
- एआय, एरोस्पेस आणि भविष्याभिमुख कौशल्यांवर केंद्रित संरेखित स्टेम आणि व्यवस्थापन विद्यापीठ साकारणार
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
शिक्षण क्षेत्र आणि प्रत्यक्ष वास्तव जगातील व्यवहार्यता तसेच भविष्यकालीन कौशल्यांमधील दरी भरून काढण्यासाठी गोकुला एज्युकेशन फाउंडेशन (मेडिकल)ने एक निर्णायक पाऊल उचलले आहे. रामय्या युनिव्हर्सिटी ऑफ अप्लाइड सायन्सेस, रामय्या मेडिकल कॉलेज आणि रामय्या मेमोरियल हॉस्पिटल यांचे व्यवस्थापन करणाऱ्या गोकुला एज्युकेशन फाउंडेशनने आता युनिव्हर्सिटी अॅट अल्बनी, स्टेट युनिव्हर्सिटी ऑफ न्यूयॉर्क या अग्रगण्य सार्वजनिक संशोधन विद्यापीठाशी भागीदारी करून रामय्या इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड मॅनेजमेंट (आरआयएसएम) या बंगळुरूमधील ‘डीम्ड-टू-बी’ विद्यापीठाची स्थापना केली आहे. अत्याधुनिक स्टेम आणि व्यवस्थापन संस्थेच्या रूपात संकल्पित आरआयएसएम,जागतिक मानकांशी सुसंगत,उद्योगाभिमुख शिक्षण देईल.यामध्ये संशोधन आणि प्रत्यक्षातील प्रयोगावर विशेष भर असेल आणि विद्यार्थ्यांना वेगाने बदलणाऱ्या जागतिक परिक्षेत्रासाठी तयार केले जाईल. विद्यापीठ आपले पहिले शैक्षणिक सत्र ऑगस्ट 2026 मध्ये सुरू करेल.
शिक्षण, संशोधन आणि आरोग्यसेवा क्षेत्रात सहा दशकांहून अधिक काळ उत्कृष्टतेच्या पायावर उभे राहून, गोकुला एज्युकेशन फाउंडेशन (मेडिकल) आरआयएसएम द्वारे आपला अनुभव अधिक विस्तारत आहे आणि जागतिक पातळीवर अग्रणी, उद्योगाभिमुख दृष्टिकोनासह उच्च शिक्षणाची पुनर्कल्पना करत आहे. हे विद्यापीठ अभियांत्रिकी, व्यवसाय आणि विज्ञान या शाखांमध्ये पदवी, पदव्युत्तर पदवी आणि डॉक्टरेट आभ्यासक्रम सादर करेल. यात सुरुवातीच्या अभ्यासक्रमांमध्ये संगणकशास्त्र आणि कृत्रिम बुद्धिमत्ता, एरोस्पेस अभियांत्रिकी आणि इलेक्ट्रीकल सायन्स यामधील बी.टेक आणि यांसोबत बीबीए आणि एमबीए कार्यक्रमांचा समावेश असेल. याचे शैक्षणिक मॉडेल उद्योग आणि शैक्षणिक भागीदारांसोबत सहनिर्मित अभ्यासक्रमावर आधारित आहे. यामध्ये आंतरशाखीय शिक्षण, उद्योगक्षेत्र प्रायोजित एक्सलन्स सेन्टर्स आणि इंटर्नशिप, लाईव्ह प्रोजेक्ट्स आणि कॅपस्टोन असाइनमेंट्सद्वारे प्रत्यक्ष अनुभव समाविष्ट आहे. त्यायोगे वास्तव जगातील कौशल्ये विकसित होतील.
