- अलवरमध्ये नवीन कांद्याची आवक लांबल्याने नाशिकच्या कांद्याला मागणी; दिवाळीनंतर आवक वाढल्यास दर घसरण्याची शक्यता
** एनजीएन न्यूज नेटवर्क
लासलगाव : राकेश बोरा
लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत उन्हाळ कांद्यापाठोपाठ नवीन लाल कांद्यालाही चांगला दर मिळत असल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळत आहे. नवीन लाल कांद्याची आवक अपेक्षेप्रमाणे वाढलेली नसल्याने बाजारभाव टिकून असून, लाल कांद्याला कमाल पाच हजार रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला आहे.
राजस्थानमधील अलवर जिल्ह्यात नवीन कांद्याची आवक लांबल्याने नाशिक जिल्ह्यातील कांद्याला मागणी वाढली आहे. मात्र, मागणीच्या तुलनेत पुरवठा अत्यल्प असल्याने १५ नोव्हेंबरपर्यंत कांदा बाजारातील तेजी कायम राहण्याची शक्यता कांदा निर्यातदार विकास सिंह यांनी व्यक्त केली.
दुसरीकडे, मार्च आणि एप्रिल महिन्यात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर उन्हाळ कांद्याची साठवणूक केली होती. मात्र, साठवलेल्या कांद्याची प्रतवारी खालावली असून वजनातही घट झाली आहे. त्यामुळे बाजारभाव चढे असले तरी साठवणूक केलेल्या कांद्याच्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षित पदरात काहीच पडत नसल्याचे चित्र आहे.
नवीन लाल कांद्याची आवक उशिराने सुरू झाल्याने सध्या समाधानकारक दर मिळत आहेत. मात्र, दिवाळीनंतर नाशिक जिल्ह्यात लाल कांद्याची आवक वाढण्याची शक्यता असून, त्याचा परिणाम बाजारभावावर होऊन दर घसरण्याची भीती व्यक्त होत आहे. दरम्यान, पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील कांदाही निर्यातीसाठी सज्ज झाला आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भारतीय कांद्याला निर्यात स्पर्धेचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.
बाजार समितीतील कांदा आवक
लाल कांदा : १५ वाहने
उन्हाळ कांदा : २३६ वाहने
लाल कांद्याचे बाजारभाव (रुपये प्रतिक्विंटल)
किमान दर : २,६२५
कमाल दर : ५,०००
सर्वसाधारण दर : ४,४००
उन्हाळ कांद्याचे बाजारभाव (रुपये प्रतिक्विंटल)
किमान दर : २,०९१
कमाल दर : ४,६९१
सर्वसाधारण दर : ४,३००
Comments are closed.