NGN News
Latest Marathi News

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त नंदिनी नदीला नवसंजीवनी

** एनजीएन न्यूज नेटवर्क

नाशिक : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त (५ जून) जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या संकल्पनेतून आणि सिंहस्थ कुंभमेळा-२०२७च्या पार्श्वभूमीवर राबविण्यात येणाऱ्या ‘उन्नत नाशिक अभियान’ अंतर्गत नंदिनी नदी स्वच्छता अभियान उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. शासन आणि प्रशासनाच्या संयुक्त पुढाकारातून आयोजित या अभियानात विविध विभागांसह नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.

शहरभरातील नंदिनी नदीच्या १० ठिकाणी हे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यामध्ये कुंभ मंत्री गिरीश महाजन, महापौर हिमगौरी आडके, उपमहापौर विलास शिंदे, विविध पक्षीय नगरसेवक, सामाजिक संस्था, सामाजिक आणि राजकीय कार्यकर्ते तसेच नाशिक महानगरपालिका शिक्षण विभागानेही या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदविला. प्रशासन अधिकारी डॉ. मिता चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी, कर्मचारी तसेच विविध शाळांतील शिक्षक-शिक्षिकांनी सिटी सेंटर मॉल परिसरातील नदीकाठावर श्रमदान करून स्वच्छता मोहीम यशस्वी केली.

आनंदवली मनपा शाळेचा सहभाग..

या अभियानात आनंदवली शाळेच्या मुख्याध्यापिका अनिता जाधव यांच्यासह कुंदा बच्छाव, वैशाली भामरे, सुरेश खांडबहाले, राजेश दाभाडे, यशवंत जाधव, सतीश बच्छाव, चांगदेव सोमासे, मधुकर आवारी, शरद रुमाले, नितीन वाजे, नितीन चौधरी, सुदाम धोंगडे, प्रवीण रौंदळ, सुनील पवार, दीपक टिळे, अमोल हिरे, दीपक गुरव आणि मनीषा बाहुले आदींनी योगदान दिले.

वर्षानुवर्षे प्रदूषणाचा भार सहन करणाऱ्या नंदिनी नदीच्या स्वच्छतेसाठी नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. नदी स्वच्छता म्हणजे केवळ कचरा हटविणे नव्हे, तर तिचे पर्यावरणीय महत्त्व, नैसर्गिक सौंदर्य आणि अस्तित्व जपण्याचा सामूहिक संकल्प असल्याचा संदेश या अभियानातून देण्यात आला. पर्यावरण संवर्धनाची जाणीव जागृत करत नंदिनी नदीच्या पुनरुज्जीवनासाठी उभारलेली ही लोकचळवळ भविष्यातील स्वच्छ, सुंदर आणि समृद्ध नाशिकच्या दिशेने टाकलेले महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे.

Comments are closed.