NGN News
Latest Marathi News

‘टीसीएस’मध्ये महिला छळाचे प्रमाण व्यापक, ‘पॉश’ कायद्याचे उल्लंघन

  • राष्ट्रीय महिला आयोगाच्या सत्यशोधन समिती अहवालातील निष्कर्ष

** एनजीएन न्यूज नेटवर्क

नाशिक : शहरातील बहुचर्चित टीसीएस प्रकरणात पुणे आणि नाशिक मिळून एकाच समिती स्थापन केल्याने ‘पॉश’ कायद्याचे उल्लंघन झाले, तसेच नाशिक कार्यालय तीन विशिष्ट व्यकींच्या अधिपत्याखाली होते आणि पुण्यात सहायक महाव्यवस्थापक पदावर असलेल्या महिलेने या त्रिमुर्तीला वेळोवेळी पाठीशी घातल्याचा ठपका राष्ट्रीय महिला आयोगाच्या सत्यशोधन समितीने ठेवला आहे.

समितीचा तब्बल ५० पाणी अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नुकताच सादर करण्यात आला. टीसीएस कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांचे शोषण आणि धर्मांतर प्रकरणी समितीने सखोल चौकशी करत अहवाल तयार केला. कंपनीच्या नाशिक प्रकल्पातील दानिश शेख, तौफिक अख्तर आणि रझा मेमन हे तिघे जण संपूर्ण नियंत्रण मिळवून होते, असे निरीक्षण नोंदवण्यात आले आहे. त्यांच्या कृत्यांना पुण्यात सहायक महाव्यवस्थापक पदावर असलेल्या अश्विनी चैनानी नामक महिला अधिकाऱ्याने सतत पाठीशी घातले. परिणामी, महिला कर्मचाऱ्यांना मोठ्या छळाला सामोरे जावे लागल्याचे अहवालात म्हटले आहे. कंपनीत महिलांचा मानसिक आणि लैंगिक छळ झाला, शिवाय अधिकारांचा गैरवापर झाला. विशिष्ट धर्म इतर धर्मांहून कसा श्रेष्ठ आहे, हे पटवून देताना दबावतंत्र अवलंबण्यात आले. केवळ नोकरीवर कुऱ्हाड पडू नये आणि सामाजिक प्रतिष्ठेला नख लागू नये म्हणून अनेकांनी तक्रार केली नसल्याचेही अहवालात म्हटले आहे.

अनेक त्रस्त महिलांना तक्रार करण्याची इच्चा होती, तथापि, योग्य यंत्रणा नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. कंपनीत महिला सुरक्षेचे तीन-तेरा वाजले होते. मात्र, प्रशासकीय पातळीवर त्याची कुठेही नोंद घेण्यात आली नाही. कंपनीच्या पुणे आणि नाशिकआस्थापनांत स्वतंत्र समित्या असणे अनिवार्य असताना केवळ एका समितीवर दोन्ही ठिकाणचा कारभार सुरु होता. यामुळे ‘पॉश’ कायद्याचे उल्लंघन झाले.

कंपनीला ‘हे’ निर्देश..

टीसीएस प्रकरणात अत्यंत गंभीर बाबी पुढे आल्या असून महिलांच्या मानसिक आणि लैंगिक छळ झाल्याच्या तक्रारींचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर आहे. आयोगाच्या सदस्यांनी कंपनीतील महिला, पीडिता आणि पोलिसांशी सखोल चर्चा केली. त्यावरून महिला असुरक्षितता, प्रशिक्षण अभाव, मनमानी नेतृत्व आदि मुद्द्यांवर बोट ठेवताना आयोगाच्या समितीने महिला कर्मचाऱ्यांची सुरक्षितता आणि प्रतिष्ठेसाठी तातडीने पावले उचलावीत, अशी सूचना देखील समितीने कंपनी व्यवस्थापनाला केली आहे.

Comments are closed.