NGN News
Latest Marathi News

निफाड ड्रायपोर्टमुळे नाशिकच्या कृषी निर्यात, उद्योगांना नवी गती

  • मल्टी-मॉडेल लॉजिस्टिक्स हब उभारणीला वेग
  • जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व जेएनपीटी उपाध्यक्ष रविश कुमार सिंह यांची बैठक
  • लासलगाव-पिंपळगाव बाजार समित्या जोडण्याचा प्रस्ताव

** एनजीएन न्यूज नेटवर्क

लासलगाव: राकेश बोरा

नाशिक जिल्ह्याच्या लॉजिस्टिक्स, कृषी निर्यात आणि औद्योगिक विकासाला नवी दिशा देणाऱ्या निफाड येथील प्रस्तावित मल्टी-मॉडेल लॉजिस्टिक्स पार्क (एमएमएलपी) प्रकल्पाला गती देण्यासाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि जेएनपीटीचे उपाध्यक्ष रविश कुमार सिंह यांच्या उपस्थितीत गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात महत्त्वपूर्ण बैठक झाली.

बैठकीत निफाड ड्राय पोर्ट हा केवळ आयात-निर्यात  मालवाहतुकीपुरता मर्यादित न ठेवता एकात्मिक देशांतर्गत लॉजिस्टिक्स पार्क म्हणून विकसित करण्यावर भर देण्यात आला. या प्रकल्पामुळे वाहतूक, साठवणूक आणि वितरण व्यवस्था अधिक सक्षम होऊन जिल्ह्याच्या आर्थिक विकासाला मोठी चालना मिळणार आहे.

निफाड ड्राय पोर्टला नाशिक-चेन्नई महामार्ग, नाशिक रिंगरोड, समृद्धी महामार्ग, ओझर विमानतळ आणि रेल्वे मार्गाची जोड मिळणार असल्याने बहु-पद्धती (मल्टी-मॉडेल) वाहतूक साखळी निर्माण होणार आहे. त्यामुळे उद्योग, व्यापार आणि निर्यात क्षेत्राला मोठा फायदा होण्याची अपेक्षा आहे.

कृषी निर्यात वाढविण्याच्या दृष्टीने लासलगाव आणि पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समित्यांना ड्राय पोर्टशी जोडण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी मांडला. पुढील टप्प्यात जिल्ह्यातील इतर बाजार समित्यांचाही या प्रकल्पात समावेश करण्याचे नियोजन आहे. तसेच केंद्र शासनाच्या जगातील सर्वात मोठ्या धान्य साठवण योजनेचे निफाड ड्राय पोर्टशी एकत्रीकरण करण्याची सूचनाही करण्यात आली. यामुळे अन्नधान्य साठवणूक आणि पुरवठा साखळी अधिक सक्षम होऊन शेतकरी व व्यापाऱ्यांना थेट लाभ मिळणार आहे.

जेएनपीटीचे उपाध्यक्ष रविश कुमार सिंह यांनी जिल्ह्यातील उद्योग व निर्यातदारांसाठी निर्यात प्रक्रिया अधिक सुलभ करण्यासाठी जिल्ह्याच्या आर्थिक विकास चमूला जेएनपीटीच्या मुख्य वाहतूक कार्यालयाशी जोडण्यात आल्याची माहिती दिली. तसेच ४ ऑगस्ट २०२६ रोजी होणाऱ्या जिल्हा निर्यात प्रोत्साहन बैठकीत जेएनपीटी प्रमुख भागधारक म्हणून सहभागी होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

बहु-पद्धती कनेक्टिव्हिटी आणि जेएनपीटीच्या सहकार्यामुळे निफाड येथील मल्टी-मॉडेल लॉजिस्टिक्स पार्क नाशिकच्या आर्थिक विकासाचे प्रमुख केंद्र ठरेल. या प्रकल्पामुळे कृषी निर्यात, उद्योग, व्यापार आणि रोजगाराला मोठी चालना मिळून नाशिकला राष्ट्रीय लॉजिस्टिक्स व निर्यात नकाशावर महत्त्वाचे स्थान मिळेल, असा विश्वास जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी व्यक्त केला.

Comments are closed.