NGN News
Latest Marathi News

भाजप नेते विजय चौधरींविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

  • डॉ. हिना गावित यांच्याविषयी अपमानजनक उद्गार काढणे अंगलट

** एनजीएन न्यूज नेटवर्क

नाशिक : नंदुरबार जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून व्हायरल ऑडिओ क्लिपचा मुद्दा गाजत असताना एका क्लिपमधील संभाषणाबाबत भाजपचे माजी महामंत्री विजय चौधरी यांच्याविरुद्ध ॲट्रॉसिटीप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी रोहन शरद गावित (रा. नटावद) यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. माजी खा. डॉ. हिना गावित यांच्याविषयी विजय चौधरी यांनी अपमानजनक उद्गार काढून त्यात माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्याविषयी कॉल रेकॉर्डिंग करून ती क्लिप व्हायरल केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याबाबत विजय चौधरी यांच्याविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता १९, ३५२, ३५३ (२) सह अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम १९८९ चे कलम ३ (१) (आर) (एस), ३ (१) (डब्ल्यू) प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी हनुमंत गायकवाड पुढील तपास करीत आहेत.

भाजपमधून हकालपट्टीची मागणी

दरम्यान व्हायरल ऑडिओ क्लिप प्रकरणी भाजपचे माजी महामंत्री विजय चौधरी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. तसेच भाजपमधून त्यांची हकालपट्टी करण्याची मागणीही केली आहे. अज्ञात व्यक्तीकडून व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये विजय चौधरी यांनी माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्यावर पक्षविरोधी कारवाया केल्याचा खोटा आरोप केला आहे, असे नमूद करून पक्षाची त्यामुळे मानहानी होत आहे. यास्तव कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

Comments are closed.