
** राकेश बोरा
लासलगाव : एनजीएन न्यूज नेटवर्क
केंद्राच्या ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाच्या ग्राहक व्यवहार विभागाने नाशिक जिल्ह्यातील रबी कांदा २०२६ खरेदीसाठी किमान आश्वासित खरेदी किंमत (MAPP) जाहीर केली आहे. त्यानुसार २६ मे २०२६ पासून कांद्याला प्रतिक्विंटल १,५८० रुपये दर लागू राहणार आहे. कृषी भवन, नवी दिल्ली येथून जारी करण्यात आलेल्या कार्यालयातून ही माहिती देण्यात आली आहे. यापूर्वीच्या १३ मे २०२६ रोजीच्या कार्यालयीन संदर्भ देत हा निर्णय जाहीर करण्यात आला आहे.
सहाय्यक संचालक शिवानी गोयल यांनी जारी केलेल्या आदेशानुसार, नाशिक जिल्ह्यात रबी कांदा २०२६ खरेदीसाठी किमान आश्वासित खरेदी किंमत प्रतिक्विंटल १,५८० रुपये निश्चित करण्यात आली असून ती २६ मेपासून प्रभावी राहणार आहे. हा आदेश सक्षम प्राधिकरणाच्या मान्यतेने जारी करण्यात आल्याचेही नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, राज्यात कांद्याचे बाजारभाव उत्पादन खर्चापेक्षा खाली गेल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. अशा परिस्थितीत केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे बाजाराला काही प्रमाणात आधार मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
ग्राहक व्यवहार विभागाने जरी कांद्याला १५८० रुपये प्रति क्विंटलचा दर दिला असला तरी लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मात्र या कांद्याला प्रतिक्विंटल जास्तीतजास्त 1 हजार 812 रुपये, कमीतकमी 500 रुपये तर सरासरी 1 हजार 350 रुपये इतका बाजारभाव मिळाला. कमालदाराचा विचार केला तर शासनाच्या दरापेक्षा लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्याला अधिकचा दर मिळत असल्याचे दिसून आले आहे
Comments are closed.