NGN News
Latest Marathi News

देश-विदेशातील समर्थ केंद्रांवर गुरुपौर्णिमेचा अमाप उत्साह

  • दिंडोरी, त्र्यंबकसह सर्व केंद्रावर लाखो भाविकांची मंदियाळी
  • गुरुमाऊलींनी हजारोंशी साधला व्यक्तिगत संवाद

** एनजीएन न्यूज नेटवर्क

नाशिक : दिंडोरी, त्र्यंबकेश्वरसह राज्यभरात, देशात आणि परदेशातीलही समर्थ केंद्रामध्ये आज अमाप उत्साहात, मंगलमय, भावपूर्ण वातावरणात गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करण्यात आला. अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्गाच्या दिंडोरी प्रधान केंद्रात गुरुमाऊली प पू अण्णासाहेब मोरे तर त्र्यंबकेश्वर गुरुपीठात चंद्रकांतदादा मोरे यांचे उपस्थितीत हा दिवसभराचा मंगलमय सोहळा संपन्न झाला.विशेषतः दिंडोरी येथे भल्या पहाटेपासून रात्री उशिरा पर्यंत सेवेकऱ्यांनी, भाविकांनी गर्दी केली. एकट्या दिंडोरी केंद्रात दिवसभरात दीड लाखापेक्षा अधिक लोकांनी श्री स्वामी समर्थ महाराज आणि गुरुमाऊलींच्या दर्शनाचा लाभ घेतला.महत्वाचे म्हणजे गुरुमाऊलींनी सामुदायिक रित्या सर्वाना मार्गदर्शन केलेच पण आलेल्या सर्वांशी वैयक्तिकरित्या संवाद साधला.

अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा मार्गांतर्गत आज जगभर आठ हजार समर्थ केंद्र सक्रिय असून या माध्यमातून करोडो सेवेकऱ्यांच्या दृष्टीने गुरुपौर्णिमा सोहळ्यास अनन्यसाधारण महत्व आहे म्हणूनच या दिवसाची सर्व आतुरतेने वाट पाहत असतात. आषाढी पौर्णिमा म्हणजेच व्यास पौर्णिमादिनी गुरुपूजन करण्याची प्रथा भारतभर असल्यामुळे या दिवशी श्री स्वामी समर्थ महाराज आणि गुरुमाऊलींचे आशीर्वाद घेण्यासाठी लाखोंची पावलं दिंडोरी, त्र्यंबकसह सर्व समर्थ केंद्राकडे दरवर्षी वळतात.

एकाच दिवशी सर्व सेवेकऱ्यांनी येऊन गर्दी करू नये म्हणून दरवर्षी प्रमाणे आषाढी एकादशी 25 जुलै पासूनच सेवामार्गाच्या गुरुपौर्णिमा सोहळ्यास प्रारंभ करण्यात आला . आषाढी एकादशीपासून गेल्या पाच दिवसात देशभरातून आलेल्या प्रमुख हजारो सक्रिय सेवेकरऱ्यांना गुरुमाऊलींनी मार्गदर्शन करून पुढील कार्याबाबत व घरोघरी सेवाकार्य पोचविण्यासाठी काय दिशा असावी याबाबत मार्गदर्शन केले.गुरुपौर्णिमा उत्सव नीटनेटका, शिस्तबद्ध होण्यासाठीही सूचना केल्या होत्या त्याप्रमाणे आज सर्वत्र शिस्तबद्धरित्या हा सोहळा पार पडला.

25 जुलैपासूनच उत्तर महाराष्ट्र, मुंबई, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा असे विभागवार येऊन रोज गुरुपूजन करून या मंगलमय सोहळ्यात आता पर्यंत लाखो भाविक, सेवेकरी, वारकऱ्यांनी सहभाग घेतलाच पण आज भल्या पहाटेपासून सर्व केंद्रात लगबग दिसत होती. सकाळी सहा वाजता गुरुमाऊली दिंडोरी केंद्रात गुरूपादुका पूजन आणि श्री स्वामी समर्थ महाराजांचे शॊडशोपचार पूजन केले. भूपाळी आरती आणि नैवद्य आरतीची सेवा सर्व सेवेकऱ्यांनी रुजू केली.

आज पहाटेपासून अबालवृद्ध सेवेकरी शांततेत रांगेत येऊन श्री स्वामी समर्थ महाराज मूर्तीला अभिषेक करून, पुष्प अर्पण करून चरणतीर्थ घेऊन समर्थाना विनंती करत होते, “महाराज आपणच माझे गुरु, माता, पिता, बंधू, सखा, गुरु, सद्गुरु, परम गुरु, परात्पर गुरु आणि गुरुतत्व आहात. माझा सांभाळ करा “.

सर्वत्र महिला पुरुष सेवेकऱ्यांनी केंद्रात व आपापल्या घरी आज श्री स्वामी चरित्र सारामृत, तेजोनिधी या ग्रंथाची पारायणे केली.
आजचा सोहळा गोवा,गुजरात, मध्यप्रदेश, कर्नाटक, दिल्ली, पंजाब, हरियाणा, उत्तराखंड, जम्मू, उत्तर प्रदेश, तेलंगना, तामिळनाडू, केरळ यासह अनेक राज्यात आणि नेपाळ, अमेरिका, कॅनडा, इंग्लंड, युरोप, ऑस्ट्रेलिया, दुबई,ओमानमधील समर्थ केंद्रात सुद्धा मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.

दिंडोरीत गुरुमाऊली प पू अण्णासाहेब मोरे तर त्र्यंबक मध्ये चंद्रकांतदादा मोरे यांनी उपस्थित सेवेकऱ्यांना मार्गदर्शन केले.सेवामार्गाचे जगभरातील कार्य आणि भविष्यातील नियोजन याबाबत विस्तृत चर्चा करून समर्थसेवा घराघरात पोचवण्यासाठी आपण सर्वांनी अहोरात्र झटायचं आहे, असे आवाहनही केले.

सद्गुरू मोरेदादा हॉस्पिटलच्या माध्यमातून गोरगरिबांना मोफत रुग्णसेवा देण्यात येणार असल्याची महत्वपूर्ण घोषणाही गुरुमाऊलींनी केली.
जानेवारी 2027 मध्ये होणाऱ्या जागतिक कृषी महोत्सव माहितीपत्रकाचे प्रकाशनही गुरुमाऊलीनी आज केले.

Comments are closed.