NGN News
Latest Marathi News

ईशानेश्वर मंदिर, कार्यालय, फार्म हाऊससह भूखंडांवर ‘ईडी’ची वक्रदृष्टी

  • खरातच्या अडचणींत वाढ होण्याची शक्यता; बेकायदेशीर संपत्तीचा शोध सुरु

** एनजीएन न्यूज नेटवर्क

नाशिक : भोंदूबाबा तह स्वयंघोषित कॅप्टन अशोक खरात याच्याभोवती एसआयटी पाठोपाठ आता सक्तवसुली संचालनालय अर्थात ‘ईडी’ ने आपला चौकशीचा फास आवळला आहे. खरातच्या बेकायदेशीर संपत्तीचा शोध घेण्यासाठी ईडीच्या पथकाने एसआयटी अधिकाऱ्यांसोबत संयुक्त मोहीम हाती घेतली आहे. यामध्ये ईशानेश्वर मंदिर, खरातचे कार्यालय, फार्म हाऊससह विविध ठिकाणच्या जमिनीच्या भूखंडांची पाहणी करण्यात आली. 

प्राप्त माहितनुसार, खरात याने एवढी प्रचंड मालमत्ता कोणत्या उद्देशाने जमा केली आणि काही विशिष्ट मालमत्तांमध्ये भागीदारी का ठेवली, याचा सखोल तपास ईडी करत आहे. या व्यवहारांमध्ये मनी लाँड्रिंग झाले असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. खरातची बँक खाती आधीच सील करण्यात आली आहेत. या मालमत्तांची मोजणी सुरू असून, त्यांचे सध्याचे बाजारमूल्य किती आहे, याचा अंदाज घेतला जात आहे. यामध्ये सिन्नरच्या मिरगाव येथील खरातच अलिशान फार्म हाऊस, त्यालगत असलेले ईशानेश्वर मंदिर, नाशिकच्या कॅनडा कॉर्नर भागातील कार्यालय, नाशिकसह इतर जिल्ह्यांतील जमिनी यांचा समावेश आहे. धर्माच्या नावाखाली लोकांची फसवणूक करून किती कोटींची माया जमवली, याचे धागेदोरे आता हळूहळू समोर येत आहेत. ईडीच्या एन्ट्रीमुळे या प्रकरणाला आता मोठे वळण मिळाले आहे. खरात आर्थिक व्यवहारात प्रत्यक्षाप्रत्यक्ष सहभाग असलेल्या व्यक्तींचीही ‘ईडी’ कडून चौकशी होऊ शकते.

सोलापूरमध्ये 11 एकर जमीन खरेदी

खरात याने नाशिकसह शिर्डी, पुणे आणि अन्य काही शहरांमध्ये कोट्यवधींची मालमत्ता खरेदी केल्याची माहिती तपासात समोर आल आहे. उत्तर सोलापूर तालुक्यातील कळमण गावात त्याने कोट्यवधी रुपयांची जमीन खरेदी केली आहे. कळमण गावात सुमारे 11 एकरांपेक्षा अधिक जमीन खरात यांच्या नावावर खरेदी करण्यात आली, जिची किंमत तब्बल 2 कोटी 40 लाख 91 हजार 200 रुपये इतकी असल्याची नोंद खरेदीखतात आहे. 

Comments are closed.