
- मोबाईल जप्त; गरज पडल्यास पुन्हा चौकशी
** एनजीएन न्यूज नेटवर्क
नाशिक : टीसीएस कंपनीतील धर्मांतर आणि अत्याचार प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी महिला निदा खान हिला संभाजीनगर येथे बेकायदेशीरपणे आश्रय देणारा एमआयएम नगरसेवक मतीन पटेल सोमवारी अपेक्षेप्रमाणे नाशिक पोलिसांसमोर हजर झाला. यावेळी निदा आश्रयास असलेल्या घराचा मालक हनीफ खान आणि मतीनचे वकील देखील उपस्थित होते. पोलीस आयुक्तालयात एसआयटी प्रमुख संदीप मिटके यांच्याकडून मतीन आणि खान यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
मतीन पटेल याने निदा खान हिला तिला छत्रपती संभाजीनगर येथे स्वतःच्या घरात लपवून ठेवत आश्रय दिल्याचे प्रकरण उघडकीस आले होते. याप्रकरणी नाशिकच्या देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात मतीन पटेलविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतरच्या घडामोडीत नाशिक पोलिसांच्या गुन्हे शाखेने मतीन पटेल यास थेट कायदेशीर नोटीस बजावली आणि तो सोमवारी शरण आला. चौकशीत दोघांचे जबाब नोंदवण्यात आले.एसआयटीकडून दोघांचे मोबाईल जप्त करण्यात आले.
निदाला ओळखत असल्याचा इन्कार
दरम्यान, एसआयटी चौकशीनंतर माध्यमांनी मतीन पटेल आणि हनीफ खान यांना गाठून काही मुद्द्यांबाबत विचारणा केली. निदा सोबत आपला संपर्क कसा झाला, असे विचारता तिच्या मावशीने भाड्याने घर मिळू शकते का अशी आपणास विचारणा केल्याचे मतीन यांनी सांगितले. त्यानंतर आपण हनीफ खानशी संपर्क साधून भाड्याचे घर मिळवून दिले. तथापि, आपल्यासह हनीफ खान यास निदा संदर्भात माहिती नव्हती, असा दावा मतीन याने केला, तर निदा वास्तव्यास असलेले घर आपण मार्च महिन्यात विकत घेतल्याचे हनीफ खान म्हणाला.
Comments are closed.