
- गुन्ह्यातून नाव वगळण्यासाठी भाजप पदाधिकाऱ्याला गंडवण्याचा प्रयत्न
- गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
** एनजीएन न्यूज नेटवर्क
नाशिक : उद्योगातील गुंतवणुक बहाण्याने शहरातील भाजप पदाधिकाऱ्याला ४६ लाखांना गंडा घातला असतानाच संशयित कुटुंबाने याच पुन्हा त्यास एका गंभीर गुन्ह्यातून नाव वगळण्यासाठी पुन्हा ५० लाखांच्या खंडणीसाठी धमकावल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी भाजप वैद्यकीय आघाडीचे पदाधिकारी मयूर अलई यांनी गंगापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यावर पोलिसांनी अमृतकर पितापुत्रांसह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्व संशयित सध्या फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
प्राप्त माहितीनुसार, मयूर प्रकाश अलई ( रा. गुलमोहर कॉलनी, गंगापूर रोड) यांनी फिर्याद दाखल केली आहे. सप्टेंबर २०२२ ते मे २०२६ या कालावधीत संबंधित प्रकार घडला आहे. फेब्रुवारी २०२६ मध्ये संशयित राजेंद्र अमृतकर आणि त्याच्या मुलाने अलई यांना काजू प्रक्रिया उद्योगात नफ्याचे आमिष दाखवून ४६ लाख रुपयांची फसवणूक केली होती. याप्रकरणी गंगापूर पोलिसांत आधीच पहिला गुन्हा दाखल आहे.
हा वाद सुरू असतानाच, सोनगीर ( जि. धुळे ) पोलीस ठाण्यात काही महिन्यांपूर्वी एका विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात मयूर अलई हे सहसंशयित आहेत. याच संधीचा गैरफायदा अमृतकर पिता-पुत्रांनी उठवून अलई यांना धमकावल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सोनगीर पोलिसांत दाखल गुन्ह्यातून अलई यांचे नाव वगळण्यासाठी संशयितांनी ५० लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली. अमृतकर पितापुत्रांसह इतरांनी मध्यस्थ प्रमोद डेरे याच्या मोबाईल क्रमांकावरून तसेच प्रत्यक्ष भेटून अलई यांच्याकडे ही खंडणी मागितली.
ही रक्कम दिली नाही, तर अलई आणि त्यांच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. यानंतर अलई यांनी गंगापूर पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली आहे. त्यानुसार, गंगापूर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलमानुसार खंडणी आणि धमकावल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
Comments are closed.