NGN News
Latest Marathi News

मायक्रो फायनान्स कंपन्यांची सक्तीची कर्जवसुली थांबवा !

  • वंचित बहुजन आघाडीचे तहसीलदारांना निवेदन; महिलांना धमकावणे व अपमानास्पद वर्तनाचा आरोप

** एनजीएन न्यूज नेटवर्क

सटाणा / श्रीकांत रौंदळ

बागलाण तालुक्यातील दुष्काळसदृश परिस्थिती आणि आर्थिक अडचणींच्या पार्श्वभूमीवर मायक्रो फायनान्स कंपन्या तसेच त्यांच्या वसुली एजंटांकडून लघुउद्योजकांना, विशेषतः महिला कर्जदारांना, कथितरीत्या दमदाटी करणे, धमकावणे, असभ्य वर्तन करणे आणि त्यांची मानहानी करण्याचे प्रकार तात्काळ थांबवावेत. तसेच परिस्थितीचा विचार करून सक्तीची कर्जवसुली थांबविण्यात यावी, या मागणीसाठी बागलाण तालुका वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तहसीलदार, बागलाण यांच्यामार्फत शासनाला निवेदन देण्यात आले.

वंचित बहुजन आघाडीचे तालुका महासचिव दादा खरे यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन सादर करण्यात आले. यावेळी तालुकाध्यक्ष देविदास सोनवणे आणि माजी तालुकाध्यक्ष शेखर बच्छाव उपस्थित होते. नायब तहसीलदार श्री. मोंढे यांना निवेदन सादर करण्यात आले.
सध्या दुष्काळी परिस्थितीमुळे सर्वसामान्य नागरिक, छोटे व्यावसायिक आणि महिला बचत गटांशी संबंधित अनेक कर्जदार आर्थिक संकटाचा सामना करत आहेत. व्यवसायातील घट, उत्पन्नाची अनिश्चितता आणि वाढता खर्च यामुळे कर्जाचे हप्ते भरणे अनेकांना कठीण जात आहे. अशा परिस्थितीत मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या काही वसुली प्रतिनिधींकडून कर्जवसुलीसाठी दबाव आणला जात असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. कर्जवसुलीच्या नावाखाली महिलांना धमकावणे, त्यांच्याशी असभ्य भाषेत बोलणे, मानसिक दबाव आणणे किंवा सार्वजनिक ठिकाणी त्यांची मानहानी करणे हे प्रकार तात्काळ थांबविण्यात यावेत, अशी ही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

आर्थिक अडचणीत असलेल्या कर्जदारांशी मानवी दृष्टिकोनातून वागावे आणि कर्जवसुली करताना लागू असलेल्या नियमांचे पालन केले जावे, अशी भूमिका पक्षाच्या वतीने मांडण्यात आली. दुष्काळी परिस्थितीचा विचार करून मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या कर्जवसुलीबाबत शासनाने तातडीने हस्तक्षेप करावा, संबंधित कंपन्या व त्यांच्या प्रतिनिधींना योग्य निर्देश द्यावेत आणि महिलांच्या तक्रारींची गंभीर दखल घ्यावी, कर्जदारांना दिलासा मिळावा आणि त्यांच्या सन्मानाचे संरक्षण व्हावे, यासाठी प्रशासनाने ठोस पावले उचलावीत, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

Comments are closed.