
- ४१.९० लाख प्रवाशांवर कारवाई ; २५१.९१ कोटी वसूल
** राकेश बोरा
लासलगाव : एनजीएन न्यूज नेटवर्क
मध्य रेल्वेने २०२५-२६ या आर्थिक वर्षात विनातिकीट व अनधिकृत प्रवासाविरोधात मोठी मोहीम राबवत ४१.९० लाख प्रवाशांवर कारवाई केली असून त्यांच्याकडून तब्बल २५१.९१ कोटी रुपयांचा विक्रमी दंड वसूल केला आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत प्रकरणांमध्ये १० टक्के, तर दंड वसुलीत २४ टक्क्यांची वाढ झाली आहे.
रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, या कारवाईत २९.२७ लाख गैर-उपनगरीय प्रकरणांमधून २१३.३१ कोटी रुपये, तर १२.६३ लाख उपनगरीय प्रकरणांमधून ३८.८६ कोटी रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.
विभागनिहाय आकडेवारीत मुंबई विभाग आघाडीवर असून येथे १७.९७ लाख प्रकरणांमधून ८०.९८ कोटी रुपये वसूल झाले. भुसावळ विभागात ९.६३ लाख प्रकरणांमधून ८१.२८ कोटी, पुणे विभागात ४.७३ लाख प्रकरणांमधून ३०.१५ कोटी, नागपूर विभागात ४.५४ लाख प्रकरणांमधून २८.३६ कोटी, सोलापूर विभागात २.५३ लाख प्रकरणांमधून ११.६२ कोटी, तर मुख्यालयाकडून २.४८ लाख प्रकरणांमधून १९.५१ कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
दरम्यान, एसी लोकल सेवांमध्येही विनातिकीट प्रवासाच्या घटना वाढल्या असून १.२३ लाख प्रवासी पकडले गेले. या प्रकरणांमधून ३.८९ कोटी रुपयांचा दंड वसूल झाला आहे. तसेच, एसी लोकल सेवांची संख्या वाढून ९४ वर पोहोचली आहे.
Comments are closed.