
- महिला मांत्रिकास अटक; ‘अंनिस’च्या मदतीने धुळे पोलिसांत गुन्हा दाखल
** एनजीएन न्यूज नेटवर्क
नाशिक : येथील एका मांत्रिक महिलेने धुळे येथील एका पीडित महिलेसाठी नाशिकच्या गंगाघाट येथे अघोरी पूजा करून त्यापोटी तिच्याकडून एक लाख साठ हजार रुपये उकळले. एवढेच नाही तर पीडित महिलेच्या २१ वर्षांच्या मुलीवर तथाकथित जादूटोणा करण्याची भीती दाखवत तिचा मांत्रिक महिलेने जबरदस्तीने स्वतःच्या मुलाशी साखरपुडा केला. ही मांत्रिक महिला व तिच्या साथीदारांविरोधात जादूटोणा विरोधी कायदा व अन्य कायद्याच्या कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून त्यांना धुळे शहर पोलिसांनी नाशिकहून अटक केली आहे.
पीडित महिला ही धुळे येथे मजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करते. त्यांची तब्येत नेहमी बिघडत असल्यामुळे त्यांना नेहमी आर्थिक अडचण भासत असे. त्यांच्या दोन मैत्रिणींनी त्यांची धुळे येथे नाशिकहून आलेल्या सरिता मनोज जाधव या मांत्रिक महिलेशी ओळख करून दिली. पीडित महिलेची समस्या ऐकल्यावर मांत्रिक महिलेने पीडितेच्या अंगावरून लिंबू फिरवून ते पिळून पाण्यात टाकले. त्या पाण्यात राख टाकून ते पीडितेस पिण्यास सांगितले व पेढा खाण्यास दिला. नंतर पीडितेच्या अंगात आले. मांत्रिकेने अशीही धमकी दिली की, माझे वचन पाळले नाही तर आणखी वाईट होईल. मांत्रिक महिलेने पीडितेच्या डोक्याचे काही केस उपटले व त्याची स्मशानात पूजा करावी लागेल असे सांगितले. त्यासाठी नाशिकला येऊन ११ उतारे अमावस्या व १० उतारे पोर्णिमेच्या दिवशी करून अंघोळ करावी लागेल व त्यासाठी एक लाख एक्कावन्न हजार रुपयांची मागणी केली. काही दिवसांनी पीडितेने मांत्रिकेस एक लाख तीस हजार रुपये रोख दिले.
१४ जुलै २०२६ रोजी अमावस्या असल्याने मांत्रिकेने पीडितेला नाशिकच्या गंगाघाटाजवळील केवडीबन येथे स्नान घालत लिंबू उतरवले व त्या लिंबाचा रस पीडितेच्या डोळ्यात टाकला. तिला खोबरे व पेढा खायला दिला. अंगावरचे कपडे काढून पाण्यात टाकून नवीन कपडे घालायला सांगितले. खोबरे व पेढा खाल्ल्याने पीडितेस मळमळ व उलटी झाली. पीडितेच्या अंगातील घाण जाण्यास वेळ लागेल असे सांगितले. मांत्रिक महिलेने पीडितेला मुंबई नाका येथील तिच्या घरी नेऊन काळे तीळ व राखेच्या सहाय्याने अघोरी पूजा केली व जबरदस्तीने तीस हजार रुपये उकळले.
मांत्रिक महिलेने पीडितेस असे सांगितले की, तुझ्या मुलीला माझ्या धुळे येथील मैत्रिणीकडे ठेव व चाळीस दिवस तिथे जाऊ नका. कारण तिथे दुष्ट शक्ती आहेत. त्याप्रमाणे केल्यानंतर काही दिवसांनी मांत्रिकेने पीडितेस असे सांगितले की , तुझ्या मुलीचे माझ्या मुलासोबत लग्न लावून दिल्यास तुझे वाईट संकट टळून जाईल. संकट टळून चांगले होईल या आशेने मुलगी मांत्रिक महिलेच्या मैत्रीणीच्या घरी राहिली. पुढे पीडितेने मुलीला घरी बोलविले असता मांत्रिक महिलेने सांगितल्याप्रमाणे आपले चांगले होईल म्हणून मुलीने आपल्या घरी येण्यास नकार दिला. त्याप्रमाणे मांत्रिकेने मुलीला पीडितेच्या कुटुंबीयापासून दूर ठेवण्यात भाग पाडले. पुढे २४ जुलै २०२६ रोजी मांत्रिकेने त्या मुलीचा साखरपुडा आपला मुलगा गणेश मनोज जाधव याच्याशी करून घेतला . नंतर पुढे सर्वांनी पीडितेच्या कुटुंबीयांशी संपर्क बंद केला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पीडितेने महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे संपर्क केला. अंनिसचे कार्यकर्ते रणजित शिंदे, नवल ठाकरे, भूषण पाटील, नितीन बागुल आदींनी पीडितेला गुन्हा नोंद करण्यासाठी हिंमत दिली. नंतर २७ सप्टेंबर रोजी धुळे शहर पोलिसांत गुन्हा दाखल झाला. धुळे पोलिसांनी नाशिक पोलिसांच्या मदतीने संबंधित सर्वांना अटक केली आहे .पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत कुमार भामरे करीत आहेत.
Comments are closed.