौन हे विषासारखे काम करते. अबोला हा समस्येवरचा उपाय नसून, ती स्वतःच एक मोठी समस्या आहे. संवाद, विचारांची देवाणघेवाण हाच नात्यांचा श्वास आहे; तो थांबला की नाते गुदमरून मरते. कुटुंबाची प्रगती, समाजातील स्थान, प्रतिमा, पुढील पिढी वर होणारे संस्कार, कुटुंबातील लोकांचे मानसिक तथा शारीरिक आरोग्य, आर्थिक उन्नती, सुखं, समाधान, शांती सर्व काही एकमेकांना समजून घेणे, एकमेकांशी दिलखुलास बोलणे यामध्ये असते. त्यामुळे वेळीच पावले उचलून संवादाचा पूल बांधणे हाच यावरचा एकमेव आणि प्रभावी उपाय आहे.

काउन्सिलर मीनाक्षी जगदाळे
9766863443

Comments are closed.