NGN News
Latest Marathi News

रेल्वेचा निर्णय! इगतपुरी–मनमाड मार्गावरील वेगमर्यादा आता १३० किमी वेगाने

बाणगंगा पुलाजवळील त्रुटीपूर्ण रेल्वे मार्गाची सुधारणा पूर्ण; दोन वर्षांपासून असलेली ७५ किमीची मर्यादा हटवली, कुंभमेळ्यात विशेष गाड्यांच्या परिचालनाला मिळणार गती

** एनजीएन न्यूज नेटवर्क

लासलगाव : राकेश बोरा

आगामी नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने इगतपुरी–मनमाड रेल्वे मार्गाच्या क्षमतेत वाढ करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. कसबे सुकेणे यार्डातील बाणगंगा पुलाजवळील त्रुटीपूर्ण रेल्वे मार्गाची सुधारणा पूर्ण करण्यात आली असून, गेल्या दोन वर्षांहून अधिक काळापासून लागू असलेली ताशी ७५ किलोमीटर वेगाची मर्यादा हटविण्यात आली आहे. त्यामुळे आता या मार्गावर मूळ निर्धारित ताशी १३० किलोमीटर वेगाने रेल्वे चालविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाने १६ नोव्हेंबर रोजी हे काम पूर्ण केले. बाणगंगा पूल क्रमांक २१२/१ च्या भुसावळ बाजूकडील सुरुवातीच्या भागात रेल्वे मार्गाच्या रचनेत तांत्रिक दोष होते. त्यामुळे या ठिकाणी रेल्वे गाड्यांच्या वेगावर निर्बंध घालण्यात आले होते. हे निर्बंध दूर करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने ट्रॅकच्या भूमितीत महत्त्वपूर्ण सुधारणा केल्या.

या कामांतर्गत रेल्वे मार्गावरील सुमारे ४३ मीटर लांबीचे अनावश्यक वळण सरळ करण्यात आले. पॉइंट क्रमांक १०१बी सुमारे ३३० मिलिमीटरने डाऊन मार्गाच्या दिशेने स्थलांतरित करण्यात आला. तसेच क्रॉसओव्हर क्रमांक १०२ए/बी काढून टाकण्यात आला. त्यानंतर मुख्य रेल्वे मार्ग यांत्रिक जॅकच्या साहाय्याने सुमारे ३५० मिलिमीटरने डाऊन मार्गाच्या दिशेने सरकविण्यात आला. यामुळे पुलाच्या सुरुवातीपासून पुढील रेल्वे मार्गापर्यंत सलग आणि सरळ रचना तयार झाली आहे.

या सुधारणेमुळे रेल्वे वाहतूक अधिक वेगवान आणि सुरळीत होण्यास मदत होणार आहे. विशेषतः आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यात नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे देशभरातून लाखो भाविक दाखल होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर इगतपुरी–मनमाड रेल्वे मार्ग हा भाविकांच्या वाहतुकीसाठी महत्त्वाचा दुवा ठरणार आहे.

वेगमर्यादा हटविल्यामुळे रेल्वे गाड्यांच्या वेळेचे नियोजन अधिक प्रभावीपणे करता येणार असून, कुंभमेळ्याच्या काळात अतिरिक्त विशेष रेल्वे गाड्या चालविणे आणि प्रवाशांच्या वाढत्या गर्दीचे व्यवस्थापन करणे अधिक सुलभ होणार आहे.

सुरक्षितता, वेग आणि प्रवाशांच्या सुविधांमध्ये वाढ करण्याच्या दृष्टीने मध्य रेल्वेची ही सुधारणा कुंभमेळ्याच्या तयारीतील महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.

Comments are closed.