NGN News
Latest Marathi News

‘म्हाडा’ जमीन फसवणूक घोटाळा; दोन बडे अधिकारी ताब्यात

  • नगररचना विभागाचे सहायक संचालक, भूमी अभिलेख विभागाचे उपाधीक्षक यांचा समावेश

** एनजीएन न्यूज नेटवर्क

नाशिक : ‘म्हाडा’ जमीन फसवणूक घोटाळ्यात नवा ट्विस्ट आला आहे. नायब तहसीलदार नितीन पाटील यांच्या पाठोपाठ शहर पोलीस गुन्हे शाखेने नगररचना विभागाचे सहायक संचालक कल्पेश पाटील आणि भूमी अभिलेख विभागाचे उपाधीक्षक बिपीन काजळे यांना ताब्यात घेतले आहे. या कारवाईमुळे शहरभर खळबळ उडाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या प्रकरणात शासनाची फसवणूक झाल्याची तक्रार बिपीन काजळे यांनीच नोंदवली होती.

आर्थिकदृष्ट्या दुर्बल (EWS) आणि अल्प उत्पन्न गटासाठी (LIG) राखीव असलेली 20 टक्के घरे व जमिनी म्हाडाकडे वर्ग न करता, सरकारची फसवणूक केल्याचा आरोप नाशिक शहरातील 49 नामांकित विकासकांवर करण्यात आला होता. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेवून महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी उच्चस्तरीय विशेष तपास पथक (SIT) गठीत करण्याचे आदेश दिले. त्यानुसार नेमण्यात आलेल्या सहा सदस्यीय समितीमध्ये जमाबंदी आयुक्त, नोंदणी महानिरीक्षक (मुद्रांक शुल्क), नाशिक पोलीस आयुक्त, नगररचना संचालक, भूमी अभिलेख उपसंचालक यांचा समावेश आहे. समितीला संपूर्ण चौकशी करून एका महिन्याच्या आत आपला सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यादृष्टीने समितीचा तपास सुरु आहे.

याच प्रकरणात नायब तहसीलदार नितीन पाटील यांना गेल्या 3 मे अटक करण्यात आली होती. ते सध्या पोलीस कोठडीत आहेत. त्यानंतर गुन्हे शाखेने कल्पेश पाटील आणि बिपीन काजळे यांना ताब्यात घेतले.

Comments are closed.