
- वेगळ्या जातीची असल्याचा ठपका; तिघांविरोधात गुन्हा दाखल
** एनजीएन न्यूज नेटवर्क
नाशिक : आपली सून वेगळ्या जातीची असल्याच्या कारणावरून तिचा शारीरिक आणि मानसिक छळ केल्याची घटना शहरात उघडकीस आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे तिचा तब्बल 8 वेळा गर्भपात घडवून आणल्याचा प्रताप सासरच्या मंडळींनी केला. अखेर संयमाचा कडेलोट झाल्यानंतर विवाहितेने पोलीस ठाणे गाठून आपली कैफियत मांडली. पोलिसांनी पती , सासू आणि सासरे या तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
प्राप्त माहितीनुसार, पीडित विवाहितेचा प्रेमविवाह झाला होता. तथापि, लग्नानंतर काही दिवसांतच तिच्या वेगळ्या जातीवरून सासरच्या लोकांनी शारीरिक आणि मानसिक छळ सुरू केला. वेगळ्या जातीची असल्याने आम्ही तुला झालेले मुल स्वीकारणार नाही, अशी भूमिका सासरच्या मंडळीनी घेतली. याच कारणाने तिचा तब्बल 8 वेळा गर्भपात घडवून आणण्यात आला. पीडिता पुण्यात नोकरी करत होती. तेथील नोकरी सोडल्यानंतर जुलै 2025 मध्ये ती नाशिकला परतली. त्यानंतर सासरच्या लोकांकडून होणारा छळ अधिकच वाढला. अखेर तिने न्यायासाठी म्हसरूळ पोलीस गाठले. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी पती विजय महाजन, सासू निर्मला महाजन आणि सासरे दशरथ महाजन या तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
Comments are closed.