NGN News
Latest Marathi News

सुवर्णा जगताप ‘Science Summit 2026’ मध्ये सहभागी होणार

  • जागतिक व्यासपीठावर लासलगावच्या बाजारपेठेचा ‘महिला नेतृत्वाचा’ उमटणार ठसा

** एनजीएन न्यूज नेटवर्क

लासलगाव : राकेश बोरा

आशिया खंडातील प्रमुख कांदा बाजारपेठ म्हणून देश-विदेशात ओळख असलेल्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पहिल्या महिला सभापती म्हणून नेतृत्वाची धुरा सांभाळलेल्या, बाजार समितीच्या इतिहासात अनेक महत्त्वकांक्षी ऐतिहासिक निर्णय घेणाऱ्या सुवर्णा जगताप यांच्या कार्याची दखल आता जागतिक स्तरावर घेण्यात आली आहे. ‘Science Summit 2026’ मधील ‘Shakti of Governance’ या विशेष सत्रासाठी त्यांना वक्त्या म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे. त्यामुळे लासलगाव बाजार समितीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

लासलगाव बाजार समितीच्या इतिहासात पहिल्या महिला सभापती म्हणून सुवर्णा जगताप यांनी महत्त्वाची जबाबदारी सांभाळली. शेतकरी, व्यापारी आणि बाजार समितीच्या विविध घटकांमध्ये समन्वय साधत बाजारपेठेच्या विकासाला चालना देण्याच्या प्रक्रियेत त्यांचे नेतृत्व ठळकपणे समोर आले.

लासलगाव बाजार समितीच्या माध्यमातून वर्षानुवर्षे कांद्यासह विविध कृषी मालाची मोठ्या प्रमाणावर आवक होत असून, या बाजारपेठेचा प्रभाव केवळ नाशिक जिल्ह्यापुरता मर्यादित नसून देशातील कृषी व्यापाराच्या दृष्टीनेही महत्त्वाचा आहे. सुमारे ८१.४३ लाख क्विंटल कृषी मालाची उलाढाल आणि १,३१४.८ रु कोटींची उलाढाल या बाजारपेठेच्या माध्यमातून झालेली आहे

सुवर्णा जगताप यांचे महिला नेतृत्व, समावेशक प्रशासन, शेतकरी-केंद्रित बाजारव्यवस्था आणि लोकसहभागातून विकास या अनुभवांवर प्रकाश टाकणार आहेत. लासलगाव बाजार समितीतील प्रत्यक्ष अनुभवातून जागतिक स्तरावरील मान्यवरांसमोर विचार मांडण्याची संधी मिळणे, ही लासलगावसाठीही अभिमानाची बाब मानली जात आहे.

लासलगावच्या कृषी व्यापाराची ताकद, बाजार समितीतील महिला नेतृत्व आणि शेतकरी-व्यापारी सहभागाची कार्यपद्धती आता जागतिक चर्चेच्या केंद्रस्थानी येणार असल्याने या निमंत्रणाकडे विशेष महत्त्वाने पाहिले जात आहे.

Comments are closed.