
- सिन्नर तालुक्यातील पंचाळे येथील कुटुंबीयांवर काळाचा घाला; सात जण जखमी
** एनजीएन न्यूज नेटवर्क
सिन्नर : विशेष प्रतिनिधी
जागरण-गोंधळ कार्यक्रम आटोपून परतणाऱ्या कुटुंबावर काळाने घाला घातल्याची हृदयद्रावक घटना तालुक्यातील पंचाळे येथे शुक्रवारी मध्यरात्री (दि. १० ) घडली. ट्रक–पिकअपच्या भीषण धडकेत पिकअपने पेट घेतल्याने चौघांचा भाजून मृत्यू झाला, तर सात जण जखमी झाले. या भीषण अपघाताने पंचाळे गावासह परिसरात तीव्र हळहळ व्यक्त होत आहे.
प्राप्त माहितनुसार, पंचाळे येथील मोरे, गांगुर्डे व नवले कुटुंबीय पाथरे येथे कार्यक्रमासाठी गेले होते. मध्यरात्री परतत असताना पिकअप (MH 15 JC 6333) पंचाळे हायस्कूलजवळ आली असता समोरून येणाऱ्या आयशर ट्रकने (MH 14 MT 3839) जोरदार धडक दिली. धडकेनंतर काही क्षणांतच पिकअपने पेट घेतला. या आगीत केबिनमध्ये अडकलेल्या किरण रवींद्र मोरे (वय २३), शुभम गणेश नवले (२१), रिंकू शुभम नवले (१९) व मिराबाई विश्वनाथ गांगुर्डे (६८, सर्व रा. पंचाळे) यांचा जागीच होरपळून मृत्यू झाला. विशेष म्हणजे, शुभम नवले व रिंकू नवले यांचा विवाह अवघ्या एक वर्षापूर्वीच झाला होता. तसेच मिराबाई गांगुर्डे या रिंकू नवले यांच्या आई होत.
मागील बाजूस बसलेल्या प्रवाशांनी जीव वाचवण्यासाठी गाडीतून उड्या मारल्या. यात सुनीता गणेश नवले (३८), सचिन गणेश नवले (१८), दिव्या गणेश नवले (१७), समीक्षा अनिल गांगुर्डे (९), आदिती पांडुरंग आहेर (१३), आरती पांडुरंग आहेर (९) व देवांश किरण मोरे (२) हे जखमी झाले असून त्यांच्यावर सिन्नर व नाशिक येथील रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. अपघाताची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस, अग्निशामक दल व आपत्ती व्यवस्थापन पथक घटनास्थळी दाखल झाले. आग विझवून मृतदेह बाहेर काढण्यात आले. शनिवारी (दि. ११ ) सकाळी शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.
त्याच दिवशी दुपारी पंचाळे स्मशानभूमीत अत्यंत शोकाकुल वातावरणात चौघांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. एकाच वेळी चार जणांवर अंत्यसंस्कार करण्याची गावातील ही पहिलीच वेळ ठरली. संपूर्ण गावाने अश्रू ढाळत आपल्या ग्रामस्थांना अखेरचा निरोप दिला.
दरम्यान, या प्रकरणी आयशर चालक याच्याविरुद्ध बेदरकार व निष्काळजी वाहनचालनेचा गुन्हा एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.प्रवीण अशोक काळे (रा. खोडद, ता. जुन्नर, जि. पुणे) याने वाहन भरधाव व निष्काळजीपणे चालविल्याने हा अपघात घडल्याचे फिर्यादी गणेश संपत नवले (40, रा. पंचाळे, ता. सिन्नर) यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे.
पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील, उपअधीक्षकके. के. पाटील, पोलिस निरीक्षक भरत जाधव, सहाय्यक निरीक्षक जितेंद्र पाटील तसेच फॉरेन्सिक पथकाने भेट देवून पाहणी केली. या प्रकरणी एमआयडीसी सिन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जितेंद्र पाटील करीत आहेत.
Comments are closed.