
२.२५ मीटर उंच उडीसह ऐतिहासिक कामगिरी; पुरुषांच्या उंच उडीत राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्य जिंकणारा पहिलाच भारतीय
** एनजीएन न्यूज नेटवर्क
लासलगाव : राकेश बोरा
ग्लासगो (स्कॉटलंड) येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत देवगाव येथील सर्वेश कुशारे याने पुरुषांच्या उंच उडी स्पर्धेत २.२५ मीटर उंच उडी मारत भारतासाठी रौप्यपदक जिंकून ऐतिहासिक कामगिरी केली. सध्या भारतीय लष्करात कार्यरत असलेल्या सर्वेशने काउंटबॅकमुळे सुवर्णपदक थोडक्यात गमावले. मात्र, राष्ट्रकुल स्पर्धेच्या पुरुष उंच उडी प्रकारात रौप्यपदक जिंकणारा तो पहिलाच भारतीय खेळाडू ठरला आहे.
या अभूतपूर्व यशानंतर त्याचे शिक्षण झालेल्या श्री. डी. आर. भोसले विद्यालयात तसेच जन्मगाव देवगावमध्ये आनंदोत्सव साजरा करण्यात आला. सर्वेशचे वडील अनिल कुशारे, आई सुलोचना कुशारे आणि पत्नी रोहिणी यांचा माजी पंचायत समिती सदस्य भाऊसाहेब बोचरे व माजी सरपंच विनोद जोशी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी प्राचार्य दीपक चव्हाण, भास्कर बोचरे, रत्नाकर शिरसाठ, मनोहर बोचरे, धनंजय जोशी, सचिन बोचरे, शांताराम ढवळे, सोमनाथ निळख, राजेंद्र पाटील, बापू तासकर, संभाजी डुकरे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. आशियाई स्पर्धेत सर्वेशने सुवर्णपदक जिंकून देशाचे स्वप्न पूर्ण करावे, अशी अपेक्षा उपस्थितांनी व्यक्त केली.
पुरुषांची उंच उडी अंतिम निकाल
सुवर्णपदक : रोमेन बेकफोर्ड (जमैका) – २.२५ मीटर
रौप्यपदक : सर्वेश कुशारे (भारत) – २.२५ मीटर (काउंटबॅकमुळे दुसरे स्थान)
कांस्यपदक : किमानी जॅक (इंग्लंड) – २.२० मीटर
भुशाच्या पोत्यावरून सुरू झाला प्रवास
देवगाव येथील श्री. डी. आर. भोसले विद्यालयात शिक्षण घेत असताना क्रीडाशिक्षक रावसाहेब जाधव यांनी २०१० पासून सर्वेशला प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. त्या काळात विद्यालयात आधुनिक क्रीडा सुविधा उपलब्ध नसल्याने सर्वेशचे वडील अनिल कुशारे आणि जाधव यांनी मक्याच्या भुशाच्या पोत्यांची गादी तयार करून त्यावर सरावाची व्यवस्था केली. याच साध्या सुविधांवर कठोर परिश्रम करत सर्वेशने आज जागतिक स्तरावर भारताचा तिरंगा उंचावला.
वडिलांची भावना..
देवगावच्या मातीतून सुरू झालेला सर्वेशचा प्रवास आज भारताच्या क्रीडा इतिहासातील प्रेरणादायी अध्याय ठरला आहे. त्याची जिद्द, चिकाटी आणि देशासाठी काहीतरी मोठे करण्याची प्रेरणा प्रत्येक युवा खेळाडूसाठी मार्गदर्शक आहे. पुढील स्पर्धेत तो निश्चितच सुवर्णपदक जिंकेल, असा मला विश्वास आहे.
— अनिल कुशारे, सर्वेशचे वडील
Comments are closed.