NGN News
Latest Marathi News

सासरच्यांकडून छळ; नाशिक रोडला विवाहितेचे टोकाचे पाऊल

  • गळफास घेत जीवनयात्रा संपवली; नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

नाशिक : सासरच्या मंडळींकडून सतत होत असलेल्या शारीरिक आणि मानसिक छळाला कंटाळून एका ४० वर्षीय विवाहितेने गळफास घेत जीवनयात्रा संपवल्याची घटना नाशिक रोडच्या जेलरोड परिसरात घडली आहे. आशा प्रवीण घोटेकर असे मृत विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात विवाहितेचा पती आणि सासरच्या इतर पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्राप्त माहितीनुसार, आशा यांचा विवाह २००८ मध्ये प्रवीण घोटेकर यांच्याशी झाला होता. प्रारंभीच्या काही वर्षानंतर विवाहितेचा छळ सुरु झाला. सदनिका आणि मोटारगाडी घेण्यासाठी माहेरहून २५ लाख रुपये आणावेत, यासाठी आशा यांच्यावर सासरच्या मंडळीनी दबाव आणला. बहिणीचा संसार मोडू नये म्हणून भाऊ गणेश वाळके यांनी संगमनेर तालुक्यातील आईच्या नावावर असलेली जमीन विकून पैशांची व्यवस्था केली. मात्र त्यानंतरही सासरच्या मंडळींचे समाधान झाले नाही. आशा यांचा छळ होताच राहिला. आईच्या निधनानंतर वारसा हक्काच्या मुद्द्यावर आशा यांना सातत्याने मारहाण करण्यात येऊन त्यांच्या अंगावरील २१ तोळे सुवर्णालंकार काढून घेण्यात आले. ही बाब तक्रारीत नमूद करण्यात आली आहे. शिवाय, पतीच्या विवाहबाह्य संबंधांची माहिती आशा यांना मिळाल्यावर त्यांनी जाब विचारला असता त्यांना मारहाण करण्यात आली. सातत्याने होत असलेल्या छळाला कंटाळून गेल्या बुधवारी ( दि. ६ ) आशा यांनी गळफास घेत आत्महत्या केली.

आशा यांच्या भावाने नाशिक रोड पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत सततच्या छळाला कंटाळून बहिणीने टोकाचे पाऊल उचलल्याचे म्हटले आहे. पोलिसांनी विवाहितेचा पती आणि सासरच्या इतर पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Comments are closed.