NGN News
Latest Marathi News

मास्टर्स राष्ट्रीय टे टे स्पर्धा; शिवानंद कुंडाजे यांचा तिहेरी ‘सुवर्णवेध’

३२ वी मास्टर्स राष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धेत दाखवली चमक

** एनजीएन न्यूज नेटवर्क

नाशिक : पुणे येथे चालू असलेल्या ३२ व्या मास्टर्स राष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धेत नासिकच्या शिवानंद कुंडाजे यांनी तीन सुवर्ण पदक मिळवित तिहेरी मुकुट संपादित केला. ७० वर्षावरील पुरुष गटाच्या सांघिक स्पर्धेत महाराष्ट्र अ संघाचे प्रतिनिधित्व करत अजिंक्यपद मिळवून सुवर्ण पदक मिळविले तर याच गटात पुरुष एकेरी व पुरुष दुहेरीचे अजिंक्यपद पटकावून एकूण तीन सुवर्ण पदके आपल्या नावे केले.

सत्तर वर्षावरील पुरुष एकेरीत अंतिम फेरीत मध्य प्रदेशच्या प्रमोद सोनीचा ११-९, ११-५, ७-११, ११-६ असा ३-१ सहज पराभव करत पहिले सुवर्ण पदक पटकावले. अंतिम फेरीत प्रवेश करण्यापूर्वी त्यांनी उपांत्यफेरीत महाराष्ट्राच्या पर्सी मेहता यांचा ३-० ने पराभव केला होता. पुरुषांच्या दुहेरीत अंतिम फेरीत शिवानंद कुंडाजे यांनी महाराष्ट्राच्याच सुहास दांडेकर यांच्या साथीने महाराष्ट्राच्याच योगेश देसाई आणि पर्सी मेहता या जोडीचा अत्यंत चुरशीच्या झालेल्या सामन्यात १४-१२, ११-७, ३-११, ९-११, ११-६ असा ३-२ ने पराभव करत दुसऱ्या सुवर्ण पदकावर आपले नाव कोरले.

७० वर्षावरील पुरुषांच्या सांघिक स्पर्धेत अंतिम फेरीत महाराष्ट्र (अ) संघाने दिल्ली संघाचा ३-० ने सहज पराभव करून तिसरे विजेतेपद मिळवून तिसरे सुवर्ण पदक आपल्या नावे केले. महाराष्ट्र संघात शिवानंद कुंडाजे (संघनायक) योगेश देसाई, पर्सी मेहता व जितू मावाणी यांचा समावेश होता. अंतिम फेरीत प्रवेश करण्यापूर्वी महाराष्ट्र (अ) संघाने उपांत्य फेरीत गुजरात संघाचा ३-० ने पराभव केला.

इतर मास्टर्सचीही उल्लेखनीय कामगिरी

याशिवाय नाशिकच्या इतर मास्टर्स खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी केली त्यामध्ये सतीश शिरसाट यांनी ८० वर्षावरील पुरुष दुहेरीत रजत पदक मिळविले. उमेश कुंभोजकर यांनी ६५ वर्षावरील सांघिक स्पर्धेत महाराष्ट्राचे अ संघाचे प्रतिनिधित्व करत कांस्य पदक पटकावले तसेच कुंभोजकर यांनी राजेश्वरी म्हेत्रे यांच्या साथीने मिश्र दुहेरीचे सुवर्ण पदक पटकावले. स्वाती आघारकर यांनी ६० वर्षावरील सांघिक स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत रजत पदक पटकावले तर महिला दुहेरीचे कांस्य पदकावर आपली मोहोर उमटवली

यांच्या या यशाबद्दल नासिक जिल्हा टेबल टेनिस असोसिएशनचे अध्यक्ष नरेंद्र छाजेड, उपाध्यक्ष राजेश भरवीरकर, मिलिंद कचोळे, सचिव शेखर भंडारी, कोषाध्यक्ष अभिषेक छाजेड, संजय वसंत, वैभव जोशी, सौ अलका कुलकर्णी, सुहास आघारकर यांनी अभिनंदन केले.

Comments are closed.