** एनजीएन न्यूज नेटवर्क
लासलगाव : राकेश बोरा
उत्तर भारतात सुरू असलेल्या बर्फवृष्टीचा परिणाम राज्यातील हवामानावरही जाणवू लागला असून, नाशिक जिल्ह्यासह निफाड तालुक्यात थंडीचा जोर वाढला आहे. विशेष म्हणजे, महाबळेश्वरपेक्षाही निफाडचे तापमान कमी झाले असून, सोमवार (दि. १६) रोजी निफाडमध्ये किमान ११.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. राज्यात धुळ्यानंतर निफाड सर्वाधिक थंड ठरल्याने नागरिकांना बोचऱ्या थंडीचा अनुभव येत आहे.
दिवाळी संपताच तालुक्यात गुलाबी थंडीची चाहूल लागली असून, पहाटे आणि सकाळच्या वेळी हवेत चांगलाच गारवा जाणवू लागला आहे. वाढत्या थंडीमुळे नागरिकांनी आता उबदार कपड्यांचा आधार घेण्यास सुरुवात केली आहे. विशेषतः मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडणारे नागरिक, शेतकरी, दूध उत्पादक आणि कामानिमित्त पहाटे घराबाहेर पडणाऱ्यांना थंडीचा सामना करावा लागत आहे. ग्रामीण भागात सकाळच्या वेळी धुकट वातावरणासह गार वारे वाहत आहेत.
सकाळी बोचरा गारवा, तर दुपारी कडक उन्हाचा चटका, असे दुहेरी हवामान सध्या अनुभवायला मिळत आहे. तापमानातील या चढ-उतारामुळे सर्दी, खोकला, ताप आणि घशात खवखव यांसारख्या आरोग्यविषयक तक्रारी वाढण्याची शक्यता आहे. लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी, असा सल्ला डॉ. स्वप्नील जैन यांनी दिला आहे.
निफाड तालुका हा द्राक्ष आणि कांदा उत्पादनासाठी महत्त्वाचा असल्याने तापमानातील बदलांकडे शेतकऱ्यांचेही लक्ष लागले आहे. वाढत्या थंडीचा रब्बी हंगामातील पिकांसह द्राक्षबागांवर काय परिणाम होतो, याबाबत शेतकरी सतर्क झाले आहेत. दिवाळीनंतर सुरू झालेली गुलाबी थंडी आता हळूहळू हिवाळ्याची चाहूल देत असून, आगामी काळात तापमानात आणखी घट होण्याची शक्यता लक्षात घेऊन नागरिक आणि शेतकरी दोघेही हवामानावर लक्ष ठेवून आहेत.
Comments are closed.