आरआयएसएम मध्ये “रिलीव्हन्स” अर्थात संयुक्तिकपणा ही संकल्पना प्रत्येक अभ्यासक्रमाच्या पायाभूत रचनेत एकात्मिक व्यवसाय आणि व्यवस्थापन-प्रणीत दृष्टिकोनाद्वारे समाविष्ट केली जाईल. प्रत्येक अभ्यासक्रमात सुरुवातीपासूनच प्रत्यक्ष उद्योगक्षेत्राचा अनुभव अंतर्भूत असेल. त्यामुळे शिक्षण उपयोजित आणि परिणामाभिमुख राहील. विद्यार्थ्यांना ‘मेंटॉर प्राध्यापक’ तसेच उद्योगक्षेत्रातील अग्रणींमधून निवडलेले आणि प्रत्येक विभागात औपचारिक प्राध्यापक भूमिकेत कार्यरत अशा ‘प्रोफेसर्स ऑफ प्रॅक्टिस’ यांच्याशी संवाद साधण्याची संधी मिळेल. हा एक नाविन्यपूर्ण प्रयोग आहे. यासोबतच, ट्रान्सलेशनल रिसर्च विद्यापीठाच्या शैक्षणिक चौकटीचा मुख्य आधार असेल आणि अभ्यासक्रम रचना आणि प्रत्यक्ष परिणाम या दोन्ही गोष्टींना आकार देईल. या एकात्मिक दृष्टिकोनाद्वारे आरआयएसएम उद्योजकीय संदर्भ, शैक्षणिक कठोरता आणि ट्रान्सलेशनल रिसर्च यांचा अखंड संगम असलेली शिक्षण परिसंस्था निर्माण करण्याचा उद्देश ठेवते
या स्थापनेबाबत बोलताना गोकुला एज्युकेशन फाउंडेशन (मेडिकल) चे कार्यकारी संचालक आणि मुख्य धोरण अधिकारी श्री. गुरूचरण गोलेरकेरी म्हणाले, “आपण एका वेगाने बदलणाऱ्या आणि खोलपणे एकमेकांशी जोडलेल्या जागतिक वातावरणात काम करत आहोत. विविध विद्या शाखा, उद्योग आणि भौगोलिक सीमांमधील सीमा तिथे वेगाने नाहीशा होत आहेत. पारंपरिक शिक्षण मॉडेल्स या नव्या वास्तवासाठी विद्यार्थ्यांना तयार करण्याकरता पुरेशी पडत नाहीयत. तंत्रज्ञान, व्यवसाय आणि उपयोजित शिक्षण यांचे एकत्रीकरण करून प्रत्यक्ष वास्तविक जगात कसे काम केले जाते आणि ते कसे बदलत आहे याचे प्रतिबिंब असलेली परिसंस्था उभारून आरआयएसएम द्वारे आम्ही या बदलाला प्रतिसाद देत आहोत. रोजगार बाजारपेठेशी सुसंगतता महत्त्वाची असली तरी, आमचे मोठे लक्ष मूलभूत ज्ञान, चिकित्सक विचार आणि शिकण्याची लवचिकता मजबूत करण्यावर आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना केवळ आजच्या नोकऱ्यांसाठी नव्हे तर जिथे सतत शिकण्याची आणि जुळवून घेण्याची क्षमता यशाचे परिमाण ठरेल अशा अनिश्चित भविष्याकरिताही तयार केले जाईल.”
स्कूल ऑफ कॉम्प्युटर सायन्स अँड आर्टिफिशियल इंटेलिजन्स विद्यार्थ्यांना तांत्रिक बदलांच्या अग्रभागी कार्य करण्यास सक्षम करेल. त्यामध्ये प्रोग्रामिंग, अल्गोरिदम्स आणि डेटा यामध्ये भक्कम पाया घडवला जाईल, तसेच मशीन लर्निंग, ऑटोमेशन आणि मानव-रोबोट परस्परसंवाद यामध्ये उपयोजित अनुभव दिला जाईल. स्कूल ऑफ एरोस्पेस इंजिनिअरिंग एरोनॉटिकल आणि अॅस्ट्रोनॉटिकल क्षेत्रांमध्ये सखोल शिक्षण देईल. यामध्ये फ्लाइट सिस्टम्स, स्पेसक्राफ्ट डिझाइन, सॅटेलाइट टेक्नॉलॉजीज आणि अंतराळ संशोधन यांचा समावेश असेल. स्कूल ऑफ बिझनेस आधुनिक उद्योगांसाठी विश्लेषणात्मक, व्यवस्थापकीय आणि धोरणात्मक कौशल्ये विकसित करण्यावर लक्ष केंद्रित करेल. यामध्ये कॅम्पसवरील उद्योग-प्रायोजित शिक्षण केंद्रांद्वारे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष व्यावसायिक आव्हानांचा सामना करणे शिकायला मिळेल. त्यात तंत्र उद्योजकतेचे व्यवस्थापन देखील समाविष्ट आहे. युनिव्हर्सिटी अॅट अल्बनी सोबतच्या ज्ञान भागीदारीवर आधारित जागतिक स्तरावर जोडलेल्या आणि उद्योग-समाविष्ट शिक्षण परिसंस्थेत या सर्व शाखांना एकत्र आणण्याच्या पद्धतीत आरआयएसएम ची वेगळी ओळख जपलेली आहे. एक वर्ष परदेशात संधी, समग्र शिक्षण पद्धती आणि कॉर्पोरेट प्रायोजित सेंटर ऑफ एक्सलन्सद्वारे विद्यार्थी पारंपरिक विभागीय शिक्षणाच्या पलीकडे जाऊन वास्तव परिस्थितींमध्ये आंतरशाखीय विचारांचा सातत्याने वापर करतील.
यावेळी बोलताना युनिव्हर्सिटी ऍट अल्बनीचे अध्यक्ष हाविदान रोड्रिगेज म्हणाले, “युनिव्हर्सिटी ऍट अल्बनीला रामय्या इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड मॅनेजमेंटसोबत नवीन ज्ञान भागीदारीत प्रवेश करताना अभिमान वाटत आहे. अध्यापन, संशोधन आणि उद्योग-सुसंगत शिक्षण पद्धतींमधील आमच्या सामूहिक कौशल्यांचा उपयोग करून यूअल्बनी च्या सहकार्याने आरआयएसएम संगणक विज्ञान, अभियांत्रिकी, व्यवसाय आणि नॅनोतंत्रज्ञान यांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये शिक्षणाला प्रगतीपथावर नेईल. यूअल्बनी जागतिक स्तरावर सक्रिय आणि जबाबदार नागरिक घडवण्याचा प्रयत्न करत असताना अशा प्रकारचे सहयोग आमच्या यशासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत.”
विद्यापीठाचा मुख्य निवासी कॅम्पस बंगळुरूच्या देवनहळ्ळी जवळ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इन्व्हेस्टमेंट रीजन (आयटीआयआर) मध्ये विकसित केला जात आहे. त्यामुळे ते एरोस्पेस पार्क, स्पेशल इकॉनॉमिक झोन, ग्लोबल फायनान्शियल डिस्ट्रिक्ट आणि प्रस्तावित फॉक्सकॉन फॅसिलिटी सारख्या महत्त्वाच्या औद्योगिक आणि नाविन्यपूर्ण केंद्रांच्या जवळ असेल. या स्थानामुळे विशेषतः स्टेम शाखांमध्ये उद्योग-शैक्षणिक सहकार्याला चालना मिळेल अशी अपेक्षा आहे.आरआयएसएम ऑगस्ट 2026 मध्ये येळहंका येथील ट्रान्झिट कॅम्पसवर शैक्षणिक कार्य सुरू करेल आणि मुख्य कॅम्पस सप्टेंबर 2027 पर्यंत पूर्णतः कार्यान्वित होण्याची अपेक्षा आहे.
आरआयएसएम मधील सर्व अभ्यासक्रम पूर्णतः निवासी मॉडेलवर आधारित असून त्यांचा उद्देश वर्गखोल्याबाहेरील सर्वांगीण विद्यार्थी विकास साधणे आहे. यामध्ये सुसूत्र क्रीडा उपक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम, आरोग्यविषयक उपक्रम, नेतृत्व विकास आणि उद्योजकतेला प्रोत्साहन यांचा समावेश असेल. त्यातून एक सर्वसमावेशक आणि समग्र शैक्षणिक वातावरण निर्माण होईल.
Comments are closed.